आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जर कोणाला या प्रकरणात काही माहिती असेल, तर त्यांनी थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. दिशाच्या मृत्यूच्या आठवड्याभरातच सुशांतचा मृत्यू झाला होता. या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचा संशय दिल्लीतील वकील पुनीत कौर धांडा यांनी व्यक्त केला होता. त्यांनीच या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
न्यायालयाने काय म्हटले?
याचिकाकर्ते दिल्लीचे वकील पुनीत कौर धांडा यांच्याकडे अशी याचिका दाखल करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. उलट, तुम्ही दिशाचे कोण?, असा प्रतिप्रश्न न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारला. दिशा सालियानच्या मृत्यूबाबत काही घातपाताची शक्यता वाटल्यास तिचे कुटुंब यासंबंधी कायदेशीर पावले उचलेल, असे म्हणत याचिकाकर्त्याला फटकारले आहे. सोबतच जर कोणाकडे या प्रकरणावर आधारित काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावे असेही आदेशही न्यायालयानेदिले आहेत.
दिशाचा 8 जून रोजी मुंबईच्या मलाड वेस्टमधील रीजेंट गॅलेक्सीच्या 14व्या मजल्यावरून पडल्यानंतर मृत्यू झाला होता. या घटनेच्या काही दिवसांतच म्हणजे 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली होती. त्यामुळे हे प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याची शंका येत असल्याचे या याचिकेत म्हटले होते. दिशा अभिनेता रोहन रायसोबत रिलेशनशिपमध्ये होती. लॉकडाउननंतर ते दोघे लग्न करणार होते, असा दावाही या याचिकेत करण्यात आला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.