आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटाला घरघर:भाऊराव कऱ्हाडेंच्या ‘TDM’ला शो मिळेना, कलाकारांना कोसळले रडू; दिग्दर्शक म्हणाले - 'असा भेदभाव…'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळणे हा मुद्दा काही जुना नाही. बरेचदा या विषयावर कलाकार मंडळींनी आवाज उठवलाय पण अद्याप यावर तोडगा काही निघाला नाही. 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ या चित्रपटाला याचा फटका बसला आहे. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगले ओपनिंग मिळाल्याचे म्हटलं जात आहे. पण आता बऱ्याच ठिकाणी टीडीएम चित्रपटाचे शो कॅन्सल केले जात आहेत, तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि त्यांच्या टीमचे म्हणणे आहे. अशातच एका थिएटरमध्ये चित्रपटाबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे, मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी यांना अश्रू अनावर झाले.

आता चित्रपट बनवण्याची इच्छा राहिली नाही - भाऊराव कऱ्हाडे

'ख्वाडा', 'बबन' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांनंतर भाऊराव कऱ्हाडे ‘टीडीएम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. ‘टीडीएम’ स्क्रीन मिळत नसल्याने भाऊराव म्हणाले, "मला शोसाठी वेळ द्या, आमचा चित्रपट चालला नाही तर घेऊ नका, पण किमान आमचा चित्रपट दाखवा लोकांना आणि लोकांना ठरवू द्या तो कसा आहे ते. या चित्रपटगृहाचेच उदाहरण घ्या एवढे लोक आमचा चित्रपट बघायला इथे आले आहेत म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की, आम्हाला आणखी एक शो द्या, पण त्यांनी तो दिला नाही. हा असा भेदभाव आमच्याबरोबर केला जात असल्याने आता माझी चित्रपट बनवण्याची इच्छा राहिलेली नाही," असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "लोकांना चित्रपट बघायचा असूनही त्यांना बघू दिला जात नाही. आम्ही वितरकांना विचारतो तेव्हा ते म्हणतात की आम्हाला ‘वरून’ आदेश आहे की आमच्या चित्रपटाचा एकच शो दाखवायचा. आमचा चित्रपट पाहिलेल्या एकही व्यक्तीने चित्रपटावर टीका केलेली नाही, त्यामुळे आमच्याबरोबर हा भेदभाव करणेणे चुकीचे आहे."

आम्हाला मदत करा - पृथ्वीराज थोरात

यावेळी चित्रपटाचा मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात म्हणाला, "तुम्हीच हा चित्रपट मोठा करू शकता, आम्हाला शो मिळत नाहीयेत. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतोय की आमच्या कष्टाचे चीज व्हावे, यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करा. चित्रपट खूप चांगला आहे, तो लोकांनी पाहायला हवा, आम्ही दुसऱ्या चित्रपटांबद्दल काहीच बोलत नाही. लोकांना ठरवू द्या कोणता चित्रपट चांगला आहे," असे तो म्हणाला.