आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशांत दामलेंनी मानले महानायकासह रसिकांचे आभार:म्हणाले - रसिक प्रेक्षक आहेत म्हणून मी आजपर्यंत हा प्रवास करू शकलो

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध नाव म्हणजे प्रशांत दामले. गेल्या 39 वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. रविवारी (6 नोव्हेंबर) त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील 12 हजार 500 वा नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्यप्रयोगानिमित्त सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही खास मराठीतून ट्विट करत प्रशांत दामले यांना शुभेच्छा दिल्या. महानायकाकडून शुभेच्छा मिळाल्याचा आनंद प्रशांत दामले यांनी व्यक्त केला. त्यांनीही बिग बींचे आभार मानत 'महानायकाकडून शुभेच्छा! खूप खूप आभारी आहे, अमितजी' असे म्हटले आहे.

प्रशांत दामले यांनी मानले रसिकांचे आभार
प्रशांत दामले यांनी त्यांच्या कारकिर्दीतील 12500 वा प्रयोग मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात सादर केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यासह विविध कलाकार उपस्थित होते. प्रशांत दामले यांनी रसिकांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे.

प्रशांत दामले लिहितात, "काल माझ्या आयुष्यातील वैयक्तिक 12500 वा प्रयोग सादर झाला. हा प्रयोग तुमच्या सारखे मराठी नाटकावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक आहेत म्हणून मी आजपर्यंत हा प्रवास करू शकलो. आज षण्मुखानंद सभागृहात, ज्या उत्साहाने प्रयोग झाला, तो माझ्या स्मरणात राहील. ज्या रसिकांना यायला जमलं नाही, पण 39 वर्षे माझ्यावर म्हणजेच मराठी नाटकांवर प्रेम असल्यामुळेच हा आकडा पूर्ण करू शकलो त्या सर्व रसिकांचा मी कायम ऋणी आहे आणि राहीन.'

अमिताभ बच्चन काय म्हणाले?
"प्रशांत दामले यांचा 12500 प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. 39 वर्षांत एवढे प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी 'एका लग्नाची गोष्ट' या 1000 व्या प्रयोगाला गेलो होतो. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा!," असे अमिताभ बच्चन म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दिल्या शुभेच्छा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रशांत दामले यांचा विक्रमादित्य असा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या. 'प्रेक्षकांचे लाडके अभिनेते व माझे मित्र 'विक्रमादित्य' श्री. प्रशांत दामले यांचा 12 हजार 500 वा विक्रमी नाट्यप्रयोग आज होत आहे. या आनंदक्षणाच्या निमित्ताने त्यांचे दूरध्वनीवरुन अभिनंदन केले.' प्रशांत दामले यांनीही त्यांचे आभार मानत, 'मनापासून धन्यवाद चंद्रकांतजी, पुढच्या प्रयोगाला नक्की या!' असे म्हटले.

प्रशांत दामले 1983 पासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. टूरटूर, चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे यासह विविध नाटक आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी यासह विविध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...