आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉर्न फिल्म निर्मिती व त्या अॅपवर अपलाेड केल्याच्या प्रकरणात अटकेतील व्यावसायिक राज कुंद्राला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राजला मंगळवारी मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती. सूत्रांनुसार, या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येऊ शकतात.
राज कुंद्राच्या अटकेनंतर आता अनेक मोठे खुलासे झाले आहेत. राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी गुन्हे शाखेने पाच महिने या प्रकरणाचा कसून तपास केला होता. गुन्हे शाखा अश्लील चित्रपट बनवणा-या टोळीचे धागेदोरे शोधत होती, याचदरम्यान राज कुंद्रा या टोळीचा सूत्रधार असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
20 वर्षीय स्ट्रगलिंग मॉडेलला टार्गेट करुन तिला कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवण्यात आले आणि नंतर बळजबरीने तिला चित्रपटात काम करण्यास भाग पाडण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. राज कुंद्राविरोधात 4 फेब्रुवारी 2021 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. पण एका जबाबाव्यतिरिक्त कुंद्राविरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे नव्हेत, त्यामुळे त्यावेळी त्याला अटक करण्यात आली नव्हती.
मंगळवारी (20 जुलै) रोजी पोलिसांनी काेर्टाला सांगितले की, ‘कुंद्रा पाेर्न फिल्म रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा मोबाइल जप्त केला असून आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होईल.’ प्रकरणात आजवर 11 जणांना अटक झाली आहे.
ठोस पुरावा मिळाल्यानंतरच अटक
तीन दिवसांपूर्वी मालाड पश्चिमच्या मड गावात एका भाड्याच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला आणि तेथून ठोस पुरावे मिळाल्यानंतरच राज कुंद्राला अटक करण्यात आली. कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि काही अॅप्सद्वारे ते शेअर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने सीआर -103/2021 नोंदविला होता. ज्यामध्ये आयपीसीचे कलम 292, 293, 420, 34 आणि आयटी कायद्याचे कलम, 67, 67 ए आणि आयपीसीची कलम 420 यांचा समावेश आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 5 एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत
या प्रकरणाच्या तपासात कुंद्राच्या कंपनीचे भारत प्रमुख उमेश कामतचे कनेक्शन समोर आले आहे. यावर्षी 4 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेने अश्लील चित्रपटाशी संबंधित पहिला गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दोन, लोणावळ्यात एक आणि मालवणी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले.
शिल्पाच्या भूमिकेची चौकशी
सह पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले की, विआन कंपनीमध्ये शिल्पाची कोणतीही सक्रिय भूमिका समोर आलेली नाही, परंतु आम्ही तिच्या भूमिकेबद्दल चौकशी करीत आहोत. कुंद्राच्या ऑफिसमधून अकाउंटशीट, व्हॉट्सअॅप चॅट्स आणि अश्लील क्लिप सापडले आहेत. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटकही केली जाणार आहे.
20 ते 25 वर्षांच्या स्ट्रगलिंग कलाकारांना लक्ष्य केले जायचे
पाच महिन्यांच्या पोलिस तपासादरम्यान अश्लील चित्रपटांच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार राज कुंद्रा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुंद्राच्या अटकेनंतर असे लक्षात आले की, तो चित्रपट निर्मितीसाठी प्रोडक्शन हाऊसच्या नावाखाली एक मोठे अश्लील फिल्म रॅकेट चालवत असे. त्याच्या चित्रपटांमध्ये काम करणार्या बहुतेक मुली आणि मुले स्ट्रगलिंग करणारे अभिनेता आणि अभिनेत्री होते. पॉर्न चित्रपटांसाठी 20 ते 25 वर्षे वयोगटातील कलाकारांची निवड केली जात असे. शूटिंगपूर्वी त्यांची करारावर सही घेतली जायची, ज्यामध्ये स्वत:च्या इच्छेनुसार चित्रपट सोडल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या क्लॉज होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंद्रा एका कलाकाराला दिवसाला 30 ते 50 हजार रुपये देत असे.
दररोज 20 हजार रुपये भाड्यावर भाड्याने घेतला होता बंगला
मुंबई पोलिसांकडून छापा टाकण्यात आलेला मडमधील बंगला राज कुंद्राच्या टीमने दिवसाला वीस हजार रुपये भाड्याने घेतल्याचे तपासात समोर आले आहे. भोजपुरी आणि मराठी चित्रपटांच्या शूटिंगच्या नावाखाली हा बंगला भाड्याने घेतल्याचे बंगल्याच्या मालकाने पोलिसांना सांगितले आहे. शूटच्या वेळी बंगल्याच्या मालकाला आणि इतर कर्मचार्यांना दूर राहण्यास सांगण्यात आले होते. शूटिंग सुरू होण्यापूर्वी बंगल्याला चारही बाजूंनी निळ्या पडद्याने झाकले जायचे. बंगल्याच्या आत सेट बनवला गेला होता.
ऑडिशन दरम्यान कपडे काढण्यास सांगितले जायचे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात एका स्ट्रगलिंग मॉडेलने सांगितले की, चित्रपटांमध्ये बहुतेक मुली मुंबई बाहेरील आहेत. निवडीपूर्वी प्रत्येकीचे प्रोफाइल शूट केले गेले होते आणि बर्याच वेळा कॅमेरासमोर त्यांना अंगावरील कपडे काढण्यास सांगितले गेले होते. हे प्रोफाइल एका सिलेक्शन टीमकडे पाठवले गेले होते. निवड झाल्यानंतर अभिनेत्रींना वेगवेगळ्या ठिकाणी शूटसाठी बोलविण्यात आले. सेटवर बहुतांश या महिला कॅमेरामन आणि महिला प्रोड्युसर हजर असायच्या. सुरुवातीला काही दिवस सामान्य शूट होत असे आणि त्यानंतर बोल्ड दृश्यांसाठी दबाव निर्माण केला जात असे.
कॉन्ट्रॅक्टच्या मदतीने मुलींना ब्लॅकमेल केले गेले
नकार दिल्यास कॉन्ट्रॅक्ट दाखवत त्यांना तुरूंगात पाठवण्याची धमकी दिली जात असे. चित्रीकरण अर्धवट सोडल्यास शूटचे संपूर्ण नुकसान भरून काढण्याच्या एक कलम करारात होता. एका मॉडेलने पोलिसांना सांगितले की, तिच्या करारातील कलमात शूटिंग दरम्यान नियमांचे पालन न केल्यास 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. एका मॉडेलने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, शूटिंगला विरोध केल्यानंतर तिला प्रथम घाबरले गेले आणि त्यानंतर तिला अल्कोलिक कोल्डड्रिंक प्यायला लावून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास भाग पाडले गेले. या मॉडेललादेखील एक महिन्यानंतर समजले की, तिची अश्लील चित्रफित बनवली गेली आहे.
व्हिडिओ विविध अॅप्सवर पाठवले जायचे
अभिनेत्रीने सांगितले की, तिचा अश्लील व्हिडिओ 'हिट अँड हॉट' नावाच्या अॅपवर अपलोड करण्यात आला होता. यात 200 रुपयांचे सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध होतो. त्यानंतर या अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितले की, तिचे बरेचसे व्हिडिओ टेलिग्रामवरही सर्कुलेट झाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे त्रस्त झालेल्या अभिनेत्रीने मुंबई सोडली आहे.
कुंद्राने परदेशात स्थापली होती कंपनी
वृत्तानुसार, कुंद्राने पोर्न फिल्म उद्योगात 8-10 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याने ब्रिटनमध्ये राहत असलेल्या भावासोबत केनरिन नावाची कंपनी स्थापली. भारताच्या सायबर लाॅपासून वाचण्यासाठी कंपनीची परदेशात नोंदणी केली. पाेर्न फिल्म्सचे व्हिडिओ भारतात शूट केले आणि वुई ट्रान्सफरच्या माध्यमातून ते केनरिनला पाठवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.