आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने 1 एप्रिल 2016 रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येने सगळीकडे खळबळ उडाली होती. प्रत्युषाच्या आत्महत्येला तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग जबाबदार असल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती. आता इतक्या वर्षानंतर राहुलने प्रत्युषाच्या आत्महत्येसंदर्भात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल राज सिंग याने प्रत्युषाच्या आत्महत्येसंदर्भात असे काही सांगितले आहे की, इतक्या वर्षानंतर प्रकरणाला वेगळे वळण येऊ शकते. त्याने सांगितले की, प्रत्युषाच्या निधनाच्या एक दिवस आधी दोघांनी एकत्र पार्टी केली होती. त्याला जेव्हा विचारण्यात आले की, प्रत्युषाने आत्महत्येचे पाऊल का उचलले असावे? यावर उत्तर देताना तो म्हणाला की, तिची आत्महत्या नाहीये.
काय म्हणाला राहुल राज सिंग?
मला नाही वाटत की, तिने आत्महत्या केली असावी. त्या दिवशी ती मला घाबरवण्यासाठी आत्महत्येचा व्हिडिओ बनवत होती. तिने बऱ्याच वेळा असे केले होते. असंच काही तरी करताना तिचा बॅलेन्स गेला असावा, पाय घसरला असावा आणि ही घटना घडली', असा दावा राहुलने केला आहे.
प्रत्युषाच्या मृत्यूनंतर काम मिळणे बंद झाले
राहुल राजचा 'बेपरवाह 2' हा म्युझिक व्हिडिओ लवकरच येणार आहे. अंकित तिवारीने या म्युझिक व्हिडिओला आवाज दिला आहे. त्याच्या प्रमोशनच्या निमित्ताने राहुलने आज तकशी संवाद साधला.
तो म्हणाला, 'प्रत्युषाच्या मृत्यूनंतर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. मला काम मिळणे बंद झाले. प्रत्युषाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, असे सर्वांना वाटत होते. माझ्या नावाला वादाची पार्श्वभूमी असल्याने कोणीही माझ्यासोबत काम करू इच्छित नव्हते,' असे राहुलने सांगितले.
विकास गुप्तामुळे रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही
राहुलने सांगितले की, टीव्ही इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध लोकांनी त्याचे करिअर उद्धवस्त केले आहे. राहुलने या प्रकरणात बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि टीव्ही मालिकांचा निर्माते विकास गुप्ताचे नाव घेतले.
तो म्हणाला, 'मला लॉकअपच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेण्याची संधी मिळाली होता, पण विकास गुप्ताने त्याच्या ओळखीचा वापर केला आणि शोच्या निर्मात्याशी बोलून माझे नाव कापले. मला प्रदीप सरकार यांच्याकडूनही एका चित्रपटाची ऑफर आली होती, पण शेवटच्या क्षणी हा चित्रपट माझ्या हातून निसटला. मला सांगण्यात आले होते की, तुमचे नाव वादात सापडले होते, त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना तुमच्यासोबत काम करायचे नाही.'
राहुलवर दाखल झाला होता FIR, त्याला तुरुंगातही राहावे लागले
राहुलवर प्रत्युषाला भडकवणे, तिचे शोषण करणे असे गंभीर आरोप होते. यावरही तो आता उघडपणे बोलला. राहुल म्हणाला, 'घटना घडण्याच्या काही दिवस आधीपर्यंत मला इंजेक्शन्स दिले जात होते. मला अजिबात भान नव्हते. मला झोपेच्या गोळ्याही दिल्या गेल्या. तिच्या मृत्यूसाठी मला जबाबदार धरले जात आहे हे पाहून मला खरोखरच धक्का बसला. मी त्या मुलीला का मारणार?, असे राहुल म्हणाला.
प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी राहुलविरोधात एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी त्याला महिनाभर कारागृहातही राहावे लागले होते.
राहुलचे अनेक मुलींशी संबंध - प्रत्युषाच्या आईवडिलांचा आरोप
प्रत्युषाच्या आई-वडिलांनी राहुलवर अनेक आरोप केले होते. राहुलचे अनेक मुलींशी संबंध होता, असे त्यांनी म्हटले होते. इतकेच नाही राहुलने प्रत्युषाला तिच्या आई-वडिलांविरोधात भडकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. प्रत्युषाचा पैसा, तिची संपत्तीचा वापर राहुलने केल्याचेही तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले होते.
'आईवडिलांनी घेतलेल्या कर्जामुळे वैतागली होती प्रत्युषा'
यावरही राहुलने आता भाष्य केले आहे. त्याने सांगितले की, प्रत्युषा तिच्या आई-वडिलांनी घेतलेल्या कर्जामुळे वैतागली होती. त्यामुळे मी तिला हे कर्ज फेडण्यासाठी मदत करायचो, असा दावा त्याने केला आहे. राहुलने सांगितल्यानुसार, आम्ही दोघांनी एका रिअॅलिटी शोमध्ये विजेते ठरलो होतो. त्या शोमधून आम्हाला 12 लाख रुपये प्राइज मनी मिळाली होती. त्यातील सुमारे 9 लाख रुपये मी तिला दिले होते, असेही राहुलने सांगितले.
तसेच प्रत्युषाच्या निधनापूर्वी मी तिच्या आईसोबत नेहमी बोलायचो. पण तिच्या आत्महत्येनंतर ते बदलले. अनेक सेलिब्रिटींनी त्यांना माझ्याविरोधात भडकवले, असेही त्याने या मुलाखतीत म्हटले आहे.
विकास गुप्ता आणि प्रत्युषा रिलेशनशिपमध्ये होते
राहुलने विकास गुप्ताचा विषय काढला, कारण 2021 मध्ये विकास गुप्ताने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो आणि प्रत्युषा सिक्रेट रिलेशनशिपमध्ये होते. विकास गुप्ताविषयी म्हटले जाते की, तो बायसेक्शुअल आहे, कदाचित प्रत्युषाला जेव्हा हे कळले तेव्हा तिने विकाससोबत ब्रेकअप केले असावे. मात्र, इंडस्ट्रीतील काही लोकांनी प्रत्युषाला आपल्या विरोधात भडकवल्याचे विकासने सांगितले होते. याच कारणामुळे ती विकासापासून दुरावली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.