आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिरुपा रॉय… ज्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिकांसाठी ओळखले जाते. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या निरुपा रॉय यांचे त्यांच्या वडिलांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी लग्न लावून दिले होते. त्यांच्या पतीला अभिनेता व्हायचे होते पण योगायोगाने निरुपा रॉय फिल्मी दुनियेत आल्या. प्रत्येक पावलावर त्यांना त्यांच्या पतीचा पाठिंबा मिळाला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्या देवीच्या भूमिकेत इतक्या लोकप्रिय झाल्या की, लोक त्यांची पूजा करु लागले होते. परिस्थिती अशी होती की, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घराबाहेर लोकांची मोठी रांग लागायची. करिअरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये निरुपा रॉय आईच्या भूमिकेत दिसल्या.
संवेदनशील कलाकारांमध्ये गणल्या जाणा-या निरुपा रॉय यांनी पाच दशकांच्या करिअरमध्ये तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयचा ठसा उमटवला. त्यांच्याविषयी जाणून घेऊया बरंच काही...
वडील रेल्वे कर्मचारी होते, वयाच्या 14 व्या वर्षी झाले होते लग्न
निरुपा रॉय यांचा जन्म 4 जानेवारी रोजी गुजरातमधील वलसाड येथे गुजराती चौहान कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील किशोर चंद्र बुलसारा हे रेल्वेत कर्मचारी होते. चित्रपटात येण्यापूर्वी निरुपा यांचे नाव कांता चौहान होते. त्यांचे आई-वडील त्यांना प्रेमाने 'चिबी' म्हणत. कांता उर्फ निरुपा शाळेत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न कमल रॉय यांच्याशी लावून दिले होते. त्यावेळी निरुपा या अवघ्या 14 वर्षांच्या होत्या. लग्नानंतर कांता हे नाव बदलून कोकिला असे ठेवण्यात आले. 1945 मध्ये त्या त्यांच्या पतीसोबत मुंबईत आल्या.
चित्रपटात काम केल्यामुळे वडील आयुष्यभर बोलले नाहीत
निरुपा रॉय यांचे पती कमल हे रेशन इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांना अभिनेता व्हायचे होते, म्हणून तो ऑडिशन्स देत असतं. लग्नाच्या 4 महिन्यांनंतर कमल एका गुजराती चित्रपटाच्या ऑडिशनला गेले होते. त्यांनी निरुपा यांनाही सोबत नेले होते. चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी दिग्दर्शक नायिकेच्या शोधात होते. दिग्दर्शकाने कमल यांना रिजेक्ट केले, पण निरुपा यांना मुख्य भूमिकेची ऑफर दिली. पतीच्या सांगण्यावरून निरुपा यांनी त्यांचा पहिला गुजराती चित्रपट 'रनकदेवी' केला होता.
एवढेच नाही तर त्या चित्रपटासाठी त्यांनी आपले नाव कोकिला बलसारा वरून निरुपा रॉय असे ठेवले. त्या काळात मुलींनी चित्रपटात काम करणे वाईट मानले जात असे. ही बातमी समजताच निरुपा यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. विशेषतः त्यांच्या वडिलांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. निरुपा रॉय एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, "मी चित्रपट साइन केल्यानंतर माझे वडील मला म्हणाले होते की, ते माझ्यासोबतचे नाते संपुष्टात आणतील. कालांतराने सर्वांनी माझे फिल्मी करिअर स्वीकारले होते, पण वडील शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या शब्दांवर ठाम राहिले. माझी आई मला गुपचूप भेटत असे.'
लोक देवी म्हणून पूजा करु लागले होते
निरुपा यांनी आपल्या करिअरची सुरुवात गुजराती चित्रपटाद्वारे केली होती. मात्र त्यांची मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट होता 'हमारी मंजिल'. 1951 मध्ये रिलीज झालेल्या 'हर हर महादेव' या चित्रपटात त्यांनी वठवलेली पार्वतीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. चित्रपटाच्या यशानंतर त्या प्रेक्षकांमध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. त्यानंतर लगेचच त्यांना 'वीर भीमसेन' या चित्रपटात द्रौपदीची भूमिका मिळाली.
1951मध्ये आलेल्या 'सिंदबाद दी सेलर' या चित्रपटात त्यांना अॅक्शन भूमिका वठवण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी तलवारबाजी आणि अॅक्शन केले होते. 50 आणि 60 च्या दशकात निरुपा या जास्तीत जास्त पौराणिक चित्रपटांमध्ये झळकल्या. 1953 मध्ये रिलीज झालेला 'दो बीघा जमीन' हा निरुपा रॉय यांचा आवडता चित्रपट होता. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात त्यांनी एका शेतक-याच्या पत्नीची भूमिका केली होती. यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
10 चित्रपटांमध्ये बिग बींची ऑनस्क्रीन आई
खरं तर बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते. निरुपा यांनी हिंदी चित्रपटांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. 'दीवार' चित्रपटामधील 'मेरे पास माँ है' हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे. यश चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती.
विशेष म्हणजे बिग बींची ऑनस्क्रिन आई म्हणजे निरुपा रॉय अशी त्यांची इमेज तयार झाली होती. त्यांनी साकारलेल्या आईच्या सर्वच भूमिका गाजल्या. ‘खून पसीना’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर अकबर एंथोनी’, ‘सुहाग’, ‘इंकलाब’, ‘गिरफ्तार’, ‘मर्द’ आणि‘गंगा-जमुना-सरस्वती’ यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती. 90 च्या दशकात रिलीज झालेल्या 'लाल बादशाह' या चित्रपटात त्या शेवटच्या अमिताभ यांच्या आईची भूमिकेत झळकल्या होत्या.
सुनेच्या खोट्या आरोपांमुळे निरुपा रॉय यांच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ आली होती
रुपेरी पडद्यावर दुःखी आई आणि प्रेमळ सासूची भूमिका साकारणाऱ्या निरुपा रॉय यांना खऱ्या आयुष्यातही खूप संघर्ष करावा लागला. खऱ्या आयुष्यात त्यांना योगेश आणि किरण ही दोन मुले आहेत.
त्यांच्या धाकट्या मुलाच्या पत्नीचे नाव उना रॉय होते. लग्नानंतर काही काळातच धाकट्या सुनेने सासू निरुपा रॉय आणि सासरे कमल यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला. परिस्थिती अशी निर्माण झाली होती की, निरुपा रॉय यांना अटक करण्याची वेळ आली होती. निरुपा रॉय यांनी त्यांना घरातून हाकलून दिल्याचा आरोपही त्यांच्या सुनेने केला होता.
13 ऑक्टोबर 2004 रोजी निरुपा रॉय यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची दोन्ही मुले योगेश आणि किरण मालमत्तेसाठी एकमेकांशी भांडत होती. निरुपा रॉय यांनी 1963 मध्ये मुंबईतील नेपियन सी रोड येथे खरेदी केलेल्या 10 लाख रुपयांच्या मालमत्तेवरून हा संपूर्ण वाद होता. आता त्याची किंमत 100 कोटींच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. निरुपा रॉय यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती कमल यांचा या मालमत्तेवर हक्क होता. मात्र कमल यांच्या निधनानंतर दोन्ही मुलांमध्ये त्यासाठी भांडण सुरू आहे. कोर्टात हा वाद सुरू होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.