आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमधील गटबाजी:ए.आर. रहमान यांच्यानंतर ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रेसूल पुकुट्टी यांनी मांडली आपली व्यथा, म्हणाले, बॉलिवूडमध्ये मला काम मिळाले नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रेसुल पुकुट्टी यांनी धक्कादायक विधान केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी अलीकडेच हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाही आणि गटबाजीवर आपले मत व्यक्त केले. बॉलिवूडमध्ये असा एक गट आहे, जो माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असल्याची खंत रहमान यांनी बोलून दाखवली होती. आता त्यांच्यानंतर 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी त्यांच्यासोबत काम करणारे साउंड डिझाइनर आणि एडिटर रेसुल पुकुट्टी यांनी आपली व्यथा मांडली आहे.

रेसुल यांच्या म्हणण्यानुसार, ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये कामच मिळाले नाही. ए.आर. रहमान आणि रेसुल पुकुट्टी यांना ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी 2009 मध्ये ऑस्कर मिळाला होता.

  • मी हार मानली होती...

अलीकडेच ए.आर. रहमान यांच्यासाठी दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक ट्विट केले होते, त्या ट्विटला रेसुल यांनी उत्तर दिले आहे. रेसुल यांनी शेखर कपूर यांना उत्तर देताना लिहिले, ‘डिअर शेखर कपूर मला या संदर्भात विचारा, मी जवळपास हार मानली आहे. ऑस्कर मिळाल्यानंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला कोणी काम देत नाही आणि प्रादेशिक सिनेमांनी मला घट्ट पकडले होते.'

रेसुल पुढे लिहितात, 'काही प्रॉडक्शन हाऊसनी तर त्यांना माझी गरज नसल्याचे माझ्या तोंडावर सांगितले. तरीही या इंडस्ट्रीवर माझे प्रेम आहे. इंडस्ट्रीने मला स्वप्नं पाहण्यास शिकवले. काहींनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आजही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ऑस्कर मिळाल्यानंतर मी अगदी सहजपणे हॉलिवूडकडे वळू शकत होतो. पण मी तसे केले नाही आणि भविष्यातही करणार नाही. भारताने माझ्या कामाला ऑस्कर मिळवून दिले. काही लोक माझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण माझा माझ्या लोकांवर जास्त विश्वास आहे', असे रेसुल यांनी म्हटले आहे.

  • शेखर कपूर यांनी रहमान यांच्यासाठी केले होते ट्विट

इंडस्ट्रीमध्ये माझ्या विरोधात एक गट अफवा पसरवत आहे, त्यामुळे मला चांगले चित्रपट मिळत नाहीयेत, असे रहमान यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शेखर कपूर यांनी एक ट्विट केले होते. शेखर कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते, ‘ए.आर. रेहमान तुम्हाला खरी समस्या माहिती आहे का? तुम्हाला ऑस्कर मिळाला आहे. ऑस्कर मिळणे म्हणजे बॉलिवूडमधील करिअरच्या मरणाला स्पर्श करणे. बॉलिवूड हताळू शकत नाही इतके कौशल्य तुमच्यात असल्याचा हा पुरावा आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • काय म्हणाले होते रहमान?

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'ला संगीत देणा-या ए.आर. रहमान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. परंतु असा एक गट आहे जो काही गैरसमजांमुळे माझ्याविरोधात अफवा पसरवत आहे.'

ते पुढे म्हणाले होते, “जेव्हा मुकेश छाबरा (दिल बेचाराचे दिग्दर्शक) माझ्याकडे आले होते तेव्हा मी दोन दिवसांमध्येच त्यांना गाणी तयार करून दिली होती. छाबरा यांनी मला सांगितले की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असे म्हटले. तसेच माझ्याविरोधातही त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या. मुकेश छाबरा त्यांच्या गोष्टी ऐकून मला समजले की मला सध्या काम का मिळत नाहीये आणि चांगले चित्रपट माझ्याकडे का येत नाहीयेत. मी डार्क चित्रपट करतोय, कारण माझ्याविरोधात काम करणारा एक गट आहे, जो मला चांगले चित्रपट मिळू देत नाहीये', असा खुलासा त्यांनी केला.