आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वेब सीरिज:‘ब्रीद’च्या दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार मराळमोळा हृषिकेश जोशी; अभिषेक बच्चन म्हणाला -  'हृषिकेशचे कॅरेक्टर हे या सीझनमधील सरप्राईज पॅकेज'  

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘ब्रीद’चा दुसरा सीझन अॅमॅझॉन प्राईम वर 10 जुलैपासून स्ट्रीम होणार आहे.
  • ॲबंडंशिया एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या वेब सीरिजचा दुसरा सीझन पहिल्या सीझनप्रमाणेच मयांक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे.
  • भवानी अय्यर, विक्रम टुली आणि अर्षद सय्यद यांनी या मालिकेचे लेखन केले आहे.

आर. माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रीद’ (Breathe) या वेबसिरीजचा पहिला सीझन गाजल्यानंतर आता दुसरा सीझन येत असून त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर हृषिकेश जोशी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सीझनमधील हृषिकेशच्या कामाचे सर्व प्रेक्षकांनी तसेच, आर. माधवन, मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक तसेच जगभरातील समीक्षकांनी खूप कौतुक केले. त्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये हृषिकेशच्या भूमिकेमध्ये काही अधिकचे चांगले बदल करून ती महत्वाची केली गेली आहे. दुसऱ्या सीझनमध्ये हृषिकेशचा इन्स्पेक्टर प्रकाश अक्षरशः धमाल करणार आहे 

‘ब्रीद' च्या पहिल्या सीझनमध्ये आर माधवन, तर दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चन यांच्या बरोबर दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री नित्या मेननची देखील महत्वाची भूमिका आहे. ‘ब्रीद या वेब सीरिजमध्ये प्रत्येक सीझनला प्रमुख भूमिकेतील व्यक्तिरेखा बदलत जातात. मात्र ज्या दोन ब्रँड व्यक्तिरेखा प्रत्येक सीझनमध्ये कायम राहणार आहेत त्या म्हणजे हृषिकेश जोशी ( इन्स्पेक्टर प्रकाश ) आणि अमित साध (इन्स्पेक्टर कबीर सावंत)  यांच्या व्यक्तिरेखा. 

आपल्या भूमिकेविषयी हृषिकेश जोशी म्हणाला, “मला जेव्हा पहिल्या सीझनसाठी बोलावले गेले तेव्हा माझ्यासाठी वेब सीरिज हे माध्यम नवीन होते. फारशी माहितीही नव्हती. पण हेच आता भविष्य असणार आहे, हे नक्की ठाऊक होते. त्यामुळे हे करायचे असे मी ठरवले. माझी ऑडिशन निर्माते, दिग्दर्शक यांना खूपच आवडली आणि या वेब सीरिजसाठी माझ्याकडून लगेच होकार पण घेण्यात आला. पहिल्या सीझनला आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेला जो  प्रतिसाद मिळाला त्यानंतर निर्मात्यांनी मला बोलावून सांगितले की, माझी व्यक्तिरेखा इथून पुढे सर्व सीझनमध्ये कायम राहणार आहे आणि अधिकाधिक महत्वाची होत जाणार आहे आणि त्यानुसार दुसऱ्या सीझनमध्ये माझ्या व्यक्तिरेखेला धरून गोष्ट लिहिली गेली" असे हृषिकेश सांगतो.

“अलीकडे आम्ही सीझन दोनच्या भागांचे डबिंग करत होतो. त्यावेळी मला अभिषेक बच्चन म्हणाले की, या सीझनमध्ये सर्वाधिक अटेंशन कोणती व्यक्तिरेखा घेवून जाणार असेल तर ती तुझी.  ते म्हणाले की, तुझे कॅरेक्टर हे या सीझनमधील सरप्राईज पॅकेज  असणार आहे. माझ्यासाठी ही सर्वात मोठी कॉम्प्लीमेंट होती. या सीझनच्या चित्रिकरणादरम्यान माझी आणि अभिषेक बच्चन यांची खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकत्रच जेवायचो,  सेटवर खूप क्रिकेट खेळायचो. खूप गप्पा मारायचो. ते खूप गप्पिष्ट आहेत,  त्यांना गोड खूप आवडते आणि मलाही. त्यांनी एकदा खास माझ्यासाठी जयाजींनी बनविलेला गाजराचा हलवा आणला होता. त्यांना मराठी कलाकारांबद्दल आणि मराठी रंगभूमीबद्दल प्रचंड आदर आहे,” असे हृषिकेश सांगतो.

हृषिकेश जोशीने अनेक मराठी चित्रपट, नाटके, मालिका गाजवल्या आहेत. कमीने या हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली होती. आजचा दिवस माझा, मसाला, देऊळ , पोस्टर बॉईज , पोस्टर गर्ल,  सायकल यांसारख्या अनेक पुरस्कार पटकावणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘नांदी’ या वेगळ्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शन त्याने केले आहे. लग्नकल्लोळ, मु. पोस्ट बोंबील वाडी, शोभायात्रा, ए भाऊ डोकं नको खाऊ अशी त्याची अनेक नाटकं  गाजली आहेत.

0