आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:पीयूष मिश्रांचा दावा - NCB ने प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या घरी धाड टाकायला सुरुवात केली तर ब-याच लोकांचा पर्दाफाश होईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्यक्षात एनसीबी सक्रिय नाही: मिश्रा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाचा एनसीबीकडून योग्य तपास होत नसल्याचा दावा प्रसिद्ध अभिनेते पीयूष मिश्रांनी केला आहे. त्यांच्या मते, जर या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सेलिब्रिटींच्या घरावर धाड टाकण्यास सुरुवात केली तर यामुळे बरेच लोक अडचणीत येऊ शकतात. शुक्रवारी पीयूष मिश्रा मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 'तांडव' आणि 'मिर्झापूर' वाद आणि #MeToo सारख्या महत्त्वाच्या विषयांवरही भाष्य केले.

प्रत्यक्षात एनसीबी सक्रिय नाही: मिश्रा

पीयूष मिश्रा म्हणाले की. प्रत्यक्षात एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो) सक्रिय नाही. कारण काही लोकांना चौकशीसाठी बोलावून नंतर सोडण्यात आले. मिश्रा म्हणाले, "एनसीबीने प्रसिद्ध लोकांच्या घरावर छापा टाकण्यास सुरवात केली तर ब-याच लोकांचा पर्दाफाश होऊ शकतो. त्यामुळे एनसीबी काही करत नाही. एनसीबीने धाड टाकून 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले, ज्याला काही अर्थ नाही. मोठ्या प्रमाणात कोकेन घेत असलेल्या लोकांकडे एनसीबी लक्ष देत नाहीये," असे मिश्रा यांनी म्हटले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर समोर आलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एक महिना तुरुंगात राहावे लागले होते. रियाचा भाऊ शोविक, कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्यासह अनेक ड्रग पेडलर्सना एनसीबीने अटक केली होती. या प्रकरणात दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अर्जुन रामपाल यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे याप्रकरणात समोर आली आहेत आणि तपास एजन्सीनेही त्यांची चौकशी केली आहे.

'ओटीटीवर अश्लीलतेवर बंदी घालायला हवी'
एका वृत्तसंस्थेशी बोलताना मिश्रा म्हणाले, "वेब सीरिजमध्ये अश्लीलतेचा उपयोग करण्यास भाग पाडले जाते. त्यावर बंदी घालायला हवी." त्यांनी पुढे 'तांडव' आणि 'मिर्झापूर'वरील वादावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणतात, "अनावश्यकपणे वाद वाढवण्याचा काही उपयोग नाही." अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या 'तांडव'वर हिंदू देवतांचा अपमान करून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच वेळी 'मिर्झापूर' वर उत्तर प्रदेशची प्रतिमा डागाळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

'#MeToo मोहीम पुढे जाऊ शकली नाही'

मिश्रा यांनी #MeToo मोहिमेबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, "लोकांना वाटले की मीटू चळवळ खूप मोठी मोहीम होईल. परंतु या मोहिमेतच कमतरता होती आणि ती पुढे जाऊ शकली नाही. म्हणून ती मोहिमच संपवण्यात आली," असे मत मिश्रांनी व्यक्त केले.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप लावून 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये #MeToo मोहीम सुरू केली होती. यानंतर साजिद खान, अनु मलिक, सुभाष कपूर, आलोक नाथ आणि राजकुमार हिरानी यांच्यासह अनेक कलाकारांवर ग्लॅमर इंडस्ट्रीतील वेगवेगळ्या महिलांनी बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणातील कोणत्याही आरोपीवर कठोर कारवाई केली गेली नाही.

बातम्या आणखी आहेत...