आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'बाहुबली' या चित्रपटात भल्लाल देवाची भूमिका साकारणारा अभिनेता राणा दग्गुबती सध्या त्याच्या आगामी 'राणा नायडू' या वेब सिरीजचे प्रमोशन करत आहे. दरम्यान, तेलुगू चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आले. याला उत्तर देताना तो म्हणाला की, काही वर्षांपूर्वीपर्यंत बॉलिवूडमधील अनेक लोक प्रभास आणि महेश बाबूसारख्या मोठ्या स्टार्सना ओळखत नव्हते. लोकांना प्रभास म्हणजे नेमका कोण हेदेखील माहित नव्हते. तर महेश बाबूला नम्रता शिरोडकरचा पती म्हणून ओळखले जात होते. मात्र, 'बाहुबली' रिलीज झाला आणि सर्व चित्रच बदलले.
मित्राने विचारले - कोण आहे प्रभास..
राणा दग्गुबती म्हणाला, "बाहुबली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी काही काळ बाहेर होतो. माझ्या एका मित्राने विचारले की, चित्रपटाचा मुख्य अभिनेता कोण आहे. मी प्रभासचे नाव घेतले, त्याने विचारले कोण आहे प्रभास. आता त्याला कसे समजावावे तेच कळत नव्हते. मी काही चित्रपटांची नावे सांगितली होती, पण त्याने त्यापैकी एकही पाहिला नव्हता."
"त्याने मला सांगितले की, तो फक्त एका तेलुगू अभिनेत्याला ओळखतो आणि तो म्हणजे चिनूचा नवरा. चिनू नेमकी कोण असा प्रश्न मला पडला. मग अचानक मला आठवले की चिनू हे नम्रता शिरोडकरचे नाव आहे. तो महेश बाबूबद्दल बोलतोय याचे मला आश्चर्य वाटले. मग मी त्याला म्हणालो चार-पाच वर्षे थांब आणि नंतर बघ आमची मोठी आर्मी येणार आहे."
हिंदी आणि तेलुगू प्रेक्षक समान आहेत
हिंदी पट्ट्यात तेलुगू चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल बोलताना राणा दग्गुबती म्हणाला, "मला खात्री होती की, एक दिवस असे होईल. माझा दुसरा चित्रपट हिंदीत होता. मला वाटते हिंदी आणि तेलुगू प्रेक्षकांमध्ये खूप साम्य आहे."
"आजही आपण विनाकारण भाषेच्या वादात अडकलो आहोत. एक दिवस नक्कीच येईल जेव्हा सगळे एकत्र येतील. जेव्हा मी हिंदी चित्रपट करतो तेव्हा लोकांना वाटते की, मी तेलुगू चित्रपट बनवतो आणि जेव्हा मी तेलुगू चित्रपट बनवतो तेव्हा लोकांना मी हिंदी चित्रपट बनवतोय असे वाटते."
भल्लालदेवच्या भूमिकेतून राणा झाला प्रसिद्ध
राणाबद्दल सांगायचे तर, त्याने कोणिक इन्स्टिट्यूट ऑफ इमेजिंग अँड टेक्नॉलॉजीमधून फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने हैदराबादमध्ये वडिलांचे प्रोडक्शन हाऊस सांभाळण्यास सुरुवात केली.
राणाने 2010 मध्ये आलेला पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट 'लीडर'मधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले, मात्र त्याला खरी ओळख ‘बाहुबली’ चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्याने खलनायक भल्लालदेवची भूमिका साकारली होती.
याशिवाय 'गाजी अटॅक' या हिंदी चित्रपटातूनही त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमध्ये पाणबुडीचा वापर करून पाण्याखालील युद्ध दाखवण्यात आले. चित्रपटाचे 80% चित्रीकरण पाणबुडीच्या आत झाले होते. राणाशिवाय केके मेनन आणि अतुल कुलकर्णी यांनीही चित्रपटात उत्तम काम केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.