आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. 'द व्हॅक्सिन वॉर' हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. अग्निहोत्रींनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाची घोषणा केली होती. 'लस युद्धाची ओळख करु देत आहे, भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2023 निमित्त रिलीज होईल,' असे अग्निहोत्रींनी म्हटले होते. पण त्यावेळी त्यांनी चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे गुलदस्त्यात ठेवले होते. आता या चित्रपटातील कलाकारांची नावे समोर आली आहेत.
बलराम भार्गव यांची भूमिका साकारणार नाना पाटेकर
संपूर्ण देश करोनाच्या विळख्यात असताना त्यावर उपाय शोधण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या संशोधकांवर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आय.सी.एम.आर) माजी महासंचालक बलराम भार्गव यांची भूमिका नाना पाटेकर साकारत आहेत. भारत सरकारने 2014 मध्ये बलराम भार्गव यांना त्यांच्या वैद्यकीय (कार्डिओलॉजी) क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्यावर चित्रपटातून प्रकाश टाकणार आहे.
अनुपम खेर यांच्या करिअरमधील 534 वा चित्रपट
‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात अनुपम खेर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. त्यांनी क्लॅपबोर्डचा फोटो शेअर करत ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले आहे. हा त्यांच्या करिअरमधील 534 वा चित्रपट असणार आहे.
अनुपम खेर म्हणाले, "मी माझ्या 534 व्या चित्रपटाची घोषणा करत आहे. विवेक अग्निहोत्री यांचे दिग्दर्शन असलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट. जय हिंद.” या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
शेवटचे 'काला'मध्ये झळकले होते नाना
नाना पाटेकर शेवटचे 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काला' या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांनी रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर नाना कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत. नुकतेच त्यांनी ओटीटीवरही पाऊल ठेवले आहे. 'लाल बत्ती' या वेब सिरीजमध्ये ते वकिलाची भूमिका साकारत आहेत.
11 भाषांमध्ये प्रदर्शित होणारेय 'द व्हॅक्सिन वॉर'
विवेक अग्निहोत्री त्यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट एक दोन नव्हे तर तब्बल 11 भाषांमध्ये घेऊन येत आहेत. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली यांसह 10 हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
नाना पाटेकर आणि अनुपम खेर यांच्यासह पल्लवी जोशी, गोपाळ सिंग आणि दिव्या सेठ हे कलाकारसुद्धा या चित्रपटात आहेत. पल्लवी जोशी निर्मित विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणारेय.
भारतीय सिनेसृष्टीत प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात नानांचा जन्म झाला. नाना हे एक उत्तम अभिनेते आहेत. त्याचबरोबर आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्यांची प्रसिद्धी आहे. वाचा नाना यांच्याबद्दलच्या रंजक गोष्टी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.