आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचे 'किंग ऑफ कॉमेडी' काळाच्या पडद्याआड:कॉमेडियन उमर शरीफ यांचे कर्करोगामुळे निधन, वयाच्या 66 व्या वर्षी जर्मनीत घेतला अखेरचा श्वास

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उमर शरीफ यांनी भारतात अनेकदा अवॉर्ड शो आणि कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

पाकिस्तानचे प्रसिद्ध कॉमेडियन उमर शरीफ यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज 2 ऑक्टोबर रोजी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी जर्मनीमध्ये अखेरचा श्वास घेतला. कर्करोगामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वीच उपचारांसाठी त्यांना कराचीहून एअर अॅम्बुलन्सने वॉशिंग्टनला नेण्यात आले होते, मात्र तब्येत बिघडल्यामुळे जर्मनीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर शरीफ त्यांची पत्नी जरीन गझल यांच्यासोबत एअर अॅम्ब्युलन्सने अमेरिकेला रवाना झाले होते, परंतु त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना बुधवारी जर्मनीच्या नूर्मबर्ग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवसांनंतर, त्याला पुन्हा अमेरिकेत पाठवले जाणार होते, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मागील वर्षी त्यांच्यावर बायपास सर्जरी झाली होती, तेव्हापासून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. त्यांच्या निधनानंतर कलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानंतर कॉमेडियन कपिल शर्माने सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.कपिल शर्माने सोशल मीडियावर उमर शरीफ यांचा फोटो शेअर करत, ‘भावपूर्ण श्रद्धांजली, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

जर्मनीतील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद फैसल यांनी उमर शरीफ यांच्या निधनाची माहिती देत म्हटले, ‘मला सांगताना अतिशय दु:ख होत आहे उमर शरीफ यांचे जर्मनीमध्ये निधन झाले आहे.’

अभिनेता अली जफर यानेही उमर शरीफ यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उमर शरीफ यांच्या पत्नीने पंतप्रधानांकडे केली होती विनंती
उमर शरीफ यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक झाली होती. त्यांनी त्यांची स्मरणशक्ती देखील गमावली होती. त्यांच्या पत्नी जरीन यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडे उमर शरीफ यांना अमेरिकेत पाठवण्यास मदत करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून त्यांच्यावर तेथील तज्ज्ञांकडून उपचार होऊ शकतील. सिंध प्रांताचे राज्यपाल इम्रान इस्माईल आणि मंत्री फवाद चौधरी यांनी रुग्णालयात जाऊन उमर शरीफ यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती. आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यांनी उमर शरीफ यांच्या पत्नीला आश्वासन दिले होते की, ते उमर शरीफ यांना अमेरिकेत पाठवण्यास मदत करतील.

11 सप्टेंबर रोजी, पाकिस्तान सरकारने एक वैद्यकीय मंडळ स्थापन केले होते, ज्यात उमर शरीफ यांना उपचारासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला गेला होता. 16 सप्टेंबर रोजी उमर शरीफ यांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला. त्यांच्या उपचारासाठी सिंध सरकारने 40 मिलियन रुपये मंजूर केले होते.

मागील वर्षी मुलीचे झाले होते निधन
उमर शरीफ यांची मुलगी हीराचे गेल्यावर्षी किडनीच्या आजाराने निधन झाले होते. तिच्या निधनाचा उमर यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ते सतत आजारी राहू लागले होते.

वयाच्या 14 व्या वर्षी करिअरची सुरुवात
उमर शरीफ यांनी वयाच्या 14 व्या वर्षी स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली होती. 1980, 1990 आणि 2000 च्या दशकात त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली होती. मिस्टर 420 या चित्रपटासाठी त्यांना 1992 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट पाकिस्तानातील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

उमर शरीफ भारतीय कॉमेडी शोमध्ये दिसले होते
भारताच्या लोकप्रिय कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये उमर शरीफ नवज्योतसिंग सिद्धू आणि शेखर सुमन यांच्यासह परीक्षक म्हणून सहभागी झाले होते. 1989 मध्ये ते कॉमेडी स्टेज प्ले 'बकरा- किश्तों में' आणि 'बुड्ढा घर पर है'मध्ये दिसले होते. याशिवाय उमर शरीफ यांचा 'द शरीफ शो' देखील खूप लोकप्रिय झाला ज्यामध्ये ते सेलेब्सच्या मुलाखती घ्यायचे.

बातम्या आणखी आहेत...