आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दोन्ही मुलांची कस्टडी सध्या त्याची पुर्वाश्रमीची पत्नी आलियाकडे आहे. तसेच मुलांना शिक्षणासाठी दुबईला पाठवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, आता नवाजच्या मुलीला दुबईला जाण्याची इच्छा नसल्याचे वृत्त आहे. तिथे छळ होण्याची भीती तिला सतावत असून पालकांमधील वादाचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया मुलीसाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून थेरपी सेशनही घेत आहे.
नवाजची मुलगी शोरा मानसिकरित्या अस्वस्थ
मुंबई उच्च न्यायालयाने 3 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत सांगितले की, दोन्ही मुलांचा ताबा 45 दिवस आलियाकडे असेल. 45 दिवसांनंतर कोर्टात या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. आता ETimes च्या वृत्तानुसार, नवाजची मुलगी शोरा मानसिकरित्या अस्वस्थ आहे.
नवाजचा भाऊ शमास सिद्दीकी यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शमासने ट्विटमध्ये लिहिले, 'त्याच्यासाठी (नवाजुद्दीन) आता मुलेही महत्त्वाची राहिली नाहीत. आता मुलांना मानसोपचार तज्ज्ञांना दाखवण्याची वेळ आली आहे. दोन्ही मुले घाबरली असून त्यांना दुबईत शिक्षण घेण्याची इच्छा नाही. दुबईला जाण्यासाठी दबाव का टाकत आहात? तिला (आलिया) दुबईतही पैशांची गरज होती आणि इथेही आहे,' असे शमास म्हणाला आहे.
2021 मध्ये आलिया मुलांसह दुबईला गेली, वाद वाढल्यानंतर परत आली
2021 मध्ये आलिया तिच्या दोन्ही मुलांसह दुबईला गेली होती. नवाजच्या घरीच सर्वजण राहत होते. मुलांचे शिक्षणही सुरू होते. पण नवाज आणि आलियामध्ये वाद सुरू झाल्यावर आलिया भारत सोडून दुबईला गेली. नवाज आपल्याला पैसे देत नाही, तसेच मानसिक छळ करत असल्याचा आरोप आलियाने केला होता.
भारतात आल्यानंतर आलिया नवाजच्या आईच्या घरी गेली. तिथेही तिचा सासूशी वाद झाला. आलियाने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याची तक्रार नवाजच्या आईने पोलिसांत दाखल केली. आपल्याला नवाजच्या मालमत्तेतून बेदखल केले जात असल्याचा आरोप आलिया केला आहे.
नवाजवर बलात्काराचा आरोप लावला, नवाजने मानहानीचा खटला दाखल केला
यानंतर आलियाने नवाजवर अनेक गंभीर आरोप केले. तिने नवाजवर बलात्काराचा आरोपही लावला. आलियाने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, नवाजने तिला मुलांसह घरातून हाकलून दिले आहे आणि आता ती तिच्या भाचीसोबत एका खोलीच्या घरात राहत आहे. या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून नवाजने आलियाविरोधात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला होता.
काही दिवसांपूर्वीच नवाजने आलियाला तडजोडीसाठी पत्र पाठवले होते. आपल्या मुलांना भेटण्याची परवानगी दिल्यास आलियाविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला परत घेणार असल्याची अट नवाजने घातली होती. मात्र आलियाने तडजोड करण्यास नकार दिला.
मुलांसाठी दरमहा 10 लाख रुपये द्यायचो, आलिया ते पैसे उडवायची - नवाज
नवाजने याप्रकरणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडली होती. त्याने लिहिले होते, 'आलियाने पैसे मागण्याच्या बहाण्याने गेल्या 4 महिन्यांपासून मुलांना दुबईत सोडले होते. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी मी तिला गेल्या 2 वर्षांपासून दरमहा 10 लाख देत होतो. जेव्हा ती माझ्या मुलांसोबत दुबईला गेली, तेव्हा मी तिला शाळेची फी, मेडिकल आणि प्रवासखर्च सोडून दरमहा 5-7 लाख रुपये पाठवायचो,' असा खुलासा नवाजने केला आहे.
त्याने पुढे सांगितले, 'मी तिच्या 3 चित्रपटांना फायनान्स केले होते, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये होती. मी हे केले कारण ती माझ्या मुलांची आई आहे. मुलांसाठी तिला एक लक्झरी कारही दिली, पण तिने ती विकली आणि त्यातून मिळालेले सर्व पैसे तिने स्वतःवर खर्च केले.'
नवाज म्हणाला, 'मी मुंबईतील वर्सोवा येथे मुलांसाठी सी-फेसिंग अपार्टमेंटही घेतले होते, जेणेकरून मुले व्यवस्थित राहू शकतील. मी त्यांच्यासाठी दुबईत घरही घेतले. आलियाला फक्त जास्त पैसे हवे होते, त्यामुळे तिने माझ्यावर आणि माझ्या आईवर आरोप केले आणि केसही दाखल केली. यापूर्वीही ती अशीच वागली आणि पैसे मिळाल्यानंतर तिने केस मागे घेतली होती,' असे नवाजने आपल्या पोस्टमध्ये सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.