आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:रजनीकांत यांच्या 'शिवाजी द बॉस'मधील अभिनेता विवेक यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन, दोन दिवसांपूर्वीच घेतला होता कोरोना लसीचा पहिला डोस

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विवेक यांनी आज पहाटे 4.35 वाजता अखेरचा श्वास घेतला.

तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विवेक यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले आहे. चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, विवेक यांनी आज पहाटे 4.35 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने तामिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 16 एप्रिलला विवेक यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. चाहत्यांसह मित्रमंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विवेक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रिपोर्ट्सनुसार, विवेक यांना घरीच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तातडीने त्यांना वाडापलानी येथील SIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्यांना ECMO उपचार दिले जात होते आणि ICU मध्ये त्यांना डाक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वीच घेतला होता कोरोना लसीचा पहिला डोस
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छातीत दुखत असल्याने रुग्णालयात आणण्यात आले होते. घरीच ते बेशुद्ध पडले होते. घरीच त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता. त्यांच्या लेफ्ट कोरोनरी ब्लड व्हेसलमध्ये 100 टक्के ब्लॉकेज झाले होते. 15 एप्रिलला विवेक यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्याची माहिती त्यांनी मीडियाला दिली होती. यासाठी त्यांनी ओएमंदुरार येथील सरकारी रुग्णालयाची निवड केली होती. सरकारी रुग्णालयात लस घेण्यामागचे कारणदेखील त्यांनी सांगितले होते.

'कोविड लस सुरक्षित आहे. पण आपण लस घेतली आहे म्हणजे आपण आजारी नाही होणार असे समजू नका. काळजी आपल्याला घ्यावीच लागेल. लस घेतल्यामुळे फक्त आधीपेक्षा धोका कमी झालाय हे निश्चित होईल.' असे प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते.

200 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम
विवेक यांना चित्रपटसृष्टीत विनोदी भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. रजनीकांत, कमल हासन, अजित, विजय, माधवन, विक्रम, धनुष अशा अनेक सुपरस्टार्ससह त्यांनी अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. आर. माधवन स्टारर 'रन' हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील मोठा ब्रेक ठरला होता. 2007 मध्ये रिलीज झालेल्या रजनीकांत यांच्या 'शिवाजी द बॉस' मध्येही विवेक यांनी अभिनय केला होता. या चित्रपटानंतर ते देशभरातही लोकप्रिय झाले होते.

2009 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सरकारने त्यांना 2009 मध्ये पद्मश्रीने सन्मानित केले होते. विवेक यांनी 1987 मध्ये 'मनथिल उरुधी वेंदुम' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. 'नान थान बाला' आणि 'वेल्लई पूकल' सारख्या बर्‍याच चित्रपटांमध्येही त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते. 2020 मध्ये रिलीज झालेल्या हरीश कल्याण स्टारर फिल्म 'धरला प्रभु' या चित्रपटात ते शेवटचे मोठ्या पडद्यावर दिसले होते. त्यांच्या पश्चात पत्नी अरुलसेल्वी आणि दोन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...