आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:ईडीसमोर हजर झाला राणा दग्गुबती, मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात तब्बल सात तास झाली चौकशी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तो ईडीच्या कार्यालयात दाखल झाला होता.

टॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबती बुधवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाला. चार वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणी आणि त्यातून झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी सुरू असलेल्या तपासामध्ये त्याची तब्बल सात तास चौकशी सुरू होती. बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास तो ईडीच्या कार्यालयात दाखल झाला होता.

आतापर्यंत 5 टॉलिवूड स्टार्सची चौकशी करण्यात आली आहे
ईडीसमोर हजर होणारा राणा हा पाचवा टॉलिवूड सेलिब्रिटी आहे. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ, अभिनेत्री चार्मी कौर, रकुल प्रीत सिंग आणि नंदू यांची 31 ऑगस्टपासून चौकशी करण्यात आली आहे. ईडीने ड्रग्ज प्रकरणी रवी तेजा, नवदीप, मुमैथ खान, तनिश आणि रवी तेजाचा चालक श्रीनिवास यांनाही समन्स बजावले आहे. ईडीच्या अधिका-यांनी 3 सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत हिची पाच तास चौकशी केली होती. तर पुरी जग्गनाथ याला 31 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले होते. याप्रकरणी चार्मी कौर हिची देखील 2 सप्टेंबर रोजी चौकशी झाली होती. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने रकुलप्रीत, राणा दग्गुबातीसह 12 जणांना नोटिसा पाठवल्या होत्या.

टॉलिवूड ड्रग प्रकरणात आतापर्यंत काय घडले
ईडीने गेल्या महिन्यात एलएसडी आणि एमडीएमएसह 'क्लास ए' ड्रग्ज तस्करीशी संबंधित प्रकरणात मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून टॉलिवूडशी संबंधित 10 लोकांना आणि एका खासगी क्लब व्यवस्थापकासह इतर दोघांना नोटिसा बजावल्या होत्या. मंगळवारी नंदूची आठ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी केल्विन मिस्करेनहास आणि इतर दोघांचीही मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

उत्पादन शुल्क विभागाने 11 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे
2017 मध्ये तेलंगणा राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख किंमतीचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर 12 गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात अनेक अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली, त्यापैकी 11 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण 8 लोकांना आरोपी बनवण्यात आले होते, त्यापैकी ड्रग्ज पोहोचवणारे बहुतेक जण हे कुरियर बॉय होते. नंतर, बेकायदेशीर पैशांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर, अंमलबजावणी संचालनालयाची या प्रकरणात एंट्री झाली आणि मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवून तपास केला जात आहे.

62 लोकांचे केस आणि नखांचे नमुने घेण्यात आले होते
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने जुलै 2017 मध्ये टॉलिवूड सेलिब्रिटींसह 62 संशयितांचे केस आणि नखांचे नमुने गोळा केले होते, परंतु एसआयटीने याप्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती उघड केली नव्हती. याच प्रकरणात दक्षिण आफ्रिकेचा नागरिक असलेल्या राफेल अॅलेक्स व्हिक्टरविरोधात मुंबईहून हैदराबाद येथे कोकेनची तस्करी आणि हैदराबादमध्ये ते विकल्याबद्दल आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. राफेलला ऑगस्ट 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. एसआयटीने तपासादरम्यान आरोपींची चौकशी केली असता सर्व कलाकारांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले होते.

बातम्या आणखी आहेत...