आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिनेत्रीची 'जवान'मध्ये वर्णी:शाहरुख खानसोबत झळकणार 'ही' प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री, म्हणाली - 'अखेर माझा चित्रपट...'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग खान अर्थातच अभिनेता शाहरुख खानचे यावर्षी रुपेरी पडद्यावर दमदार पुनरागमन झाले आहे. जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या त्याच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. आता शाहरुख आगामी जवान या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. नुकतीच जवान या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. शाहरुख खान आणि चित्रपटाची निर्माती गौरी खान यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हा चित्रपट यावर्षी 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. दक्षिणेचा प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचा दिग्दर्शक असून हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरुखसह एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे.

या अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीचे गिरीजा ओक-गोडबोले जवान या चित्रपटात शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. गिरीजाने इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर करत या चित्रपटासाठी ती आतुर आहे, हे आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. पहिल्या पोस्टमध्ये जवान या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ती म्हणाली, "गेली दोन वर्षे गाळलेला घाम, अश्रू आणि रक्त… अखेर माझा चित्रपट, आपला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार," असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत म्हटले की, ‘जवान’ 7 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार! आम्ही जे तयार केले आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही!'

गिरीजाच्या या दोन्ही इन्स्टाग्राम पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. गायक अवधूत गुप्ते, अमृता खानविलकर, मिथाली पालकर, प्रिया बापट, स्पृहा वरद, अभिजित खांडकेकर या कलाकारांनीही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा, विजय देखील दिसणार
'जवान'मध्ये शाहरुख खानसोबत विजय सेतुपती आणि नयनताराही दिसणार आहेत. विजय चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहे. यापूर्वी हा चित्रपट 2 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता. पण आता सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

चित्रपटाचा टायटल व्हिडिओ जून 2022 मध्ये आला होता
याआधी जून 2022 मध्ये चित्रपटाचा टायटल व्हिडिओ रिलीज झाला होता. शाहरुख खानचे या वर्षी तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. 'पठाण' याआधीच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडले आहेत. 'पठाण'ने जागतिक बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींचा व्यवसाय केला आहे. याशिवाय त्याचा डंकी हा चित्रपटदेखील याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. तर गिरीजाबद्दल सांगायचे तर ती अलीकडेच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'गोष्ट एका पैठणी'ची या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.