आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेसृष्टीत शोककळा:ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी रेखा कामत यांनी मुंबईतील माहिम येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी काम केले आहेत. रेखा आणि त्यांची बहीण चित्रा या दोघींनी शाळेत असतानाच नृत्याचे आणि गायनाचे प्रशिक्षण घेतले होते.

ख्यातनाम नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडून दोघी बहिणींनी शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले. नृत्यनाटिकेमुळे दोन्ही बहिणींना थेट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. या दोघी बहिणींमध्ये कुमुद सुखटणकर म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत या थोरल्या तर कुसुम सुखटणकर म्हणजे अभिनेत्री चित्रा नवाथे या धाकट्या होत

1952 मध्ये प्रदर्शित 'लाखाची गोष्ट' हा रेखा कामत यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांची बहिण चित्रा यांनीसुद्धा काम केले होते. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावे नकोत, चित्रपटासाठी जरा आकर्षक नावे पाहिजेत म्हणून 'गदिमां'नी रेखा आणि चित्रा असे या बहिणींचे नामकरण केले होते. या चित्रपटाच्या संवाद लेखनाची बाजू ग.दि. माडगुळकरांसोबतच ग.रा. कामत यांनी सांभाळली होती. तिथेच कामत आणि रेखा यांची ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी 1953 मध्ये लग्न केले.

रेखा यांनी कुबेराचे धन, गृहदेवता (दुहेरी भूमिका), गंगेत घोडे न्हाले, मी तुळस तुझ्या अंगणी, माझी जमीन हे त्यांचे गाजलेले चित्रपट. नेताजी पालकर चित्रपटात त्यांनी एक लावणी नृत्य तर जगाच्या पाठीवर चित्रपटात बैठकीची लावणीही सादर केली होती.

सौभद्र, एकच प्याला, भावबंधन, संशयकल्लोळ आदी संगीत नाटकांतून तसेच दिल्या घरी तू सुखी राहा, तुझे आहे तुजपाशी, लग्नाची बेडी, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, गोष्ट जन्मांतरीची, दिवा जळू दे सारी रात, कालचक्र आदी व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांनी साकारल्या सर्व नाटकांची एकूण प्रयोगसंख्या पाच हजारांहून अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...