आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याचा माफीनामा:'माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते', विल स्मिथची पोस्ट चर्चेत; पत्नीची खिल्ली उडवल्याने ख्रिस रॉकच्या मारली होती थोबाडीत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विल स्मिथने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा सोमवारी लॉस एंजिलिसस्थित डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ऑस्कर सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहते, मात्र यंदा या सोहळ्याला गालबोट लागले. 'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणा-या अभिनेता विल स्मिथने कार्यक्रमाचा होस्ट ख्रिस रॉकवरच्या कानशिलात लगावली होती.

हा प्रकार घडल्यानंतर सुरुवातीला सगळ्यांना हा विनोद असावा, असे वाटले होते. पण नंतर जे व्हिडिओ समोर आले, त्यात विल स्मिथ रडताना दिसला होता. त्यानंतर हा विनोद नसल्याचे सगळ्यांना समजले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. मी माझी हद्द ओलांडली, मी चुकीचा होतो, असे त्याने म्हटले आहे.

यापूर्वीही ऑस्कर सोहळ्यात दिलेल्या भाषणातही विलने घडलेल्या प्रकारावर खेद व्यक्त करत ख्रिससह सगळ्यांची माफी मागितली होती. आता त्याने इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेवर भाष्य केले आहे.

काय म्हणाला विल स्मिथ?
विलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, "कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझ्या खर्चाची खिल्ली उडवणे हा माझ्या कामाचा भाग आहे. पण पत्नी जॅडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले. ख्रिस या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाची जाहीर माफी मागू इच्छितो. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग पडला आहे, याचा मला मनापासून खेद वाटतो." विल स्मिथने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ऑस्कर सोहळ्यात नेमके काय घडले होते?
ऑस्कर सोहळ्यासाठी स्टेजवर आलेल्या कॉमेडियन ख्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथची खिल्ली उडवली. पण त्याची ही मस्करी स्मिथला सहन झाली नाही आणि त्याने मंचावर येत ख्रिसच्या कानशिलात लगावली. रॉकने G.I Jane 2 या चित्रपटाबाबत बोलताना स्मिथची पत्नी जॅडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. यावेळी तो जॅडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला, अशी कमेंट ख्रिसने केली. यावरुन विल स्मिथ भडकला आणि त्याने रॉकच्या थोबाडीत लगावली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर विलचे पाणावले होते डोळे
'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर स्वीकारताना विल स्मिथ भावूक झाला होता. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल स्मिथ म्हणाला, “रिचर्ड विलियम्स हे त्यांच्या कुटुंबाचे रक्षक होते. माझ्या आयुष्यातील यावेळी देवाने मला या जगात काय करण्यासाठी बोलावले आहे, हे पाहून मी भारावलो आहे. मला अकादमीची माफी मागायची आहे. बाकी नामांकन मिळलेल्या लोकांची मला माफी मागायची आहे. हा एक सुंदर क्षण आहे आणि खरं सांगायचं तर आज मी ऑस्कर जिंकलो म्हणून रडत नाही तर आज जे झालं त्यासाठी हे आहे. मी रिचर्ड विलियम्स यांच्यासारखाच वेड्या वडिलांसारखा आहे. प्रेम तुम्हाला अशा गोष्टी करण्यास भाग पाडतो.” आशा करतो की अकादमी मला पुन्हा आमंत्रित करेल, असे स्मिथ शेवटी म्हणाला होता.

विलची पत्नी देतेय आजाराशी झुंज
विलची पत्नी जॅडा हिने टक्कल केले आहे. पण ही कोणतीही स्टाइल नसून ती Alopecia नावाच्या टकल पडण्याच्या एका आजारामुळे त्रस्त आहे. त्यामुळे तिच्या डोक्यावर केस नाहीत. त्यामुळे विलला ख्रिसने केलेली मस्करी आवडली नाही, आणि त्याने थेट मंचावर जात ख्रिसला धडा शिकवला.

बातम्या आणखी आहेत...