आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे नाना:एकेकाळी चेन स्मोकर होते नाना पाटेकर, दिवसाला ओढायचे 60 सिगारेट; अभिनेत्री तनुश्री दत्ताने लावले होते गंभीर आरोप

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाना पाटेकर 70 वर्षांचे झाले आहेत.

भारतीय सिनेसृष्टीत प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जाणारे नाना पाटेकर यांनी आज वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत. 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात नानांचा जन्म झाला. नाना हे एक उत्तम अभिनेते आहेत, याविषयी कुणाच्या मनात संदेह असू नये. त्याचबरोबर आपले मत रोखठोक मांडणारा एक रांगडा गडी अशीही त्यांची प्रसिद्धी आहे. नाना पाटेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाऊन घेऊयात त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी-

खासगी आयुष्य
नाना यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर असे आहे. त्यांचे वडील दिनकर पाटेकर चित्रकार होते. मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून नानांनी आपले शिक्षण पूर्ण केले. घराच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे नाना यांना वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षापासूनच काम करावे लागले होते. नवव्या वर्गात असताना 35 रुपये महिन्यावर नानांनी नोकरी केली. या नोकरीत 35 रुपये आणि एक वेळचे जेवण मिळायचे. यासाठी नाना मुंबईत माटुंगा ते चुनाभट्टी हा नऊ किलोमीटरचा प्रवास पायी करायचे. नंतर कॉलेज जीवनात त्यांनी रंगभूमीवर काम केले. नानांना स्केचिंगची आवड आहे. गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी नाना मुंबई पोलिसांना स्केच बनवून देत असे. नाना 28 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदय विकारामुळे निधन झाले होते.

लग्न आणि नात्यात आलेला दुरावा
नाना यांचे लग्न अभिनेत्री नीलकांती यांच्यासोबत झाले. नीलकांती यांच्यासोबत नानांनी लव्ह मॅरेज केले होते. नीलकांती या ब्राह्मण तर नाना मराठा आहेत. लग्नाच्या वेळी नाना महिन्याकाठी साडे सातशे रुपये कमवायचे. तर नीलकांती या एका बँकेत नोकरीला होत्या, त्यांना त्याकाळात दरमहा अडीच हजार रुपये पगार होता. ''तुला जे काम करायचे ते कर मी घर सांभाळेल, असे नीलकांती मला म्हणाली होती. म्हणून मी आज जो काही आहे, तो नीलकांतीमुळे आहे'', असे नाना सांगतात. नाना यांना एक मुलगा असून त्याचे नाव मल्हार पाटेकर आहे. पण मल्हारच्या जन्मापूर्वी नाना आणि नीलकांती यांना एक मुलगा झाला होता. पण जन्मानंतर काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. नाना यांचे वैवाहिक आयुष्य फारसे आनंदी राहिले नाही. काही काळ ते त्यांच्या पत्नीपासून विभक्त राहात होते. नाना पाटेकर यांच्या पत्नींनी 'आत्मविश्वास' या सिनेमात काम केले होते.

दिवसाला 60 सिगारेट ओढायचे नाना
वयाच्या 56 व्या वर्षीपर्यंत नाना चेन स्मोकर होते. दिवसाला तब्बल 60 सिगारेट ते ओढायचे. TOI ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट सांगितली होती.

बॉलिवूडमधील पदार्पण
नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये 'गमन' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या सिनेमामधून ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात अपयशी ठरले. सिनेसृष्टीत पाय रोवण्यासाठी नानांना तब्बल आठ वर्षे संघर्ष करावा लागला. याकाळात ते मिळतील ती भूमिका करत असते. याकाळात त्यांनी गिद्ध, भालू, शीला या सिनेमांमध्ये अभिनय केला. यापैकी एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही.

'अंकुश'द्वारे मिळाली खरी ओळख
नाना पाटेकर यांना यश मिळवून देण्यात निर्माता-दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या सिनेमांचा मोठा वाटा आहे. नानांना पहिली मोठी संधी मिळाली ती 1986 मध्ये आलेल्या 'अंकुश' या सिनेमात. या सिनेमात नानांनी बेरोजगार तरुणाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1987 मध्ये एन. चंद्रां यांच्याच 'प्रतिघात'मध्ये त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली. 1989 मध्ये रिलीज झालेला 'परिंदा' हा सिनेमा नाना पाटेकर यांच्या सिने करिअरमधील हिट सिनेमांमध्ये गणला जातो.

तिरंगा ठरला सुपरहिट
1992 मध्ये रिलीज झालेला 'तिरंगा' हा मुख्य अभिनेत्याच्या रुपात नाना पाटेकर यांच्या सिने करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा आहे. 1996मध्ये रिलीज झालेल्या 'खामोशी' या सिनेमात त्यांनी मनीषा कोइरालाच्या मूकबधिर वडिलांची आव्हानात्मक भूमिका उत्कृष्टरीत्या साकारली. ही भूमिका कोणत्याही अभिनेत्यासाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हती.

विनोदाने हसवले प्रेक्षकांना
केवळ गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून नानांकडे बघितले जाऊ लागले होते. मात्र 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'वेलकम' या सिनेमातून त्यांनी विनोदी भूमिकासुद्धा ते ताकदीने पेलू शकतात हे सिद्ध केले. नाना यांनी आपल्या तीन दशकांच्या करिअरमध्ये जवळजवळ 60 हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.

कार्टुन सीरिजला आवाज
नाना पाटेकर यांनी दर रविवारी दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'जंगल बूक' या प्रसिद्ध कार्टुन सीरिजसाठी आपला आवाज दिला होता. या कार्टुनमधील शेरखान या व्हिलन कॅरेक्टरसाठी त्यांनी व्हॉईस ओव्हर दिला होता.

दिग्दर्शक म्हणून पदार्पण
माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडिया स्टारर 'प्रहार द फायन अॅटक' या सिनेमाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातसुद्धा आपला हात आजमावला होता.

मनीषा कोईरालासोबत अफेअरची चर्चा
नाना पाटेकर यांचे नाव मनीषा कोइरालासोबत जुळले होते. नव्वदच्या दशकात 'अग्निसाक्षी' या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांचे सूत जुळल्याची चर्चा होती. या काळात दोघांनी बराच काळ एकत्र घालवला असल्याचे म्हटले जाते.

मीटू प्रकरणात अडकले नाव
नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने सेक्शुअल हरॅसमेंटचे आणि मारहाणीचे आरोप लावल्याने खळबळ माजली होती. 2008 साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले असा आरोप तिने केला होता. परंतु, नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले.

बातम्या आणखी आहेत...