आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' चित्रपटाला नुकतीच 44 वर्षे पूर्ण झाली. याचेच औचित्य साधत मुंबईत दिग्गजांचे गप्पासत्र आयोजित करण्यात आले होते. या गप्पासत्राला स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जब्बार पटेल, अभिनेते मोहन आगाशे, नाना पाटेकर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र उपस्थित होते. दरम्यान ‘सिंहासन’ चित्रपटाच्यावेळी नेमके काय घडले? चित्रपटादरम्यानचे किस्से उपस्थितांनी सांगितले. शिवाय नाना पाटेकर यांनीही या चित्रपटादरम्यानच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. नाना पाटेकरांनी नसीरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी नवस केला होता. हा गमंतीशीर किस्सा त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितला.
मी नवस केला होता
नाना म्हणाले, "मी तेव्हा नसिरुद्दीन शाह यांचा अपघात व्हावा यासाठी नवस केला होता. सिंहासननंतर जब्बार पटेल यांनी मला त्यांच्या कोणत्याच चित्रपटात घेतले नाही. मराठीत जब्बार हे नेहमी मोहन आगाशे यांना चित्रपटात घेत असत, तसेच हिंदीत श्याम बेनेगल, गोविंद नीहलानी हे कायम ओम पुरी, नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करायचे. मी खरंच सांगतो की, मी देव मानत नाही आणि यामागील कारणदेखील नसिरुद्दीन शाह हेच आहे."
नाना यांचा देवावरचा विश्वास का उडाला, याचे कारण सांगताना ते म्हणाले, "कारण त्यावेळी मी नसीरुद्दीन यांना अपघात व्हावा, त्यांचे हातपाय मोडावेत यासाठी बरेच नवस केले, जेणेकडून नसीरच्या भूमिका मला मिळतील, पण तो नवस काही पूर्ण झाला नाही यामुळेच माझा देवावरचा विश्वास उडाला." हे ऐकून उपस्थित सगळेच हसू लागले.
नाना पुढे म्हणाले, "खरं सांगतो यांच्या नशिबी जे होते ते त्यांच्या पदरात पडले. नंतरच्या काळात आम्हालादेखील खूप काही मिळाले," असेही ते म्हणाले.
'सिंहासन' या गाजलेल्या चित्रपटात अरुण सरनाईक, सतीश दुभाषी, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे, निळू फुले, दत्ता भट, नाना पाटेकर हे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.