आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआलिया सिद्दीकीने अभिनेता आणि तिचा पुर्वश्रमीचा पती नवाजुद्दीन सिद्दीकीवर अनेक गंभीर आरोप केले होते. आता मात्र ती स्वतःच एका मोठ्या संकटात सापडली आहे. एकेकाळची तिची जवळची मैत्रीण असलेल्या मंजू गढवाल हिने तिला पैशांच्या व्यवहाराप्रकरणी न्यायालयात खेचले आहे.
मंजूचा आरोप आहे की, आलियाने तिच्या कुटुंबाकडून 50 लाखांपेक्षा अधिकचे कर्ज घेतले होते, पण त्याची परतफेड तिने आतापर्यंत केलेली नाही. आलियाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, आलियाची परिस्थिती सध्या ठिक नसून ती लवकरच पैसे परत करेल.
चित्रपट बनवण्यासाठी घेतले होते 50 लाख, चार वर्षांपासून परत केले नाहीत पैसे
हे प्रकरण चार वर्षे जुने आहे. आलियावर आरोप करताना मंजू गढवाल म्हणाली, 'चार वर्षांपूर्वी आलियाने माझ्या आई-वडिलांकडून 50 लाखांपेक्षा जास्त पैसे घेतले होते. चित्रपट निर्मितीसाठी तिला तो पैसा हवा होता. त्यातील काही रक्कम तिने परत केली, पण आजही तिच्याकडे आमचे 27.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम थकीत आहे. सोबतच तिला त्या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याला 7 लाख रुपयेही द्यायचे आहेत.
मंजू म्हणाली, 'गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाकडून धनादेश देण्यात आला होता, परंतु तो बाऊन्स झाला. अखेर मनसे पक्षप्रमुख शालिनी ठाकरे यांच्या घरी बैठक झाली. यावेळी आलिया आणि तिचे वकील रिझवान सिद्दीकीही उपस्थित होते. तिथे आलिया माझे पैसे 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत परत करेल, असे ठरले होते. पण आता मार्च महिनाही निघून जात आहे, पण माझ्या आई-वडिलांचे पैसे अजून येणे बाकी आहे. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. मी तिला डिमांड नोटीस पाठवली आहे.'
आलियाचे वकील म्हणाले - परिस्थिती सुधारताच रक्कम परत करू
दुसरीकडे, आलियाचे वकील रिझवान सिद्दीकी म्हणाले, 'माझ्या क्लायंटला रक्कम परत करायची आहे. तिने पैसे परत करण्यासाठी नकार दिलेला नाही. पण सध्या आलिया हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे पैसे परत करायला वेळ लागतोय.'
नवाजची पुर्वाश्रमीची पत्नी आर्थिक समस्यांना तोंड देत आहे
सूत्रांच्या माहितीनुसार, आलिया सिद्दीकीची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक आहे. ती आपल्या भाचीसोबत मुंबईत राहतेय. काही दिवसांपूर्वी तिने दिव्य मराठीसोबत संवाद साधताना सांगितले होते की, 'मी येथे माझ्या भाचीसोबत राहतेय, जी स्वतः मुंबईत तिच्या भावासोबत संघर्ष करत आहे. ती कॉस्च्युम विभागात काम करते. तिच्या एका खोलीत मी माझ्या मुलांसह राहतेय. मी लोकांकडे मदत मागत आहे जेणेकरून मला आणि माझ्या मुलांना सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडता येईल.' रिपोर्ट्सनुसार, आलिया देखील सध्या इंडस्ट्रीत कामाच्या शोधात आहे.
चव्हाट्यावर आले आलिया-नवाजुद्दीन यांच्यातील भांडण
अलीकडेच आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीवर त्याने तिला मुलांसह मध्यरात्री घराबाहेर काढल्याचा आरोप केला होता. आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिने सांगितले की, नवाजने त्याच्या रक्षकांच्या मदतीने तिला आणि तिच्या मुलांना घरात प्रवेश दिला नाही.
आलियाच्या म्हणण्यानुसार, वर्सोवा पोलिस ठाण्यातून परतल्यानंतर तिला घरात प्रवेश दिला गेला नाही. आलिया म्हणते की, एक बाप आपल्या मुलांसोबत असे करू शकतो यावर तिचा विश्वास बसत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.