आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा राज्य सरकारने अभिनेता राज कपूर व दिलीपकुमार यांचे वडिलोपार्जित घर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतींना ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याची सरकारची तयारी आहे. पेशावर येथील या दोन्ही इमारतींना राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता या दोन्ही इमारती खिळखिळ्या झाल्या आहेत. त्या कधीही कोसळू शकतात. खैबर-पख्तुनख्वाचे पुरातत्त्व विभागाचे प्रमुख डॉ. अब्दुस समद खान यांनी सांगितले, फाळणीपूर्वी भारतीय सिनेमाच्या या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले आहे.
राज कपूर यांच्या वडिलाेपार्जित घराचे नाव ‘कपूर हवेली’ आहे.याचे बांधकाम त्यांचे आजोबा दिवाण बशेश्वरवनाथ कपूर यांनी 1918 ते 1922 दरम्यान केले होते. राज कपूर व त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म याच इमारतीत झाला. त्याचप्रमाणे दिलीपकुमार यांचीही 100 वर्षांपूर्वीची जुनी वास्तू याच गल्लीत आहे. आता हे घरही जीर्णावस्थेत आहे. हे घरही नवाज शरीफ यांनी 2014 मध्ये राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित केले होते.
या दोन्ही इमारतींच्या मालकांनी यापूर्वी वास्तू पाडून तेथे व्यापारी संकुल उभारण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला होता. परंतु या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व पाहता त्यांनी जतन करून ठेवली. तथापि, राज्य सरकार या इमारती विकत घेण्यासाठी पैशांची व्यवस्था करत आहे.
कपूर हवेली पाडणार नाही : घरमालक
कपूर हवेलीचे मालक अली कादिर यांनी म्हटले, ही इमारत पाडण्याची आमची इच्छा नाही. उलट या इमारतीचे जतन व्हावे, यासाठी पुरातत्त्व विभागाशी करारही केला आहे. घरमालकाने राज्य सरकारकडे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. पाक सरकारने 2018 मध्ये या हवेलीचे संग्रहालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. पेशावरमध्ये अशा 1800 ऐतिहासिक इमारती आहेत. त्या 300 वर्षांहून अधिक काळातील आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.