आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात आलियाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी तिने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले होते. दिव्य मराठीसोबत झालेल्या चर्चेदरम्यान आलियाने घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्याच्या आपल्या निर्णयाविषयी सांगितले. सोबतच या प्रकरणाशी संबंधित बर्याच गोष्टीही शेअर केल्या.
मुलांसाठी मी माझ्या आनंदाशी तडजोड करायला तयार आहे
आलिया म्हणाली, "आतापर्यंत माझ्या आणि नवाजच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत. आणि हे नाते पुर्णपणे संपुष्टात येण्यापूर्वी आम्ही आमच्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याच्या विचार केला आहे. माझ्यासाठी हा निर्णय घेणे इतके सोपे नव्हते. एकदा संबंधात वितुष्ट निर्माण झाल्यावर ते पुर्ववत होणे सोपे नाही. परंतु मी माझ्या मुलांच्या आनंदासाठी सर्व काही करू शकते. माझा लढादेखील मुलांसाठीच सुरू झाला होता, ते माझे आयुष्य आहेत. जर ते मी आणि नवाज एकत्र आल्यामुळे आनंदी असतील तर मग त्यांच्या आनंदापेक्षा माझ्यासाठी दुसरे काहीच महत्त्वाचे नाही. मी माझ्या मुलांसाठी माझा आनंद आणि विचार यांच्याशी तडजोड करण्यास तयार आहे."
नवाजने वडिलांचे प्रत्येक कर्तव्य बजावले
आलिया पुढे म्हणाली, "मी गेल्या एक वर्षापासून नवाजला भेटलेले नाही. मात्र मुलांबद्दल आमचे फोनवर बोलणे सुरु असते. या एका वर्षामध्ये मला असे वाटले की मुले त्यांच्या वडिलांना खूप मिस करत आहेत, त्यांना वडिलांची गरज आहे. याकाळात जेव्हा मी कोविडमुळे आजारी होते, तेव्हा नवाजने माझी खूप चांगली काळजी घेतली. मुलांना अंघोळ घालण्यापासून ते त्यांच्या अभ्यासापर्यंत सगळ्या गोष्टी केल्या. इतकेच नाही तर त्यांना शूटिंग सेटवरही सोबत घेऊन गेला. नवाजने प्रत्येक जबाबदारी अतिशय चोख बजावली. नवाजने आजवर जेवढा वेळ मुलांबरोबर घालवला नाही, तेवढा या वर्षभरात एकत्र घालवला. त्यालाही याची जाणीव झाली असावी. त्याने वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली, हे पाहून मी माझ्या नात्यास पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतला," असे आलियाने सांगितले.
मी माझा घटस्फोट अर्ज मागे घेतला आहे
आलिया म्हणाली, "वडिलांव्यतिरिक्त नवाजने पतीचीही जबाबदारी चांगली निभावली. आमच्यात मदभेद असूनही त्याने माझ्या आजारपणात माझी काळजी घेतली. घटस्फोटाचा खटला चालू असूनही, तो नेहमी माझ्या तब्येतीविषयी जाणून घेण्यासाठी कॉल करत होता. मी त्याच्याविरोधात तक्रार दिली, याची जाणीव त्याने मला कधीच होऊ दिली नाही. त्याने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली नाही, किंवा माझ्यासाठी कोणती अडचणही निर्माण केली नाही. त्यामुळे मी माझा घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला आहे."
पर्सनल इगो नात्यात आणू इच्छित नाही
आलिया म्हणाली, "या एका वर्षात मला जाणवलं की स्त्रीची स्वत:ची वेगळी ओळख असणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा एखाद्याला दुसर्याच्या ओळखीवर जगावे लागते, तेव्हा स्वतःची ओळख टिकवून ठेवून नाते पुढे न्यायला हवे. कधीकधी आपण आपल्या इगोमुळे नाती संपवून टाकतो, जे चुकीचे आहे. माझ्या बाबतीत घडलेल्या बर्याच चुकीच्या गोष्टींमुळे मी हे पाऊल उचलले होते. सेलिब्रिटी असल्याने मीडियात या गोष्टींची चर्चा सुरू झाली, ज्या मी थांबवू शकले नाही. माझा लढा माझ्या मुलांसाठी होता आणि जर ते आनंदी असतील तर मग मी माझा वैयक्तिक इगोला मध्ये आणू शकत नाही," असे आलियाने स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.