Marathi Actress Amruta SubhashBirthday Reveled Reason For Not Becoming Mother
खुलासा:लग्नाच्या 19 वर्षांनंतरही आई झाली नाही अमृता सुभाष, स्वतः कारण सांगताना म्हणाली होती - 'म्हणून आम्हाला बाळ नकोय'
16 दिवसांपूर्वी
कॉपी लिंक
मराठी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. आज अमृताचा वाढदिवस असून तिने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. अमृताचे लग्न प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता संदेश कुलकर्णीसोबत झाले आहे. 2003 मध्ये त्यांचे लग्न झाले. या दोघांच्या लग्नाला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण अद्याप त्यांना मुलबाळ नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अमृताने स्वतःचे मूल का होऊ दिले नाही, यावर भाष्य केले होते. अमृता शेवटची वंडर वुमन या चित्रपटात दिसली होती. यात तिने जया नावाच्या गरोदर महिलेची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत तिने खासगी आयुष्यावर भाष्य केले होते.
अमृता आणि संदेश यांचा लग्नातील फोटो.
आम्ही ठरवून बाळ होऊ दिले नाही अमृता म्हणाली होती, "आता काळ बदलत चालला आहे, असे मला वाटते. आज अशी अनेक जोडपी आहेत ज्यांना मुलं आवडतात पण त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यापैकीच एक आम्ही आहोत. मुलं आवडणे आणि त्यांना लहानाचे मोठे करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आम्ही दोघेही आपापल्या करिअरमध्ये खूप बिझी आहोत. त्यामुळे आम्ही बाळाला वेळ देऊ शकू का? आणि त्याला न्याय देऊ शकू का? असा विचार आमच्या मनात आला. त्यामुळेच आम्हाला बाळ नको, असे आम्ही ठरवले."
कामावर आमचे प्रेम पुढे अमृता म्हणाली, "आमच्या कामावर आमचे खूप प्रेम असल्यामुळे ते आम्ही सोडू शकत नाही. तसेच कामावरच्या प्रेमामुळे बाळाकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. आमच्यासारखा विचार करणारे अनेक जण आहेत. परंतु आम्हाला मुलं आवडत नाहीत असा याचा अर्थ होत नाही. आमच्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांवर मी खूप प्रेम करते. मी माझी कामं करून मला वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला जाऊ शकते. मी करिअरकडे ज्या पद्धतीने पाहते त्यात बाळाचे संगोपन मला करता आले असते का, असा प्रश्न मला पडतो."
काळानुसार पूर्णत्वाची व्याख्या बदलली आहे अमृता म्हणते, "आता अनेक जण बदलत्या काळानुसार हा विचार करू लागले आहेत. काळानुसार पूर्णत्वाची व्याख्याही बदलली आहे. त्यामुळे एक बाई तिच्या कामामुळे पूर्ण असू शकते किंवा तिच्या असण्याने ती पूर्ण असू शकते. त्याच्यासाठी तिचे लग्न झाले म्हणजे तिचे योग्य झाले, तिला मूल झाले म्हणजे तिचे योग्य झाले, तिचे करिअर झाले म्हणजे तिचे योग्य झाले असे आता राहिलेले नाही," असेही ती सांगते.
वाचा अमृताच्या खासगी आयुष्याविषयी बरंच काही....
सोनाली कुलकर्णीची वहिनी आहे अमृता अमृताचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ संदेश कुलकर्णीसोबत झाले आहे. या नात्याने सोनाली अमृताची नणंद होते. संदेश आणि अमृताचे लव्ह मॅरेज आहे. अमृताचा नवरा संदेश स्वत: एक लेखक आणि इंजिनिअरही आहे. तो पूर्वी एका इंजिनीअरिंग महाविद्यालयात ‘इंजिनीअिरग ड्रॉइंग’ हा विषय शिकवायचा. त्याच्या प्रेमात पडल्यावर अमृता एकदा चोरून त्याच्या एका लेक्चरला बसली होती.
आईकडून अभिनयाचा वारसा मिळालेल्या अमृताने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
दिल्लीत एनएसडीत अमृता सत्यदेव दुबेंकडून ती अभिनयातील बारकावे शिकली. तिथे रंगभूमीवर हिंदी, जर्मन नाटकांमध्ये काम केले.
महाराष्ट्रात परतल्यानंतर तिला रंगभूमीवर 'ती फुलराणी' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ही भूमिका त्यापूर्वी भक्ती बर्वे यांनी साकरली होती. या नाटकातील अमृताच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
आई ज्योती सुभाष यांच्यासोबत अमृता सुभाष
2004 मध्ये 'श्वास' या चित्रपटाद्वारे अमृताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. श्वासला 51 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. शिवाय ऑस्करमध्येही या चित्रपटाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
‘अवघाची संसार’ या मालिकेतील भूमिकेने अमृताही आज घराघरांत ओळखली जाते. या नाटकात अमृताने अभिनेता प्रसाद ओकसोबत काम केले होते.
अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर ब-याच कालावधीने तिचे आलेले एक नाटक म्हणजे ‘पुनश्चः हनीमून’. हे नाटक अतिशय लोकप्रिय झाले. या नाटकाची महत्वाची गोष्ट म्हणजे या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन तिचा पती संदेश कुलकर्णीने केले असून यात त्याने मुख्य अभिनेत्याची भूमिकासुद्धा केली होती.
अमृताची खासियत म्हणजे स्वत:लाच चॅलेंज ती नेहमी करते आणि ते ती यशस्वीपणे पूर्ण करते, मग ते कधी गाणे असो किंवा लिखाण.
अमृता उत्तम अभिनेत्री असून ती एक गायिका आणि लेखिकादेखील आहे. तीन वर्षे तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. 'जाता जाता पावसाने' हा तिचा अल्बम प्रकाशित झाला आहे. याशिवाय हापूस (2010), अजिंठा (2012) या चित्रपटांसाठी अमृताने पार्श्वगायन केले आहे.
अमृता एक संगीतकारसुद्धा आहे. निताल (2006) आणि तीन बहनेसाठी तिने संगीत दिले आहे. शिवाय सारेगमप या मराठी सांगितिक कार्यक्रमात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या कार्यक्रमात टॉप 5 पर्यंत तिने मजल मारली होती.
अमृताने मराठी चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केले आहे. रमन राघव 2.0 या सिनेमात अमृता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली होती. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या कान फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले होते. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यानंतर कानवारी करणारी अमृता पहिली मराठी अभिनेत्री ठरली.
अमृता सुभाष एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी ‘एक उलट.. एक सुलट’; नावाचे सदर लिहायची. या स्तंभलेखनावर आधारलेल्या तिच्या ‘एक उलट.. एक सुलट’; या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले होते.
अमृताला ‘किल्ला’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
अमृताने तिची आई ज्योती सुभाष यांच्यासोबत आजी, झोका, गंध, मसाला, नितळ, वळू, विहिर या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आजी या चित्रपटात ज्योती सुभाष यांनी अमृताच्या आजीची भूमिका वठवली होती. तर 2009 मध्ये आलेल्या गंध या चित्रपटात या दोघी आई-मुलीच्या भूमिकेत झळकल्या होत्या.
अमृताने गाजलेल्या 'गल्ली बॉय' या हिंदी चित्रपटात रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती.