आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्गिस यांची 92 वी बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:नर्गिस यांना व्हायचे होते डॉक्टर, 'मदर इंडिया'च्या सेटवर सुनील दत्त यांनी आगीतून वाचवला होता जीव

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक नजर टाकुया एका सामान्य तरुणीपासून ते हिरोईन बनण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासावर...

मोठ्या पडद्यावर आपल्या अदांनी लाखो लोकांचे मन जिंकणा-या नर्गिस दत्त यांची आज 92 वी जयंती आहे. 1 जून 1929 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद. 1935 साली वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी 'तलाश-ए-हक' या सिनेमातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांना 'बेबी नर्गिस' असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले. अभिनेत्री म्हणून 1942 मध्ये त्या मोठ्या पडद्यावर झळकल्या. 40 आणि 50 च्या दशकात त्या खूप गाजल्या. बरसात, आवारा, अंदाज, श्री 420, दीदार, चोरी चोरी, मदर इंडिया यासारखे चित्रपट केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका म्हणून नर्गिस यांचा उल्लेख होतो. बॉलिवूडची पहिली ‘क्वीन’ म्हणून नर्गिस दत्त यांना ओळखले जाते. एक नजर टाकुया एका सामान्य तरुणीपासून ते हिरोईन बनण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासावर...

खरे नाव: फातिमा रशीद

जन्म: 1 जून, 1929 रोजी कोलकातामध्ये

आई : जद्दनबाई, भारतीय क्लासिकल गायिका

वडील: उत्तमचंद मूलचंद

अपूर्ण इच्छा : मुलगा संजय दत्तचा पहिला सिनेमा 'रॉकी' बघण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

मृत्यु : वयाच्या 51व्या वर्षी पेंक्रियाटिक कर्करोगाने निधन

आयकॉनिक प्रतिमा: पहिली ओळख 'श्री 420'चे गाणे 'प्यार हूआ इकरार हुआ'मध्ये एका छत्री खाली उभे असलेले नर्गिस आणि राज कपूर. दुसरी, 'मदर इंडिया'मध्ये पुढे झोकून नांगर ओढताना नर्गिस.

काम : अभिनेत्री, समाज सेविका

डॉक्टर बनण्याचे होते स्वप्न...
नर्गिस यांची बालपणी डॉक्टर बनण्याची इच्छा होती. त्या 14 वर्षांच्या असताना दिग्दर्शक महबूब खान यांनी त्यांच्या 'तकदीर' या सिनेमात मोतीलाल यांच्या हिरोईनच्या रुपात त्यांची ऑडिशन घेतली होती. कोणतीही समझ नसताना नर्गिस यांनी डायलॉग्स वाचले आणि काय आश्चर्य सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांनी मान्य केले, की नर्गिसच सिनेमाची हिरोईन होणार. तेव्हा त्यांना रडू कोसळले. त्यांना सिनेमात येण्याची इच्छा नव्हती. तेव्हाच्या काळात सिनेमात काम करणा-यांना वाईट नजरेने बघितल्या जात होते. नर्गिस यांना आदराचे आयुष्य हवे होते.

आई जद्दनबाई यांनी आपल्या 'तलाश-ए-इश्क' सिनेमात नर्गिसकडून काम करून घेतले. 1935 मध्ये बनलेल्या या सिनेमात नर्गिस केवळ 5 वर्षांच्या होत्या. याच सिनेमापासून त्यांचे नाव 'बेबी नर्गिस' पडले. नर्गिस यांच्या फिल्मी करिअरची सुरूवात आई जद्दनबाईंनी केली परंतु नर्गिस यांनी आपल्या पध्दतीने ते संपवले.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या अभिनेत्री...
नर्गिस दत्त पहिल्या अशा अभिनेत्री होत्या ज्यांना भारत सरकारतर्फे मानाचा पद्यश्री पुरस्कार देण्यात आला. त्या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. मुंबईच्या वांद्र्यामध्ये त्यांच्या नावाचा एक रस्ता आहे. दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतेवर बनलेल्या सर्वश्रेष्ठ सिनेमाला 'द नर्गिस दत्त अवॉर्ड' दिला जातो. 1980 मध्ये त्या राज्यसभेच्या खासदारही बनल्या. 'मदर इंडिया', 'अंदाज', 'अनहोनी', 'जोगन', 'आवारा' आणि 'रात दिन'मध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले.

नर्गिस यांच्यासाठी सुनील यांनी मारली होती आगीत उडी
मेहबूब खान यांनी सुनील दत्त यांची ‘मदर इंडिया’ चित्रपटात नर्गिस यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी निवड केली. चित्रपटाच्या सेटवर एक घटना घडली ज्यामुळे सुनील दत्त आणि नर्गिस आयुष्यभरासाठी एकत्र आले. गुजरात येथील बिलीमाेर गावात ‘मदर इंडिया’चे चित्रीकरण सुरू होते. चित्रपटाच्या एका दृश्यात शेतात आग लागते. परंतु या आगीत नर्गिस या खरंच अडकल्या होत्या आणि सुनील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले होते. खरंतर यादरम्यान सुनील देखील खूप भाजले होते. नर्गिस यांनी त्यांची रुग्णालयात खूूप काळजी घेतली होती. आगीच्या घटनेनंतर नर्गिस यांचा सुनील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते.

'मदर इंडिया' नर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा हा सिनेमा. भारतीय महिलेच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या चित्रपटाची कथा फारच दमदार होती. म्हणूनच त्याला ऑस्करसाठी नामांकित करण्यात आले. या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 2001 साली अमिताभ बच्चन यांचेबरोबरच शतकातील अभिनेत्री म्हणुन नर्गिस यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

लग्नानंतर ठोकला होता अभिनयाला रामराम
नर्गिस म्हणाल्या होत्या, 'मी सुरुवातीलाच निश्चय केला होता, की लग्न केल्यानंतर सिनेमांमध्ये काम करणे सोडून देईन. कारण फिल्मी आणि खासगी आयुष्य आपण एकत्र जगू शकत नाही.'

सामाजिक कार्यात होत्या अग्रेसर
त्यांनी नेत्रहीन आणि विशेष मुलांसाठी काम केले. त्या भारतातील पहिल्या स्पास्टिक्स सोसायटीच्या पेट्रन बनल्या. त्यांनी अजंटा आर्ट्स कल्चरल ट्रूप बनवले. त्यामध्ये तेव्हाचे नामवंत अभिनेते आणि गायक सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवत होते. त्यांचे मनोरंजन केले जात होते. बांग्लादेश बनल्यानंतर 1971मध्ये त्यांच्या पहिल्या दलाने तिथे परफॉर्म केले होते.

संजय दत्तचा पहिला सिनेमा 'रॉकी'चा प्रीमिअर 7 मे 1981 मध्ये झाला होता. त्याच्या चार दिवसांआधीच म्हणजे 3 मे रोजी नर्गिस यांचा मृत्यू झाला. प्रीमिअरवेळी त्यांच्या नावाची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.

भारतीय टपाल खात्याने नर्गिस यांच्या प्रतिमेचे टपाल तिकीट काढून त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला.

1980 साली त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. न्युयॉर्क येथे काहीकाळ त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण 3 मे 1981 रोजी त्यांचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...