आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्गिस यांची 40 वी पुण्यतिथी:सुनील दत्त यांनी कारमध्ये घातली होती नर्गिस यांना लग्नाची मागणी, उत्तर न देताच निघून गेल्या होत्या नर्गिस, नंतर असे झाले लग्न

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नर्गिस सुनील यांना 'मदर इंडियाती'ल त्यांच्या ऑनस्क्रीन नावाने (बिरजू) हाक मारत असत.

संजय दत्तची आई आणि गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा जन्म 1 जून 1929 रोजी कोलकाता येथे झाला होता. 3 मे रोजी त्यांची 40 वी पुण्यतिथी आहे. 3 मे 1981 रोजी कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले होते. दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांच्या त्या पत्नी होत्या. सुनील दत्त आणि नर्गिस यांची प्रेमकहाणी अतिशय रंजक होती. 1957 मध्ये आलेल्या मदर इंडिया या चित्रपटात दोघे आई-मुलाच्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर खासगी आयुष्यात दोघे पती-पत्नी झाले. खास गोष्ट म्हणजे नर्गिस सुनील यांना 'मदर इंडियाती'ल त्यांच्या ऑनस्क्रीन नावाने (बिरजू) हाक मारत असत.

पहिल्या भेटीत नर्गिस यांच्याशी काहीच बाेलू शकले नव्हते सुनील
कॉलेजमध्ये असताना सुनील खूप लाजाळू होते. मुली त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा शोधायच्या, परंतु ते त्यांच्यापासून लांब राहायचे. त्याचे म्हणणे होते, त्यांची देखील एक बहीण आहे, म्हणून ते काेणत्याही मुलीसोबत कधीच फ्लर्ट करणार नाही. त्या काळात नर्गिस या स्टार होत्या. त्या आपल्या गाडीत मरीन ड्राइव्हला जायच्या. मरीन ड्राइव्हच्या जवळ लागलेल्या रेलिंगमधून सुनील साहेब नर्गिस यांना पाहायचे, परंतु याबाबत नर्गिस यांना माहीत नव्हते. आणि सुनील मात्र त्यांच्या प्रेमात वेडे झाले हाेते. पहिल्यांदा नर्गिस एका मुलाखतीसंदर्भात सुनील यांच्याशी भेटल्या होत्या, परंतु त्यांना आपल्या समोर पाहून सुनील खूप नर्व्हस झाले होते. त्यामुळे ते त्यांना काहीच प्रश्न विचारु शकले नव्हते. नंतर हा शो रद्द करावा लागला होता.

नर्गिस यांच्यासाठी सुनील यांनी मारली होती आगीत उडी
विमल रॉय यांच्या ‘दो बीघा जमीन’च्या सेटवर नर्गिस यांची सुनील दत्त यांच्याशी दुसऱ्यांदा भेट झाली होती. नर्गिस या बिमल रॉय यांना भेटायला गेल्या होत्या तर सुनील कामासाठी गेले होते. सुनील यांना पाहताक्षणी नर्गिसला मागची गोष्ट आठवली. त्यांना पाहून त्या हसत पुढे निघून गेल्या. यानंतर मेहबूब खान यांनी सुनील यांची ‘मदर इंडिया’ चित्रपटात नर्गिस यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी निवड केली. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आणि पुन्हा सुनील चित्रीकरणादरम्यान नर्गिस यांच्यासमोर नव्हर्स होऊ लागले. त्यावेळी नर्गिस यांनी त्यांना शांत करत चित्रीकरण सुरू झाले. नर्गिसच्या या वर्तणुकीमुळे सुनील दत्त यांचा त्यांच्याकडे ओढा वाढला. चित्रपटाच्या सेटवर एक घटना घडली ज्यामुळे दोघेही एकत्र आले. गुजरात येथील बिलीमाेर गावात ‘मदर इंडिया’चे चित्रीकरण सुरू होते. चित्रपटाच्या एका दृश्यात शेतात आग लागते. परंतु या आगीत नर्गिस या खरंच अडकल्या होत्या आणि सुनील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले होते. खरंतर यादरम्यान सुनील देखील खूप भाजले होते. नर्गिस यांनी त्यांची रुग्णालयात खूूप काळजी घेतली होती. आगीच्या घटनेनंतर नर्गिस यांचा सुनील यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते.

कारमध्ये सुनील यांनी घातली होती लग्नाची मागणी
सुनील यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "एक दिवस त्या माझ्या घरी आल्या होत्या आणि जेव्हा त्या परत जाऊ लागल्या तेव्हा मी म्हणालो - चला मी तुम्हाला घरी सोडतो. यानंतर आम्ही फिएट कारने नेपियन सी रोडमार्गे बाळकेश्वर रोडला पोहोचलो. तिथे मी त्यांना थोडे धाडस करत म्हटले - 'मला तुम्हाला काही सांगायचे आहे.' त्या म्हणाल्या - 'हो बिरजू बोला.' मी त्यांना थेट विचारले- 'तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?' यानंतर गाडीत शांतता पसरली. थोड्या वेळाने त्यांचे घर आले आणि त्या उत्तर न देता निघून गेल्या. त्यानंतर मी विचार केला की, जर नर्गिस जी नाही म्हणाल्या, तर मी फिल्म इंडस्ट्री सोडून माझ्या गावी जाऊन शेती करेन."

सुनील दत्त यांच्या म्हणण्यानुसार, "एकदा मी घरी पोहोचलो तेव्हा माझी बहीण हसत होती. मी तिला काय झाले असे विचारले, तर ती पंजाबीमध्ये म्हणाली - 'पाजी, तुम्ही माझ्यापासून का लपवले?' मी म्हणालो- 'मी तुझ्यापासून काय लपवून ठेवले?' यावर ती म्हणाल्या - 'नर्गिस जीने होकार दिला आहे.' माझा क्षणभर विश्वासच बसला नाही.'

सुनील-नर्गिस यांच्या लग्नामुळे नाराज झाले होते मेहबूब खान
11 मार्च 1958 रोजी सुनील आणि नर्गिस यांनी कोणालाही न सांगता लग्न केले होते, परंतु याबाबत मेहबूब यांना माहीत झाले होते. ते त्यांच्या लग्नामुळे नाराज होते. या दोघांच्या लग्नामुळे त्यांच्या 'मदर इंडिया' चित्रपटावर वाईट परिणाम होऊ शकतो असे त्यांना वाटत होते. नर्गिस यांच्या कुटुंबानेदेखील या लग्नाला विरोध केला होता. नर्गिस यांचे मोठे भाऊ अख्तर यांचा खूप विरोध होता. अख्तर यांना 1959 मध्ये संजय दत्तच्या जन्मानंतर आपली चूक समजली. नर्गिस यांना सर्व सुख सुविधा मिळाव्या म्हणून सुनील यांनी 58 पाली हिल येथे मोठा बंगला घेतला. सुनील यांना बंगला परवडत नव्हता. काही तडजोडीनंतर बंगल्याचे मालक मनू सुभेदार 1 सप्टेंबर 1957 ला त्यांना बंगला हप्त्याने देण्यास तयार झाले होते.

सुनील आणि नर्गिस यांना संजय, नम्रता आणि प्रिया ही तीन मुले आहेत. 3 मे 1981 रोजी संजय दत्तचा पहिला चित्रपट 'रॉकी'च्या रिलीजच्या चार दिवसांपूर्वीच नर्गिस यांचे कॅन्सरने निधन झाले होते. 'रॉकी'च्या प्रीमिअरला नर्गिस यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...