आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोण आणि वाद:'पठाण'च नव्हे यापूर्वी 'हे' चित्रपटही अडकले होते वादात, जीवे मारण्याची मिळाली होती धमकी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान स्टारर पठाण हा चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण प्रदर्शनापूर्वीच या चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे रिलीज झाल्यापासून त्यावर कडाडून टीका होतेय. अनेक ठिकाणी शाहरुख आणि दीपिका यांचे पोस्टर जाळण्यात आले आहेत. शिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा आक्रमक पवित्रा अनेक संघटनांनी घेतला आहे. या गाण्यामध्ये दीपिकाचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. गाण्यात शाहरुख खान आणि दीपिका यांच्यात इंटिमेट सीन दाखवण्यात आला आहे.

दीपिकाने 'बेशरम रंग' या गाण्यात भगव्या रंगाचा बिकिनी परिधान केल्याने हा सर्व वाद उफाळून आळा आहे. हा भगव्याचा आणि हिंदू धर्माचा अपमान आहे, असा आरोप या गाण्याच्या मेकर्सवर आणि यातील कलाकारांवर होतोय. हिंदू महासभेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांच्या मते ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केला आहे. या गाण्यानंतर 'बॉयकॉट पठाण'चा ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळाला.

इतकेच नाही तर 'पठाण' या चित्रपटाला अयोध्येतील संत समाजाकडून विरोध होत आहे. ज्या चित्रपटगृहांमध्ये 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित होईल, ते जाळून टाका, असे वादग्रस्त विधान हनुमानगढीचे महंत राजुदास यांनी केले आहे.

दीपिकाचा एखादा चित्रपट वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही तिचे अनेक चित्रपट वादाच्या भोव-यात सापडले होते. इतकेच नाही तर तिला नाक कापण्याची आणि जीवे मारण्याची धमकीदेखील मिळाली होती. एक नजर टाकुया आतापर्यंत वादात सापडलेल्या दीपिकाच्या चित्रपटांवर...

पद्मावत

दीपिका पदुकोणचा 'पद्मावत' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली होती. पण प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला होता. या चित्रपटातील 'घुमर' डान्सवर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. दीपिकाला नाक कापण्याची धमकी देण्यात आली होती.

एवढेच नव्हे तिला जीवे मारण्याचीही धमकी मिळाली होती. या चित्रपटाला करणी सेनेकडून विरोध झाला होता. चित्रीकरणादरम्यान जयपूरमध्ये सिनेमाच्या सेटची तोडफोडही झाली होती. चित्रपटात दीपिकाचे काही सीन्स चुकीच्या पद्धतीने दाखवल्याबद्दल निषेध करण्यात आला होता.

​गोलियों की रासलीला राम-लीला

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटाच्या शीर्षकावरुन वाद झाला होता. सुरुवातीला चित्रपटाचे शीर्षक 'रामलीला' असे होते. वाढता वाद बघून निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलून 'गोलियों की रासलीला राम-लीला' केले होते.

शिवाय चित्रपटात दीपिका आणि रणवीर यांच्यातील इंटिमेट सीनही विशेष चर्चेत आले होते.

​बाजीराव-मस्तानी

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटावरुनही वादंग उठले होते. या चित्रपटाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. चित्रपटावर चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप झाला होता. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.

शिवाय चित्रपटातील 'पिंगा' गाण्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यात काशीबाई आणि मस्तानी यांना एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आले होते. मराठी संस्कृतीची अवहेलना केल्याचा आरोप या गाण्यावर केला गेला.

कॉकटेल​​​​​​​​​​​​​​

सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी स्टारर 'कॉकटेल' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दीपिकाने व्हेरोनिका हे पात्र साकारले होते. या चित्रपटात तिची अत्यंत बोल्ड भूमिका होती.

या चित्रपटादरम्यान दीपिकाच्या ड्रेस आणि क्लीवेज शोवरुन बराच वाद रंगला होता. शिवाय अनेकांनी तिच्या कपड्यांवरही आक्षेप घेतलेला. शिवाय या चित्रपटादरम्यान दीपिकाने तिच्या नैराश्याचा खुलासा केल्यानेही हा चित्रपट चर्चेत आला होता.

छपाक​​​​​​​​​​​​​​

'छपाक' या चित्रपटाच्या रिलीजवेळीही वादाला तोंड फुटले होते. या चित्रपटात दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या एका युवतीची भूमिका साकारली आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी तिच्या या भूमिकेचे विशेष कौतुक केले.

मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान दीपिका जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (JNU)त सुरू असणाऱ्या प्रोटेस्टमध्ये पोहोचली होती. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता. 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली होती. इतकेच नाही तर दीपिका 'टुकडे टुकडे गँग'मधील असल्याची गंभीर टीका तिच्यावर झाली होती.

बातम्या आणखी आहेत...