आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे शोमॅन म्हणून ओळखले जाणारे राज कपूर यांची आज 98 वी जयंती आहे. पृथ्वीराज कपूर आणि रामसरणी मेहरा यांच्या 6 मुलांपैकी राज कपूर हे सर्वात मोठे होते. राज चित्रपट घराण्यातील असल्यामुळे अभिनय त्यांच्या रक्तातच होता. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी राज कपूर यांनी पहिल्यांदा 'इन्कलाब' चित्रपटात काम केले होते. तर मुख्य नायक म्हणून 1947 मध्ये आलेल्या 'नील कमल' या चित्रपटात ते झळकले होते. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी राज कपूर यांनी आरके स्टुडिओची स्थापना केली होती. ते त्यांच्या काळातील सर्वात तरुण दिग्दर्शक होते.
राज कपूर यांनी त्यांच्या सिनेकारकिर्दीत 3 राष्ट्रीय पुरस्कार, 11 फिल्मफेअरसह अनेक मोठे पुरस्कार आपल्या नावी केले. दादासाहेब फाळके हा चित्रपट जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाला होता. आपल्या मुलांना इंडस्ट्रीत स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली सर्व जमा पुंजी खर्च केली होती. आज राज कपूर यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी...
राज कपूर यांचे खरे नाव सृष्टीनाथ कपूर होते
राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी पेशावर येथे झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर आता तो पाकिस्तानचा भाग आहे. राज कपूर हे पृथ्वीराज कपूर आणि रामसरणी मेहरा यांचे पहिले अपत्य होते. राज यांचे नाव सृष्टीनाथ कपूर ठेवण्यात आले होते. पृथ्वीराज हीरो बनण्यासाठी बॉम्बे (मुंबई) आले तेव्हा संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत येथे आले. राज कपूर वडिलांसोबत चित्रपटांच्या सेटवर जात असत. 'इन्कलाब' या चित्रपटात लहान मुलाची गरज असताना राज कपूर यांना ही भूमिका देण्यात आली होती. राज कपूर मोठे होताच सेटवर लहान मोठी कामे करू लागले. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी दिग्दर्शक केदार शर्मासाठी क्लॅप बॉय म्हणून काम केले होते.
वयाच्या 24 व्या वर्षी आरके स्टुडिओची स्थापना
राज कपूर यांनी त्यांचा पहिला चित्रपट 'नीलकमल' रिलीज झाल्यानंतर वर्षभरात आरके स्टुडिओची पायाभरणी केली होती. ते त्यांच्या काळातील सर्वात तरुण दिग्दर्शक होते. त्यांनी 'आग' (1948) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नव्हती.
नर्गिससोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर
राज कपूर आणि नर्गिस यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघांनीही जवळपास 9 वर्षे एकमेकांना डेट केले होते. बरसात, अंदाज, आवारा, श्री 420 यासह 16 चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीला चांगलीच पसंती मिळाली. नर्गिस यांना राज कपूर यांच्यासोबत लग्न करायचे होते, पण तसे होऊ शकले नाही त्यामुळे हे नाते तुटले. त्यांच्या प्रेमकथेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे राज कपूर आधीच विवाहित होते. त्यांचे लग्न कृष्ण राज यांच्याशी झाले होते. राज कपूर हे पाच मुलांचे वडीलही होते. त्यांचे नर्गिसवर खूप प्रेम होते पण त्यांनी त्यांच्या पत्नीला कधीही सोडले नाही. याच कारणामुळे नर्गिस यांचे मन दुखावले गेले आणि त्या राज कपूर यांच्यापासून कायमच्या दुरावल्या. नंतर नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केले आणि ही बातमी ऐकून राज कपूर कोलमडले. एका मुलाखतीत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांनी खुलासा केला होता की, नर्गिस यांच्या लग्नानंतर क्वचितच अशी एखादी रात्र गेली असावी जेव्हा राज कपूर रडले नाहीत, ते घरी उशिरा यायचे, दारू प्यायचे, बाथटबमध्ये जाऊन रडायचे आणि अनेक वेळा ते दारूच्या नशेत जळत्या सिगारेटने स्वतःला चटके देत असत.
'मेरा नाम जोकर' या चित्रपटामुळे कंगाल झाले होते राज कपूर
राज कपूर यांनी सर्व पैसे खर्च करुन 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट बनवला. चित्रपट बनवायला 6 वर्षे लागली, त्यामुळे बजेटही ठरलेल्या रकमेपेक्षा खूप जास्त लागले. चित्रपट पूर्ण करण्यासाठी राज कपूर यांनी आपले घर गहाण ठेवले आणि लोकांकडून कर्ज घेतले. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो सपशेल आपटला होता. 4 तासांच्या या चित्रपटात दोन इंटरव्हल्स ठेवण्यात आले होते. राज पूर्णपणे कर्जात बुडाले होते, त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता.
'बॉबी' चित्रपटाच्या कमाईतून राज यांनी कर्जाची परतफेड केली
'मेरा नाम जोकर' या चित्रपटामुळे कर्जबाजारी झालेल्या राज कपूर यांनी आणखी एक कर्ज काढून मुलगा ऋषी कपूर आणि डिंपल कपाडियासोबत 'बॉबी' हा चित्रपट बनवला. राज यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून प्राणनाथ यांनी या चित्रपटासाठी फक्त 1 रुपया मानधन घेतले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि राज कपूर यांची कारकीर्द पुन्हा रुळावर आली.
'बॉबी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाकिस्तानातून आली होती जलेबी आणि मिठाई
राज कपूर 'बॉबी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारत-पाक सीमेवर जाणार होते, मात्र त्यांना अडवण्यात आले होते. राज सैनिकांना म्हणाले, कमांडरला सांगा की राज कपूर आला आहे. कमांडर आल्यावर त्यांनी राज यांचे स्वागत केले आणि त्यांच्यासाठी वाहने व नाश्त्याची व्यवस्था केली. जेव्हा निघायची वेळ झाली तेव्हा भारताचे सैनिक म्हणाले की, थोडा वेळ थांबा कारण पाकिस्तानचे काही सैनिक तुम्हाला भेटायला येत आहेत. पाकिस्तानी सैनिक दोन वाहनांतून आले आणि त्यांनी राज कपूर यांच्यासाठी पाकिस्तानातून जलेबी आणि मिठाई आणली होती.
खाण्यापिण्याचे शौकीन पण एडिटिंगच्या वेळी दारुला स्पर्शही करायचे नाही
राज कपूर यांची खाण्यापिण्याची आवड कुणापासून लपलेली नाही. कधी ते जलेबी आणि बटरसोबत पाव खात असत तर कधी सेटवर जंगी मेजवानी असायची. लग्नात नॉनव्हेज न केल्यामुळे राज कपूर असिस्टंट राहुल रवैलवर नाराज झाले होते. पण जेव्हा ते चित्रपटांचे फायनल एडिटिंग करायचे तेव्हा ते पूर्ण शाकाहारी व्हायचे आणि दारूला स्पर्शही करायचे नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.