आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दामिनी'चा वाढदिवस:मिनाक्षी शेषाद्रीने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटांत केले काम, मात्र नंतर अचानक निघून गेली अज्ञातवासात

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज मिनाक्षी शेषाद्रीचा 58 वा वाढदिवस आहे.

90 च्या दशकात आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मिनाक्षी शेषाद्री. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी करणा-या या अभिनेत्रीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठले. मात्र अचानक मिनाक्षी यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि लग्न करुन परदेशी स्थायिक झाल्या. आज त्यांचा 58 वा वाढदिवस आहे. एक नजर टाकुया त्यांच्या खासगी आयुष्यावर...

वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी बनल्या मिस इंडिया
16 नोव्हेंबर 1963 रोजी (सिंदरी, झारखंड) मध्ये तामिळ कुटुंबात जन्मलेल्या मिनाक्षी यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केली. ‘पेंटर बाबू’ (1983) हा त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘हीरो’ या चित्रपटाने. हा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. यामध्ये जॅकी श्रॉफ त्यांचे हीरो होते.

'घातक' होता शेवटचा चित्रपट
आपल्या फिल्मी करिअरमध्ये मिनाक्षी यांनी ‘मेरी जंग’, ‘घर हो तो ऐसा’, ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. 1996 साली रिलीज झालेल्या 'घातक' या चित्रपटात त्या शेवटची झळकल्या होत्या. त्यानंतर त्या पेज थ्री पार्टीजमध्येही कधी दिसल्या नाहीत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक मोठ्या दिग्दर्शक-निर्मात्यांसोबत काम केले आहे. अमिताभ बच्चनपासून ते विनोद खन्ना, ऋषी कपूर, अनिल कपूर हे मोठे फिल्म स्टार्स त्यांचे हीरो होते.

हे होते बॉलिवूड सोडण्यामागचे कारण
असे म्हटले जाते, की फिल्ममेकर राजकुमार संतोषी त्यांच्या प्रत्येक चित्रपटात मिनाक्षीला हीरोईन म्हणून कास्ट करायचे. एकेदिवशी संतोषी यांनी मिनाक्षीकडे त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. पण मिनाक्षीने त्यांचे प्रेम नाकारले. इतकेच नाही त्याचवेळी त्यांनी बॉलिवूडलाही अलविदा केले.

इन्व्हेस्टमेंट बँकरसोबत केले लग्न

मिनाक्षी यांनी 1995 साली इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले आणि अमेरिकेतील प्लानो (टेक्सास) मध्ये स्थायिक झाल्या. दोघांनी न्यूयॉर्कमध्ये रजिस्टर्ड मॅरेज केले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव केंद्रा तर मुलाचे नाव जोश आहे. लग्नानंतर मिनाक्षी सिनेसृष्टीपासून कायमच्या दुरावल्या.

चालवतात डान्स क्लास
चित्रपटसृष्टीपासून दुरावल्यानंतर मिनाक्षी यांनी आपली नृत्याची आवड जोपासली. टेक्सासमध्ये त्यांनी Cherish Dance School नावाने डान्स अकॅडमी सुरु केली आहे. टेक्सासमधील भारतीयांमध्ये मिनाक्षी लोकप्रिय आहेत. मिनाक्षी एक उत्कृष्ट क्लासिकल डान्सरसुद्धा आहेत. चार नृत्यप्रकारात त्या पारंगत आहेत. भरतनाट्यम, कुचिपुडी, कथ्थक आणि ओडिसी नृत्य प्रकार त्या शिकल्या आहेत. त्यांनी वेम्पति चिन्ना सत्यम आणि जय रामाराव यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले होते.

बातम्या आणखी आहेत...