आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बलात्कार प्रकरणी अनुराग कश्यपच्या अडचणी वाढणार:पायल घोषने दिग्दर्शकाची नार्को आणि लाय डिटेक्टर टेस्टची मागणी केली, पंतप्रधान-गृहमंत्र्यांना टॅग करुन म्हटले - तो खोटे बोलतोय

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी अनुराग कश्यपची मुंबई पोलिसांनी सुमारे 8 तास चौकशी केली.
  • निर्मात्याने आपल्यावरील आरोप निराधार व खोटे असल्याचे म्हटले आहे.

अनुराग कश्यपवर बलात्काराचा आरोप करणार्‍या पायल घोष हिने आता अनुरागची नार्को, लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्ट करण्याची मागणी केली आहे. 30 वर्षीय पायलने ट्विटरवर लिहिले की, "कश्यपने आपल्या जबाबात पोलिसांना खोटे सांगितले आहे. सत्य शोधण्यासाठी माझे वकील कश्यपची नार्को, लाय डिटेक्टर आणि पॉलीग्राफ टेस्टसाठी अर्ज करतील. आज पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला जाईल," असे म्हणत पायल हिने आपले हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केले आहे.

गुरुवारी आठ तास झाली चौकशी
अनुराग कश्यपची गुरुवारी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आठ तास चौकशी झाली. सकाळी दहाच्या सुमारास तो पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आणि सायंकाळी सहाच्या सुमारास तेथून बाहेर पडला. पोलिस सूत्रांनी सांगितले की, अनुरागने अभिनेत्री पायल घोषचे लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनुरागने सांगितले की, त्याने पायलला वर्सोवा येथील आपल्या घरी कधीच बोलावले नाही. पायलला प्रोफेशनली ओळखतो, परंतु बर्‍याच दिवसांपासून तिला भेटलो किंवा तिच्याशी बोललो नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. चौकशीदरम्यान अनुरागने सांगितले की, जेव्हा पायलने केलेले आरोप कळले तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. पायलचे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यात कोणतेही सत्य नाही. हा माझ्याविरूद्ध कट आहे, असे अनुरागने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरोधात कोण आणि का कट रचणार असे विचारले असता याचे तो कोणतेही स्पष्ट उत्तर देऊ शकला नाही.

पायलला भेटण्याची कहाणी अनुरागने पोलिसांना सांगितली
अनुरागने पायलला केलेले काही ईमेलही पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. यात एका प्रोजेक्टबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली होती. याशिवाय अनुरागने पायलला पाठिंबा दर्शवलेले काही ट्विटही पोलिसांना दिले आहेत. पायलबरोबरच्या पहिल्या भेटीची सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. अनुरागच्या चौकशीदरम्यान पायलला मेडिकलसाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते.

मुंबई पोलिसांनी जारी केले होते समन्स

मंगळवारी मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यपला समन्स बजावले होते.पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबई बाहेर जाता येणार नाही, असेही त्याला सांगण्यात आले आहे. 22 सप्टेंबर रोजी पायल घोष हिने मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल केला आहे. बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम 376, 354, 341 आणि 342 अंतर्गत कश्यपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.