आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:बॉलिवूडमधून माझ्या चित्रपटांना पाठिंबा मिळत नाही, अनेक मोठ्या व्यक्ती मी समोर आले की मार्ग बदलतात

अमित कर्ण, मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुढच्या आठवड्यात कंगना रनोट अ‍ॅक्शनपट ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा प्रवास तसेच बॉलीवूडची तिच्याप्रती तसेच तिच्या चित्रपटाप्रती ‘अ‍ॅक्शन’ यावर कंगनाने आपली बिनधास्त प्रतिक्रिया दिली आहे. तिच्याशी मारलेल्या या खास गप्पा...

‘धाकड’ ची सुरुवात कधी झाली होती?
हा चित्रपट माझ्याकडे 2019 मध्ये आला. निर्माते सोहेल मकलई हा चित्रपट माझ्याकडे घेऊन आले होते. मी खूप वर्षांपूर्वी त्यांचा चित्रपट ‘नॉक आउट’ केला होता. इरफान सरही त्यावेळी आमच्यासोबत होते. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच सोहेल यांच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. तरीही धाकडला होकार देण्यासाठी मी बराच वेळ घेतला. नवे चित्रपट निर्माते असल्याने मला जराशी भीती वाटत होती.

एजंट अग्नीच्या पात्रात स्वत:ला कसे परावर्तित केले?
मी त्या काळात ‘थलाइवी’ च्या चित्रिकरणात व्यस्त होते. तेथे मी 20 किलो वजन वाढवले होते. धाकडसारखा चित्रपट मिळेल याचा विचारही केला नव्हता. करिअरच्या सुरुवातीला मी आशादायी होते. खासकरून फॅशन चित्रपट केला तेव्हा. त्यावेळी मी केवळ 17-18 वर्षांची होते. त्यानंतर ‘कृष’ फ्रेंचायजीमध्ये माझ्या वाट्याला एक भूमिका आली. स्त्रीप्रधान अ‍ॅक्शनपट माझ्या वाट्याला येईल, असे मला कधीच वाटले नव्हते. त्यानंतर ‘थलाइवी’ करतानाही मला या चित्रपटाची अपेक्षा नव्हती.

हॉलीवूडशी तुलना केल्यास धाकड त्यापैकी कशाचे उत्तर आहे?
हॉलीवूड चित्रपटांबाबत तर मला माहित नाही. मात्र अँजेलिना ज्युलीचा ‘टॉम्ब रायडर’अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. धाकड त्याच वळणाचा आहे.

या चित्रपटाला ‘केजीएफ’ आणि ‘आरआरआर’सारखे यश मिळेल काय?
ही तर खूप मोठी अपेक्षा ठरेल. ती यामुळे की आपल्याकडे 80 टक्के प्रेक्षक हे पुरुष वर्गातील आहेत. त्यामुळे अशा चित्रपटांशी तुलना करणे योग्य नाही. मात्र धाकड लोकप्रिय झाल्यास चांगली गोष्ट ठरेल. लोक धाकडही पाहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच आधी बिग बजेट चित्रपट बनतच नव्हते. धाकड लोकप्रिय झाल्यास वरील चित्रपटांच्या रांगेत विराजमान होईल. त्याला पैशाच्या नव्हे तर लोक तो कसा स्वीकार करतील या नजरेतून पाहायला हवे.

बॉलीवूडमध्ये आऊटसायडर्ससाठी सपोर्ट कमी असतो असे वाटते?
ज्या गटाची मी गोष्ट करत असते, तो समोरच्याला संपवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. माझा चित्रपट येत आहे, मात्र इंडस्ट्रीमधून कोणाचाही पाठिंबा नाही. चित्रपट चालावा असा त्यांचा मुळीच हेतू नाही. त्यांना वाटेल तोच चित्रपट चालला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. मिस्टर बच्चन यांनी माझ्या चित्रपटाचे ट्रेलर ट्वीट केले, मात्र त्यांना ते लगेच डिलीट करावे लागले. हा दबाव होता की दुसरे काही, हे माहित नाही. अशावेळी तुम्ही विचार करू शकता की, हा विशिष्ट गट कसा विचार करतो...

सुशांत प्रकरणानंतर प्रेक्षक काही अभिनेत्यांवर नाराज आहेत, त्यामुळे त्यांचे चित्रपट आपटले असे वाटते का?
लोक निराश आहेत की नाही हे तर मी सांगू शकत नाही. मात्र इंडस्ट्रीतील काही लोकांची वर्तणूक विचित्र आहे. त्रासदायी आहे. त्यामुळे प्रेक्षक निराश तर होणारच. ते यामुळे की, हे एक असे क्षेत्र आहे जेथे असे लोक रोल मॉडेल बनून समोर येतात. मात्र उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा उत्तरदायित्त्व तर घ्यावेच लागेल. असे असले तरी हे लोक त्याचेही उत्तर देऊ शकत नाहीत. माझ्या चित्रपटाबद्दल कोणीच बोलत नाही. प्रेक्षक हे सर्व पाहात आहेत.