ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारी रिहाना कोण आहे?:14 वर्षांची असतानाच आईवडिलांचा झाला होता घटस्फोट, असे अचानक बदलले होते आयुष्य
- रिहाना भारतात ट्वीटरवर ट्रेंड करतेय.
नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने याविषयी एक पोस्ट शेअर करत शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. "आपण या विषयावर का बोलत नाही?" असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. यासह तिने #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे. तिच्या या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. शिवाय रिहाना भारतात ट्वीटरवर ट्रेंड करतेय.
चर्चेत आलेली रिहाना कोण आहे जाणून घेऊयात...
- पॉप सिंगर रिहाना ही 32 वर्षांची आहे. तिचे खरे नाव रोबिन रिहाना फेंटी असे आहे. 20 फेब्रुवारी 1988 मध्ये जन्मलेल्या रिहानाने जवळपास दहा वर्षांपूर्वी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. बिलबोर्ड हॉट 100 यादीत स्थान मिळवणारी ती सर्वांत कमी वयाची गायिका ठरली आहे.
- रिहानाला आजवर 8 ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. रिहाना पॉप सिंगर तर आहेच. शिवाय एक यशस्वी बिझनेस वुमन आणि मॉडेलदेखील आहे.
- बारबाडोसमध्ये लहानाची मोठी झालेल्या रिहानाचे आईवडील ती 14 वर्षांची असतानाच विभक्त झाले होते.

- वयाच्या 15 व्या वर्षी रिहानाची भेट निर्माते इवान रोजर्ससोबत झाली होती. त्यांच्याकडे ती ऑडिशनसाठी पोहोचली होती. हाच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. आणि तिथूनच तिने पॉपस्टारच्या दुनियेत प्रवेस केला.
- त्यानंतर ती बारबाडोस सोडून कनेक्टिकटला गेली आणि तिथे रोजर्स आणि त्यांच्या पत्नीसोबत राहू लागली. तिथे तिने चार गाणी शूट केली आणि एका रात्रीतून ती स्टार झाली. रिहानाने सांगितल्यानुसार, बारबाडोस सोडल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
- 2005 मध्ये रिहानाने 'म्युझिक ऑफ द सन' हा तिचा पहिला स्टुडिओ अल्बम प्रसिद्ध केला. तिचा पहिलाच म्युझिक अल्बम बिलबोर्ड 200 चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला होता. त्यानंतर वर्षभराने म्हणजे 2006 मध्ये तिने 'ए गर्ल लाइक मी' हा दुसरा अल्बम प्रसिद्ध केला.
- जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकाराच्या यादीत रिहानाचा समावेश आहे.

- रिहानाने हॉलिवूडच्या बॅटलशिप आणि 'Ocean's 8' या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
- रिहानाचे फेंटी या नावाने स्वतःचे फॅशन ब्रॅण्डदेखील आहे.
- रिहानाची एकुण संपत्ती 600 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 4400 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
- ट्विटरवर रिहानाचे तब्बल 100 मिलियन फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर जगात सर्वाधिक फॉलो केल्या जाणा-या लोकांमध्ये रिहाना चौथ्या क्रमांकावर आहे.