आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ऑस्करसाठी चित्रपटगृहात प्रदर्शनाच्या अटीत प्रथमच सवलत; फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांनाही नामांकन

कॅलिफाेर्नियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेनाने जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुरस्कारालाही परंपरा बदलण्यास भाग पाडले

काेराेना काळात जगात सर्वकाही ठप्प झाल्याने सर्व मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहेदेखील बंद होती. प्रेक्षक घरातच असल्याने अनेक चित्रपटांचे प्रदर्शन टाळण्यात आले. यामुळे ओटीटी (ओव्हर द टाॅप) प्लॅटफॉर्म गजबजला होता. आता चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारानेही ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अटींमध्ये सूट दिली आहे. प्रथमच अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट‌्स अँड सायन्सेस या ऑस्करच्या आयोजक संस्थेने केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागात नामांकनाची परवानगी दिली आहे. आतापर्यंत चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटालाच सर्वोत्कृष्ट गटात नामांकन मिळत होते.

काेराेनामुळे आधीच पुरस्कार समारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे हा समारंभ आता पुढील वर्षी 25 एप्रिल रोजी होईल. यात जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रदर्शित चित्रपटांना समाविष्ट केले जाईल. नेटफ्लिक्सला या निर्णयाचा जास्त फायदा होण्याची आशा आहे. त्यांचे जवळपास 22 चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत असले तरी, तीन चित्रपटांना यावेळी ऑस्करसाठी नामांकन मिळणे निश्चित मानले जात आहे. या चित्रपटांत गॅरी गोल्डमनची भूमिका असलेला ‘मँक’, जॉर्ज क्लूनी अभिनीत व दिग्दर्शित ‘द मिडनाइट स्काय’ आणि अॅमी अॅडम्स व ग्लेन क्लाेज यांचा ‘हिलबिली एल्गी’ यांचा समावेश आहे. नेटफ्लिक्सने ऑस्कर 2020 मध्ये 24 नामांकन मिळवत 2 ऑस्कर पुरस्कार मिळवले होते.

कान्स 5 महिने उशिरा झाला, गोल्डन ग्लोबही स्थगित
काेराेनामुळे 12 ते 23 मे दरम्यान होणारा 73 वा कान्स चित्रपट महोत्सव स्थगित करावा लागला. नुकताच 27 ऑक्टोबरला लहान स्वरुपात तीन दिवसांसाठी आयोजित झाला. तसेच गोल्डन ग्लोब पुरस्कारही टाळण्यात आला आहे. वर्षाच्या पहिल्या रविवारी होणारा हा समारंभ पुढील वर्षी 28 फेब्रुवारीला कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्समध्ये होईल.

भारताकडून मराठी चित्रपट ‘द डिसाइपल’ची शक्यता
अमेरिकेचे मॅगेझिन व्हरायटीनुसार भारताकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट गटात मराठी चित्रपट ‘द डिसाइपल’ला ऑस्करमध्ये नामांकन मिळण्याची शक्यता आहे. मीरा नायर यांच्या ‘माॅन्सून वेडिंग’ नंतर हा व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित दुसरा चित्रपट आहे. भारतात लॉकडाऊनच्या आधी 29 चित्रपट प्रदर्शित झाले होते. तर सुमारे 41 चित्रपट तयार आहेत. यातील अनेकांचे प्रदर्शन 2021 पर्यंत टाळण्यात आले आहे.