आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द वेट इज ओव्हर:मनोज बाजपेयीच्या बहुप्रतिक्षित 'द फॅमिली मॅन 2'चा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता ही सीरिज 4 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजच्या दुस-या भागाची प्रेक्षका आतुरतेने वाट बघत होते, अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला असून याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 4 जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजची निर्मिती डी राज व डीके यांची आहे.

'फॅमिली मॅन' ऊर्फ श्रीकांत तिवारी या सीझनमध्‍ये नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सीरिजच्‍या 9 भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तहेर अशा दुहेरी भूमिका साकारताना आणि देशाचे घातक हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहायला मिळणार आहे. रोमांचपूर्ण ट्विस्‍ट्स आणि अनपेक्षित क्‍लायमॅक्‍स असलेल्‍या या ऍक्शन-ड्रामाने भरलेल्‍या सीरिजचा आगामी सीझन श्रीकांतच्‍या दुहेरी विश्‍वांची लक्षवेधक झलक दाखवेल.

येथे ट्रेलर पाहा-

ट्रेलरबद्दल बोलताना अमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या इंडिया ओरिजिनल्‍सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित म्‍हणाल्या, ''आमची पात्रं घराघरांमध्‍ये लोकप्रिय बनत आहेत, यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही. वैशिष्‍ट्यपूर्ण फॅमिली मॅन श्रीकांत तिवारीला मिळालेले प्रेम व प्रशंसा उत्तम, वास्‍तववादी कथा सर्व मर्यादांना मोडून काढण्‍याबाबत असलेल्‍या आमच्‍या विश्‍वासाला अधिक दृढ करतात. 'द फॅमिली मॅन'चा नवीन सीझन अधिक रोमांचक, अधिक जटिल आणि अधिक ऍक्शनने भरलेला आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, प्रेक्षक श्रीकांत आणि त्‍याच्‍या प्रतिस्‍पर्धीमधील आमना-सामना पाहण्‍यासाठी खूपच उत्‍सुक असतील. ''

निर्माते राज व डीके म्‍हणाले, ''निर्माते म्‍हणून आम्‍ही आज 'द फॅमिली मॅन'च्या बहुप्रतिक्षित सीझनचा ट्रेलर शेअर करण्‍यासाठी दीर्घकाळापासून वाट पाहत आलो आहोत. आम्‍ही खात्री देतो की, हा सीझन यंदाच्‍या उन्‍हाळ्याच्‍या शेवटपर्यंत सादर होईल. आम्‍ही आमचे वचन नेहमीच पाळले आहे, ज्‍याचा आम्‍हाला आनंद होत आहे. हा प्रतिक्षा काळ अखेर 4 जून रोजी समाप्‍त होईल. श्रीकांत तिवारी थरारक पटकथेसह परतत आहे आणि 'नवीन चेह-याच्‍या रूपात धोका येत आहे' – सामंथा अक्किनेनी, जिने उत्तम कामगिरी बजावली आहे. सोबतच प्रतिभावान कलाकार देखील आहेत. ''

‘द फॅमिली मॅन 2’ ही सीरिज यापूर्वी 12 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार होती. पण 'तांडव' या वेब सीरिजमुळे उद्भवलेल्या वादामुळे याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

या वेब सीरिजच्या माध्यमातून दक्षिणेची सुपरस्‍टार सामंथा अक्किनेनीचे डिजिटल पदार्पण होत आहे. मनोज बाजपेयी, प्रियामणी, शरिब हाश्‍मी, सीमा बिस्‍वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्‍वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्‍हा आणि महक ठाकूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका यात आहेत. या सोबतच तामिळ चित्रपटसृष्‍टीमधील नावाजलेले मिमे गोपी, रविंद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंद सामी आणि एन. अलगमपेरूमल देखील असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...