आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Meena Kumari Birth Anniversary: Husband Kamal Amrohi's Assistant Slapped Meena Kumari In Public, Completed Her Pakija Even After Separating And Became Emotional At The Premiere

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:नव-याच्या असिस्टंटने सर्वांसमोर मारली होती मीना कुमारींच्या थोबाडीत, विभक्त झाल्यानंतर पूर्ण केले होते 'पाकीजा'चे चित्रीकरण

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांनी साहिब बीबी और गुलाम, पाकीजा, मेरे अपने, बैजू बावरा, दिल अपना प्रीत पराई यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि यशस्वी चित्रपट होता पाकीजा. पण शोकांतिका अशी की त्या आपल्या या चित्रपटाचे यश बघू शकल्या नाहीत आणि त्यांनी यापूर्वीच या जगाचा कायमचा निरोप घेतला. पाकीजा हा चित्रपट 4 फेब्रुवारी 1972 रोजी प्रदर्शित झाला. मात्र त्यापूर्वीच म्हणजे 31 मार्च 1972 रोजी त्यांचे निधन झाले होते. मीना कुमारी यांचे खासगी आयुष्य चित्रपटांच्या झगमगाटापेक्षा खूप वेगळे होते. त्यांचे अखेरचे दिवस दुःस्वप्नासारखे होते, जिथे प्रेम नव्हते, नातेवाईक नव्हते.

मीना कुमारी यांनी दिग्दर्शक-निर्माता कमाल अमरोही यांच्याशी लग्न केले होते. त्यांचे वैवाहिक जीवन अतिशय वाईट होते. कमाल यांनी त्यांच्यावर अनेक बंधने लादली होती. एवढेच नाही तर मीना कुमारी यांना बंद खोलीत मारहाणही करण्यात आली होती. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. ज्याबद्दल खुद्द अभिनेत्री नर्गिस यांनी खुलासा केला होता. नर्गिस दत्त यांनी स्वतः मीना यांच्या खोलीतून मारहाणीचे आवाज स्वतःच्या कानाने ऐकले होते, त्यामुळे त्यांची देखील मनस्थिती बिघडली होती. मीना कुमारी यांची अवस्था पाहून नर्गिसही खूप अस्वस्थ झाल्या होत्या. अशा परिस्थितीत मीना कुमारी यांच्या निधनानंतर नर्गिस यांनी एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी मीना कुमारी आणि त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिले आहे. मीना यांच्या मृत्यूवर नर्गिस यांनी 'तुला मृत्यूच्या शुभेच्छा. आता पुन्हा या जगात पाऊल ठेवू नकोस,' असे म्हटले होते. मीना कुमारी यांच्या आयुष्यात काय चाललंय याची नर्गिस यांनी जाणीव होती, हे त्यामागचे कारण होते.

मीना कुमारी खासगी आयुष्याला एवढी दुःखाची किनार होती की, त्यांना चित्रपटाच्या शूटिंगवर रडण्यासाठी ग्लिसरीनची कधी गरज भासली नाही. त्यांचे चाहते एवढे होतो की, ते त्यांच्या केसांचे ताबीज बनवून घालायचे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त एका गरीब कुटुंबातील मेहजबीन बानो हिंदी चित्रपटसृष्टीची ट्रॅजेडी क्वीन कशी बनली हे जाणून घेऊया-

जन्माला आल्या तेव्हा वडिलांकडे डॉक्टरांच्या फीसाठी पैसे नव्हते
अली बक्ष हे पारसी थिएटर कलाकार होते, त्यांनी ख्रिश्चन प्रभावती देवीशी लग्न केले. लग्नानंतर त्या इक्बाल बेगम बनल्या. एका मुलीच्या जन्मानंतर त्यांना मुलगा हवा होता, मात्र त्यांच्या घरी दुसरी मुलगी जन्माला आली. ती तारीख होती 1 ऑगस्ट 1933. हलाखीच्या परिस्थिती जीवन जगत असलेल्या अली बक्ष यांना मुलीच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांची फी द्यायलाही पैसे नव्हते. गरीबीमुळे अली बक्ष यांनी मुलीला अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. काही तासांनंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आणि मुलीला घरी आणले. मुलीचे नाव मेहजबीन ठेवले, तिला घरी मुन्ना म्हटले जायचे. कोणास ठाऊक होती की ही मुलगी एक दिवस मीना कुमारी बनून इंडस्ट्रीवर राज्य करेल.

वयाच्या चौथ्या वर्षी फिल्म स्टुडिओशी जुळले नाते
अली बक्ष यांना उदरनिर्वाह करणे कठीण चालले होते. त्यामुळे त्यांनी 4 वर्षांच्या मेहजबीनला आपल्या सोबत फिल्म स्टुडिओत नेण्यास सुरुवात केली. हे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरले. त्याचे कारण म्हणजे चिमुकल्या मेहजबीनला बघून दिग्दर्शक विजय भट्ट यांनी तिला लेदरफेस या चित्रपटात कास्ट केले. पहिल्याच दिवशी तिला 25 रुपये फी मिळाली, जी त्यावेळी खूप मोठी रक्कम होती. हा चित्रपट 1939 मध्ये प्रदर्शित झाला, त्यानंतर घराची आर्थिक जबाबदारी 6 वर्षांच्या मेहजबीवर आली.

मेहजबीनने अधुरी कहानी (1939), पूजा (1940), एक ही भूल (1940) या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आणि तिला 'बेबी मीना' हे नाव मिळाले. हे नाव त्यांना दिग्दर्शक विजय भट्ट यांनी दिले होते. ती पुढे नई रोशनी (1941), कसौटी (1941), विजय (1942), प्रतिज्ञा (1943), लाल हवेली (1944) मध्ये दिसली.

वयाच्या 13 व्या वर्षी हिरोईन बनली, गाणीही गायली
रमनिक प्रॉडक्शनने 13 वर्षांच्या मीनाला बच्चों का खेल या चित्रपटात कास्ट केले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 18 महिन्यांनी मीनाने तिची आई इक्बाल बेगम यांना कायमचे गमावले. त्या वयात आई गमावणे हा मोठा धक्का होता, पण मीना थांबली नाही आणि चित्रपटसृष्टीत काम करणे सुरु ठेवले. दुनिया एक सराय, पिया घर आजा, बिछडे बालम या चित्रपटात काम केले. या चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच मीनाने गाण्यांनाही आवाज दिला.

मीना चित्रपट करत होत्या, पण त्यांना यश मिळत नव्हते. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, त्यांना विजय भट्ट यांनी बैजू बावरामध्ये कास्ट केले. विजय भट्ट यांच्या चित्रपटातूनच वयाच्या चौथ्या वर्षी चिमुकल्या मीनाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट हिट झाला आणि मीना यांना इंडस्ट्रीत ओळख मिळाली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मीना या अपघातात थोडक्यात बचावल्या होत्या.

1952 मध्ये कमाल अमरोहींसोबत लग्न केले
कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हती. कमाल यांनी मीनाला पहिल्यांदा पाहिले जेव्हा ती 5 वर्षांची होती. कमल त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना भेटायला गेले होते. पण त्यावेळी गोष्टी जुळून आल्या नाही. 14 वर्षांनंतर अशोक कुमार यांनी मीना यांची कमाल यांच्याशी पुन्हा ओळख करून दिली. कमाल यांनी मीनाला अनारकली चित्रपटाची ऑफर दिली होती. त्याचकाळात मीना यांचा अपघात झाला, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमाल रोज त्यांना भेटायला यायचे आणि जेव्हा भेटण्यास मनाई केली जायची, तेव्हा दोघेही एकमेकांना पत्र लिहायचे. सुमारे 4 महिन्यांच्या या नात्यात दोघेही प्रेमात पडले आणि 14 फेब्रुवारी 1952 रोजी दोघांनी गुपचूप लग्न केले. यावेळी मीना अवघ्या 18 वर्षांच्या तर कमाल 34 वर्षांचे होते.

लग्नानंतर वडिलांनी घरातून हाकलून दिले
गुपचूप लग्न केल्यानंतरही मीना त्यांचे वडील अली बक्ष यांच्यासोबत राहत होत्या, मात्र या लग्नाची बातमी घरी पोहोचताच एकच गोंधळ उडाला. घटस्फोटासाठी वडिलांनी तिच्यावर दबाव टाकला. निर्बंध वाढले. त्याच वेळी कमाल यांनी मीनाला त्यांचा 'दायरा' हा चित्रपट ऑफर केला, पण वडिलांनी त्यात काम करण्यास मीनाला परवानगी दिली नाही. मीना दायरा चित्रपटात काम करणार असेल तर तिच्यासाठी घराचे दरवाजे बंद होतील, असे वडिलांनी ठणकावले.

त्याचवेळी मीना मेहबूब खान यांच्या अमर चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. चित्रपटाचे 4 दिवस शूटिंग केल्यानंतर त्यांनी मेहबूब खानसोबतचा करार रद्द केला आणि थेट बॉम्बे टॉकीजमध्ये पोहोचल्या, जिथे 'दायरा'चे शूटिंग सुरू होते. मीना यांनी 'दायरा'चे शूटिंग सुरू केले. ही बातमी वडिलांपर्यंत पोहोचली. मध्यरात्री शूटिंग संपवून मीना घरी पोहोचल्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. मीना यांनी कार वळवली आणि पती कमाल अमरोही यांच्या घरी पोहोचल्या.

लग्नानंतर कमाल अमरोही यांनी घातली बंधने
मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांच्या वैवाहिक जीवनात मात्र काही दिवसांनी तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. कमाल अमरोही यांनी मीना कुमारी यांना चित्रपटांत काम करण्याची परवानगी दिली. पण त्यांच्यावर तीन अटीही लादल्या होत्या.

मीना कुमारींनी सायंकाळी 6 वाजेच्या आधी घरी यायचे ही पहिली अट होती. मीना कुमारी यांच्या मेकअप रूममध्ये त्यांच्या मेकअप मॅनशिवाय दुसरा कोणीही पुरुष बसणार नाही, ही दुसरी अट होती. तर तिसरी अट मीना कुमारी केवळ त्यांच्याच कारमध्ये बसतील. ती कारच त्यांना घरून स्टुडिओत घेऊन जाईल आणि तिच कार त्यांना पुन्हा घरी घेऊन येईल अशी होती. कमाल अमरोहींची एवढी भीती मीना यांना वाटायची की, एकेदिवशी घरी वेळेत पोहोचू शकणार नाही या भीतीने त्यांनी साहिब, बीबी और गुलामचे रडत चित्रीकरण केले होते.

वैवाहिक आयुष्यात तणाव
साहिब, बीबी और गुलाम या चित्रपटाला बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले, पण कमाल यांनी मीनासोबत येण्यास नकार दिला. मीना देखील तिथे जाऊ शकल्या नाहीत. सोहराब मोदी यांनी मीना कुमारी आणि कमाल अमरोही या दोघांना 'इरोज' सिनेमागृहात एका प्रीमिअरसाठी आमंत्रित केले. सोहराब यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना मीना कुमारींचा परिचय करून दिला. या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी आहेत आणि कमाल अमरोही त्यांचे पती आहेत, असे ते म्हणाले. दोघे एकमेकांना नमस्कार करण्यापूर्वीच अमरोही म्हणाले, नाही मी कमाल अमरोही आहे आणि ही माझी पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी. एवढे बोलून ते सिनेमागृहाच्या बाहेर निघून गेले आणि मीना कुमारी यांना एकट्यांना बसून चित्रपट पाहावा लागला होता.

बघता बघता वैवाहिक आयुष्यात मतभेदाचे रुपांतर मारामारीपर्यंत झाले, ज्याची प्रत्यक्षदर्शी नर्गिसदेखील होत्या. 'मैं चुप रहूंगी' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नर्गिस यांनी मीना कुमारीसोबत रूम शेअर केली होती. मीनाच्या मृत्यूनंतर उर्दू मासिकाला दिलेल्या मुलाखतीत नर्गिस म्हणाल्या होत्या की, मी तिला झालेल्या मारहाणीचे आवाज स्वतः ऐकले होते. दुसऱ्या दिवशी मीनाला भेटले तेव्हा तिचे डोळे सुजले होते.

जेव्हा कमालच्या असिस्टंटने मीनाला मारली होती थापड
अनेक निर्बंध असूनही, मीना यांनी एकदा गीतकार गुलजार यांना त्यांच्या मेकअप रूममध्ये येण्याची परवानगी दिली. हे पाहून कमाल यांचे असिस्टंट बकर अलीने मीना यांना जोरदार चापट मारली होती. मीना यांनी कमाल यांच्याकडे तक्रार केली, पण त्यांनी मीना यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मीना खूप कोलमडल्या होत्या, पण त्यांना लग्न वाचवण्याची आशादेखील होती. मीना यांच्या मृत्यूनंतर कमाल म्हणाले होते की, ती एक चांगली अभिनेत्री होती, पण पत्नी नाही, कारण ती स्वतःला घरातही अभिनेत्री समजत असे.

नशेच्या आहारी गेल्या
पतीपासून विभक्त होताच मीना एकट्या पडल्या होत्या. त्यांना क्रोनिक इम्सोम्निया झाला. त्यांना दारूचे व्यसन जडले. डॉ. सईद तिमुर्जना यांनी त्यांना झोप येत नसताना ब्रँडी घेण्याचा सल्ला दिला होता, पण घटस्फोटानंतर मीना यांना दारु आणि तंबाखूचे व्यसन जडले. त्यामुळे त्यांची तब्येत प्रचंड खराब झाली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. दारुच्या अतीसेवनामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आजारपणातही केले पाकीजाचे चित्रीकरण

कमाल अमरोही आणि मीना कुमारी पती पत्नी म्हणून एकमेकांपासून वेगळे राहत होतो. पण अभिनेत्री म्हणून त्या कमाल अमरोहींच्या चित्रपटात काम करायला कायम तयार असायच्या. त्यामुळे अमरोहींपासून 5 वर्षे वेगळे राहूनही मीना कुमारींनी त्यांच्या 'पाकिजा'चे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. हा चित्रपट तयार व्हायला तब्बल 16 वर्षे लागली. 1968 मध्ये शूटिंगच्या दरम्यान मीनाला माहित होते की, त्या जास्त काळ जगू शकणार नाहीत. उपचार घेऊन लंडनहून परतल्यावर मीना यांनी पुन्हा पाचव्या दिवशी पाकीजाचे अंतिम शूटिंग पूर्ण केलं.

शेवटचा चित्रपट पाहताना भावूक झाल्या होत्या मीना
पाकीजाचा प्रीमिअर 3 फेब्रुवारी 1972 रोजी मराठा मंदिर थिएटरमध्ये झाला. मीना कुमारी पती कमाल अमरोही यांच्यासोबत बसल्या. चित्रपट पाहिल्यानंतर मीनाचे शब्द होते, माझे पती अनुभवी चित्रपट निर्माता आहेत हे मी मान्य केले आहे. दुसऱ्या दिवशी पाकिजा रिलीज झाला. हा चित्रपट ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला. रिलीजच्या तीन आठवड्यांनतर 28 मार्च रोजी गंभीर अवस्थेत मीना यांना 'सेंट एलिजाबेथ नर्सिंग होम' मध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या रुम नंबर 26 मध्ये असताना, 'आपा, आपा, मला मरायचे नाही' हे त्यांचे अखरेचे शब्द होते. मोठी बहीण खुर्शीद यांनी त्यांना सहारा देताच त्या कोमामध्ये गेल्या. त्यानंतर त्या यातून कधीही बाहेर आल्या नाहीत. तीन दिवसांनी म्हणजे 31 मार्च रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. कमाल अमरोही यांच्या इच्छेनुसार मीना यांना रहमताबादच्या स्मशानभूमीत दफन करणयात आले. 11 फेब्रुवारी 1993 रोजी कमाल अमरोही यांचे निधन झाले आणि त्यांना मीना कुमारी यांच्या शेजारी दफन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...