आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आज (11 डिसेंबर) आपल्या वयाची 98 वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणा-या दिलीप साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला दाखवतोय त्यांची अतिशय जुनी छायाचित्रे आणि सोबतच सांगतोय त्यांच्याविषयीच्या खास रंजक गोष्टी...
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ अशा शब्दांत गौरवल्या गेलेले तसेच ट्रॅजिडी किंग म्हणून रसिकमान्यता मिळालेले अभिजात अभिनेते दिलीपकुमार हे मूळचे पेशावरचेच. या शहरातील किस्सा ख्वानी बाजारातील मोहल्ला खुदादाद येथील निवासस्थानी 11 डिसेंबर 1922 रोजी दिलीपकुमार यांचा जन्म झाला.
दिलीप साहेबांचे त्यांचे मूळ नाव मोहंमद युसूफ खान. पेशावरमधील त्यांच्या कुटुंबामध्ये हिंडको ही भाषा बोलली जात असे. दिलीपकुमार यांच्यासह ती सर्व 12 भावंडे होती.
दिलीपकुमार यांच्या वडिलांचे नाव लाला गुलाम सरवार. ते फळांचे व्यापारी होते. त्यांच्या पेशावर व महाराष्ट्रातील नाशिकजवळील देवळाली येथे मोठ्या फळबागा होत्या.
1920च्या दशकाच्या अखेरीस दिलीपकुमार यांचे कुटुंबीय मुंबईला आले व येथेच स्थायिक झाले. पुणे येथील सिरका येथे कँटीन सप्लायर म्हणून दिलीपकुमार यांनी 1940 मध्ये कामाला सुरुवात केली होती, असे सांगितले तर आता कोणी सहजासहजी विश्वासही ठेवणार नाही. याशिवाय त्यांनी आपल्या वडिलांचा फळाचा व्यवसायसुद्धा सुरु ठेवला होता.
बॉम्बे टॉकीजचे संस्थापक हिमांशू राय यांच्या पत्नी व अभिनेत्री देविकाराणी यांच्या प्रोत्साहनानेच 1943 मध्ये युसूफ खान याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांनी युसूफ खान यांचे दिलीपकुमार असे नामकरण केले.
'ज्वारा भाटा' या सिनेमाद्वारे दिलीप साहेबांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'जुगनू' हा त्यांचा पहिला हिट सिनेमा होता.
1949 मध्ये 'अंदाज' या सिनेमात दिलीप कुमार यांनी पहिल्यांदा राज कपूर यांच्याबरोबर काम केले होते.
दीदार (1951) आणि देवदास (1955) या सिनेमांमध्ये गंभीर स्वरुपाच्या भूमिका साकारल्यानंतर दिलीप साहेब यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाऊ लागले.
क्रांती (1981), विधाता (1982), दुनिया (1984), कर्मा (1986), इज्जतदार (1990) आणि सौदागर (1991) हे दिलीप साहेबांचे निवडक गाजलेले सिनेमे आहेत.
मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. दिलीप कुमार यांचे मधुबालावर जीवापाड प्रेम होते. कामिनी कौशल यांच्यानंतर दिलीप साहेबांनी मधुबालाला आपल्या जोडिदाराच्या रुपात बघितले होते. मधुबालाबरोबरसुद्धा दिलीप साहेबांनी एकुण चार सिनेमांमध्ये एकत्र काम केले. तराना, संगदिल, अमर आणि मुगल-ए-आजम या सिनेमांमध्ये दिलीप कुमार-मधुबाला ही जोडी झळकली होती. दोघांचे प्रेम बहरत असताना मधुबालाच्या वडिलांनी त्यांच्यात आडकाठी निर्माण केली. मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना या दोघांचे नाते कबूल नव्हते. त्यामुळेच त्यांनी मधुबालाला दिलीप कुमार यांच्याबरोबर नया दौर या सिनेमात काम करु दिले नाही. सिनेमा साईन करुन काम करण्यास नकार दिल्यामुळे निर्माता-दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांनी मधुबालावर खटला दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेले. दिलीप साहेबांनी मधुबालाऐवजी बी.आर.चोप्रा यांना साथ दिली. त्यामुळे मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते संपुष्टात आले.
दिलीप साहेबांनी 1966 साली आपल्या वयापेक्षा 22 वर्षे लहान असलेल्या सायरा बानोबरोबर लग्न केले.
सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावी करणा-या दिलीप साहेबांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. आपल्या जीवनात दिलीप साहेबांनी तब्बल आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळवला होता. हा किर्तीमान अद्याप कुणीही मोडू शकलेला नाहीये.
आपल्या अजोड अभिनयाने चित्रपटसृष्टीतील अनेक दशकं गाजवणा-या दिलीप साहेबांना 1991 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणा-या दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना 1995 साली सन्मानित करण्यात आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.