आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित आणि अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई करत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट 1990च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडतो.
दरम्यान चित्रपटावर एका बाजुने कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसरीकडे त्यावर टीकादेखील होतोय. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील या वादावर भाष्य केले आहे. चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा, त्यावरुन समाजात तेढ निर्माण होणे हे काही योग्य नाही असे नाना पाटेकर म्हणाले आहेत. पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या सिम्बीऑनलाईन मोबाईल अॅपच्या लाँचिंगवेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले नाना पाटेकर?
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरुन समाज माध्यमांत जे गट पडले आहेत, त्यावर नाना पाटेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना नाना म्हणाले की, ‘मला असे वाटते की, इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहणे हे गरजेचे आहे आणि त्यांनी एकत्रच राहावे. यात जर गट पडत असतील, ते चुकीचे आहे. गट पडण्याची गरजच नाही. अजून मी हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे चित्रपटाविषयी सविस्तर मला बोलता येणार नाही. चित्रपट जर पाहिला असता, तर मला बोलता आले असते. मात्र, एखाद्या चित्रपटाबद्दल असा वाद निर्माण होणे हे बरे नाही,’ असे नाना म्हणाले आहेत.
पुढे नाना पाटेकर म्हणाले, ‘चित्रपटाविषयी तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाहीये. ही तेढ जर कोणी निर्माण करत असेल, तर त्या माणसाला नक्की प्रश्न विचारा. कारण सगळे छान सलोख्याने राहत असताना, त्यांच्यामध्ये बिब्बा घालायची काही गरज नाहीये. चित्रपट आहे तो चित्रपटासारखाच पाहावा. त्यातील वस्तुस्थिती कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. यावरून गट निर्माण होणे साहजिक आहे. पण, म्हणून त्यातून समाजात तेढ निर्माण होणे हे काही योग्य नाही.’
बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय चित्रपट
या चित्रपटाने सहाव्या दिवशी भारतात 19.05 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. याआधी या चित्रपटाने पाचव्या दिवशी (मंगळवार) 18 कोटी, चौथ्या दिवशी (सोमवार) 15.05 कोटी, तिसर्या दिवशी (रविवार) 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी (शनिवार) 8.50 कोटी आणि पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 3.55 कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे चित्रपटाने आतापर्यंत भारतात 6 दिवसांत 79.25 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तरण आदर्श यांनी 'द कश्मीर फाइल्स'ला स्मॅश हिट, ऐतिहासिक आणि ब्लॉकबस्टर म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.