आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला आठवड्याभरापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रेमोवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली आणि त्याच्या हृद्यातील ब्लॉकेज काढण्यात आले. आता रेमोला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून तो घरी परतला आहे. रेमोची पत्नी लिजेलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
46 वर्षीय रेमो शुक्रवारी दुपारी घरी पोहोचला. रुग्णालयातून घरी गेल्यावर रेमोने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या स्वागतासाठी खास जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. रेमोचा हा व्हिडिओ स्लो मोशनमध्ये असून बॅकग्राऊंडला गणपती बाप्पाचे गाणे ऐकू येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत रेमोने चाहत्यांचे आभार मानले आहेत. “माझ्यावर प्रेम, आशिर्वाद आणि माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. मी परत आलो आहे”, असे कॅप्शन देत रेमोने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
गेल्या आठवड्याभरात रेमोच्या प्रकृतीविषयी आमिर अली, धर्मेश, राघव जुयाल, अहमद खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिले होते. 11 डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला आयसीयूत ठेवण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनीही रेमोच्या स्वास्थाविषयी प्रार्थना केली होती.
कोरिओग्राफरसोबत दिग्दर्शक आहे रेमो
रेमो डिसूझाचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव हे त्याचे खरे नाव आहे. त्याच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझाने गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. ध्रुव आणि गबिरिल ही त्याच्या मुलांची नावे आहेत.
रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. नृत्य दिग्दर्शक म्हणून 1995 मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. याआधी तो बॅकग्राउंड डान्सर होता. 2000 मध्ये त्याने 'दिल पे मत ले यार' या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शन केले होते. 'तहजीब', 'कांटे', 'धुम', 'रॉक ऑन', 'स्टूडेंट ऑफ द ईयर', 'ये जवानी है दीवानी', 'एबीसीडी 2', 'बाजीराव मस्तानी' आणि 'कलंक' चित्रपटासाठीदेखील त्याने नृत्य दिग्दर्शन केले आणि अनेक चित्रपटासांठी पुरस्कार देऊन त्याचा गौरवदेखील झाला आहे.
कोरिओग्राफर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर रेमोने दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. 'फालतू' या चित्रपटासह त्याने 2013 मध्ये आलेल्या ‘एबीसीडी’ या डान्सवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन केले. याशिवाय 'एबीसीडी 2' आणि 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हे देखील त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट आहेत. याशिवाय तो 'डान्स इंडिया डान्स', 'झलक दिखला जा' आणि 'डान्स प्लस' या शोचा परीक्षकही होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.