आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावरुन दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना खडे बोल सुनावले आहे. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या मातृभूमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ लेटर्समध्ये प्रकाश राज उपस्थित होते. येथे त्यांनी द कश्मीर फाइल्सवर बरीच टीका केली आणि त्याला 'नॉनसेन्स' चित्रपट म्हटले.
'द कश्मीर फाइल्स' हा निकृष्ट दर्जाचा चित्रपट
प्रकाश राज यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावर आंतरराष्ट्रीय ज्युरी थुंकल्याचे म्हटले. या चित्रपटाच्या निर्मात्यांनाही त्यांनी निर्लज्ज म्हटले. प्रकाश राज म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' हा सर्वात वाईट आणि निकृष्ट दर्जाचा चित्रपट आहे. त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. निर्लज्ज आहेत. आंतरराष्ट्रीय ज्युरीही चित्रपटावर थुंकतात. मला ऑस्कर का मिळत नाही, असा प्रश्न दिग्दर्शक विचारतोय. पण त्याला ऑस्करच काय भास्करही मिळणार नाही," अशी तीव्र शब्दांत प्रकाश राज यांनी टीका केली आहे.
तुम्ही कायम लोकांना मुर्ख बनवू शकत नाहीत
प्रकाश राज पुढे म्हणाले, "का ते मी तुम्हाला सांगतो? कारण आपल्याकडे संवेदनशील माध्यमे आहेत आणि तुम्ही इथे प्रोपगंडा फिल्म बनवत आहात. माझ्या सूत्रांनुसार, त्याने असा चित्रपट बनवण्यासाठी २ हजार कोटींची गुंतवणूक केली. पण तुम्ही लोकांना कायम मूर्ख बनवू शकत नाही."
इस्रायली दिग्दर्शकाने केली होती टीका
काही दिवसांपूर्वी 53व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स'चे वर्णन 'घाणेरडा प्रोपगंडा' चित्रपट म्हणून केले होते.
विवेक अग्निहोत्रींनी दिले होते खुले चॅलेंज
जेव्हा नादव लेपिड यांनी 'द कश्मीर फाइल्स'ला प्रोपगंडा फिल्म म्हटले, तेव्हा विवेक यांनी व्हिडिओ बनवून प्रत्युत्तर दिले होते. चित्रपटातील एकही सीन किंवा संवाद खोटा असल्याचे आढळले तर चित्रपट निर्मिती करणे बंद करेल, असे ते म्हणाले होते.
चित्रपटाने 330 कोटींहून अधिकची कमाई केली
'द कश्मीर फाइल्स'मध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांसारखे कलाकार दिसले होते. हा चित्रपट 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांनी केलेल्या निर्गमन आणि नरसंहारावर आधारित होता. 11 मार्च 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 330 कोटींहून अधिकची कमाई केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.