आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक किस्से:शाहरुखला इम्रान खान यांनी सुनावले होते खडे बोल, रेखा-झीनत अमानसोबत जोडले गेले नाव, हिरो बनण्याचीही होती ऑफर

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानच्या इस्लामबाद कोर्ट रूममधून इम्रान खान यांना रेंजर्सकडून अटक करण्यात आली. आता अटकेत असलेल्या इम्रान यांचे एकेकाळी बॉलिवूडशी घट्ट नाते होते. शाहरुख खान इम्रान यांचा चाहता आहे. तसेच इम्रान यांचे नाव रेखा आणि झीनत अमान यांसारख्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. रेखासोबत ते लग्न करणार असल्याचीही चर्चा एकेकाळी रंगली होती. इम्रान क्रिकेटर असताना देव आनंद त्यांना त्यांच्या चित्रपटात हिरो म्हणून साईन करण्यासाठी इंग्लंडला पोहोचले होते.

वाचा, इम्रान यांचे बॉलिवूड कनेक्शनचे काही रंजक किस्से...

शाहरुख इम्रान यांचा चाहता होता, ऑटोग्राफ घ्यायला गेल्यावर सुनावले होते खडेबोल

अभिनेता शाहरुख खानने कॅपिटल टॉक विद हामिद मीरमध्ये हा किस्सा शेअर केला आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा इम्रान खान पाकिस्तानी क्रिकेटर होते, तर शाहरुख खान इंडस्ट्रीत एन्ट्री झाली नव्हती. तरुण शाहरुख इम्रानचा मोठा चाहता होता. शाहरुख म्हणाला, इम्रान खान एका मॅचसाठी भारतात आले होते. पाकिस्तानचा सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर होता, जिथे पाकिस्तानी संघ पराभवाच्या मार्गावर होता. संघाला इम्रानकडून खूप आशा होत्या, मात्र ते अवघ्या 30 धावा करून बाद झाले.

2008 मध्ये मुंबईत झालेल्या ट्रॅव्हल विथ स्टाइलच्या बक्षीस समारंभात शाहरुख खानला पहिल्यांदा इम्रान खानला भेटण्याची संधी मिळाली होती.
2008 मध्ये मुंबईत झालेल्या ट्रॅव्हल विथ स्टाइलच्या बक्षीस समारंभात शाहरुख खानला पहिल्यांदा इम्रान खानला भेटण्याची संधी मिळाली होती.

इम्रान जेव्हा स्टेडियम सोडून जात होते, तेव्हा शाहरुख ऑटोग्राफ घेण्यासाठी त्यांच्या जवळ पोहोचला. आऊट झाल्यानंतर हताश झालेल्या इम्रान यांनी आपला सगळा राग शाहरुखवर काढला आणि त्याला फटकारले आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. यामुळे शाहरुख दुखावला गेला होता.

शाहरुख खान जेव्हा स्टार झाला तेव्हा त्याला इम्रान खानला भेटण्याची संधी मिळाली. शाहरुखने इम्रानकडे त्यांची तक्रार करत त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची त्यांना आठवण करुन दिली होती. त्यावेळी इम्रान हसले होते.

अमिताभ बच्चन, आमिर खान यांनी केली होती इम्रान खान यांना मदत

90 च्या दशकात क्रिकेटर असताना इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये कॅन्सर हॉस्पिटल बांधले होते, त्यासाठी अनेक भारतीय स्टार्सनी उदार हस्ते देणगी दिली होती. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, आमिर खान यांचाही या उपक्रमात इम्रान खान यांना मदत करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

इम्रान खान, देव आनंद, मनोज कुमार यांच्यासोबत मुंबईत एका पार्टीसाठी भारतात आले होते.
इम्रान खान, देव आनंद, मनोज कुमार यांच्यासोबत मुंबईत एका पार्टीसाठी भारतात आले होते.

रेखासोबत अफेअरची बातमी, लग्नाचे संकेत दिले

इम्रान खान उत्कृष्ट क्रिकेटर तर होतेच, पण त्यासह ते त्यांच्या लव्ह लाइफमुळेही चर्चेत होते. एकेकाळी त्यांचे नाव प्रसिद्ध अभिनेत्री रेखासोबत जोडले गेले होते. 1985 मध्ये रेखा यांना इम्रानसोबत लग्न करायचे आहे, अशी चर्चा रंगली होती. स्टार रिपोर्ट नावाच्या एका वृत्तपत्रात दोघांच्या लग्नावर एक दीर्घ लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. लेखानुसार, एप्रिल 1985मध्ये इम्रान मुंबईत होते आणि त्यांनी हा संपूर्ण वेळ रेखा यांच्यासोबत घालवला होता.

स्टार वृत्तपत्राचे पेपर कटिंग.
स्टार वृत्तपत्राचे पेपर कटिंग.

दोघेही नाईट क्लबमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. जनरलच्या रिपोर्टनुसार, रेखा यांच्या आईने त्यांच्या मुलीसाठी इम्रान खानच योग्य जोडीदार असल्याचे सांगितले होते. रेखा यांच्यासाठी इम्रान चांगला पर्याय आहे का हे विचारण्यासाठी त्या दिल्लीतील एका ज्योतिषाकडे गेल्या होत्या. मात्र, रेखा आणि इम्रान यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

इम्रान म्हणाले होते की, कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करणार नाही

एका मुलाखतीत इम्रान खान म्हणाले होते, अभिनेत्रींसोबत वेळ घालवणे काही काळासाठी चांगले असते. मी काही काळ त्यांच्या सहवासाचा आनंद घेतो आणि मग पुढे जातो. मी कोणत्याही चित्रपट अभिनेत्रीशी लग्न करणार नाही.

रेखाच्या आधी झीनत अमानशी जोडले गेले होते नाव, प्लेबॉयचा मिळाला होता टॅग

1979 मध्ये, इम्रान खान यांनी बंगळुरूमधील क्रिकेट स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या मित्रांसोबत 27 वा वाढदिवस साजरा केला होता. तेव्हा अशी बातमी आली होती की त्यांनी त्याची प्रेयसी झीनत अमानसोबत हा वाढदिवस साजरा केला. झीनत अमानशी रिलेशनशिपमध्ये असल्याने त्यांना प्लेबॉय म्हटले जायचे. मात्र दोघांनीही कधीच त्यांचे नाते स्वीकारले नाही.

देव आनंद यांनी दिली होती चित्रपटात काम करण्याची ऑफर

इम्रान खान यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी त्यांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती, परंतु इम्रान यांनी ती ऑफर नाकारली होती. त्यांची ही मुलाखत भारतीय वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली होती. भारतातील एका महान अभिनेत्याने मला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती यावर तुमचा विश्वास बसणार नाही, असे इम्रान म्हणाले होते. माझे मन वळवण्यासाठी त्यांनी इंग्लंड गाठले होते. खूप विचारल्यानंतर इम्रान यांनी त्यांचे नाव उघड केले होते. त्यांनी सांगितले की, हा अभिनेता दुसरा कोणी नसून देव आनंद आहे. देव आनंद यांनीही त्यांच्या रोमान्सिंग विथ लाइफ या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केला आहे.

इम्रान यांनी नाकारली होती चित्रपटाची ऑफर

देव आनंद यांनी खूप समजूत घातल्यानंतरही इम्रान यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ते म्हणाले होते, माझ्यासाठी हे खूप विचित्र होते. मी एक चांगला क्रिकेटर आहे, याचा अर्थ असा नाही की मी चांगला अभिनेता होऊ शकतो.

देव आनंद व्यतिरिक्त इस्माईल मर्चंट यांनीही इम्रानला चित्रपटाची ऑफर दिली होती. मी शाळेच्या नाटकातही अभिनय केला नाही, मग मी चित्रपटात कसा अभिनय करू, असे म्हणत इम्रान यांनी नकार दिला होता.

फंड रेजिंग कार्यक्रमादरम्यान दिलीप कुमार क्रिकेटर इम्रान खान आणि कॉमेडियन मोईन अख्तरसोबत.
फंड रेजिंग कार्यक्रमादरम्यान दिलीप कुमार क्रिकेटर इम्रान खान आणि कॉमेडियन मोईन अख्तरसोबत.

दिलीप कुमार यांनी लंडन आणि पाकिस्तान गाठून केली होती इम्रान यांना मदत

इम्रान यांनी त्यांच्या आईच्या नावावर कॅन्सर हॉस्पिटल बांधायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत दिलीप कुमार हे पहिले व्यक्ती होते जे मदतीसाठी पुढे आले होते. निधीसाठी सुरुवातीची 10 टक्के रक्कम उभी करणे फार कठीण होते, त्यामुळे दिलीप कुमार यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही तर निधी उभारणी कार्यक्रमाचा एक भाग देखील झाले. दिलीप कुमार यांनी पाकिस्तान आणि लंडन गाठले आणि लोकांना निधी देण्याचे आवाहन केले होते.

पंतप्रधान इम्रान यांचा मेल अभिनेता इम्रान खानपर्यंत पोहोचला

2018 मध्ये 'जाने तू या जाने ना' चित्रपटाचा अभिनेता इम्रान खानला एक विचित्र मेल आला होता. खरंतर हा मेल अभिनेता इम्रान खानसाठी नसून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी होता. त्या मेलमध्ये लिहिले होते, "प्रिय पंतप्रधान, एक यशस्वी नेता योग्य वेळी योग्य निर्णय घेतो. तो त्याचे चांगले आणि खरे मित्र ओळखतो आणि त्यांना त्याच्या संघाचा एक भाग बनवतो. तुमच्या सरकारला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि मला तुमच्यासोबत यायचे आहे."

इम्रान खानवर बॉलिवूड चित्रपट बनणार होता

इम्रान खानची पुर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनी काही वर्षांपूर्वी एक पुस्तक प्रसिद्ध केले होते, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, काही भारतीय निर्मात्यांना इम्रान खानच्या जीवनावर चित्रपट बनवायचा आहे. इम्रान बॉलिवूड चित्रपट करण्यासाठी देखील उत्सुक होते, परंतु इम्रान यांना हा चित्रपट त्यांच्या पहिल्या लग्नावरच संपवायचा होता. मात्र, काही अडचणींमुळे तो चित्रपट बनू शकला नाही.

रेहम खान यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले की, इम्रान यांनी स्वतः त्यांच्याकडे पुष्टी केली होती की, 70 च्या दशकातील हिट बॉलिवूड अभिनेत्रीसोबत त्यांचे अफेअर होते. इम्रान यांनी रेहमला सांगितले होते की, अभिनेत्रीने त्यांचा पाठलाग इंग्लंडपर्यंत केला होता.

इम्रान यांनी एकदा रेहमला असेही सांगितले होते की, त्या बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने एका पार्टीत तिला थप्पड मारली होती, ज्यामुळे तिच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. रेहम यांनी त्यांच्या पुस्तकात त्या अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही, परंतु हे सर्व तपशील अभिनेत्री झीनत अमानशी जुळतात.