आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड:'रामायण'मधील केवटच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला पोहोचले होते अरविंद त्रिवेदी, 300 जणांमधून झाली होती 'रावण'च्या पात्रासाठी निवड

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेशात झाला होता अरविंद त्रिवेदींचा जन्म

रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. अरविंद त्रिवेदी 82 वर्षांचे होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. अरविंद त्रिवेदी ब-याच काळापासून आजारी होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी ही माहिती दिली आहे.

'रामायण' या मालिकेतून मिळाली होती लोकप्रियता
रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत अरविंद त्रिवेदी यांनी साकारलेला रावण आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 1986 मध्ये दूरदर्शनवर सुरू झालेल्या या मालिकेतील रावणच्या भूमिकेने अरविंद त्रिवेदी यांना लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेतून अभिनेता अरुण गोविल यांना राम म्हणून प्रसिद्धी मिळाली, तर अभिनेता अरविंद त्रिवेदी यांनादेखील रावण म्हणून लोकप्रियता मिळाली. अरविंद त्रिवेदी हे गुजरातमधील साबरकांठाचे खासदारही राहिले.

मध्य प्रदेशात झाला होता अरविंद त्रिवेदींचा जन्म
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1938 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला होता, परंतु त्यांनी गुजरातला आपली कर्मभूमी बनवली. गुजराती थिएटरमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे गुजराती चित्रपटांमधील एक लोकप्रिय नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. लंकेश म्हणजेच अरविंद त्रिवेदी यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले आहे. गुजराती भाषेच्या धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांमुळे त्यांना गुजराती प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली.

300 जणांनी दिली होती रावणच्या पात्रासाठी ऑडिशन
अरविंद त्रिवेदी यांनी एकदा सांगितले होते की, त्यांनी रामायणातील केवटच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. रामानंद सागर यांनी त्यांची ऑडिशन घेतली होती. ऑडिशन घेताना त्यांना समजले की, रावणच्या भूमिकेसाठी अरविंद अधिक परफेक्ट आहेत. रामानंद सागर अरविंद यांच्या बॉडी लँग्वेजने खूप प्रभावित झाले होते आणि म्हणून त्यांनी रावणाच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली होती. त्याआधी रामानंद सागर यांनी रावणाच्या भूमिकेसाठी तब्बल 300 जणांची ऑडिशन घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...