आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रियाच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण:ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला, सकाळी 11 ते सायंकाळी 6.50 वाजेपर्यंत झाली सुनावणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
रिया आणि तिचा भाऊ शोविक यांना एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. रिया 9 सप्टेंबरपासून तुरूंगात आहे. (फाइल फोटो)
 • एनसीबी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही निवेदने कोर्टासमोर ठेवू शकते.
 • सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अद्याप कोणताही निष्कर्ष लागलेला नाही, असे सीबीआयने निवेदन जारी करुन म्हटले आहे.

ड्रग्ज प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर आज (मंगळवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह सुशांत सिंह राजपूतचा घरगडी दीपेश सावंत, झैद विलात्रा आणि वासीद परिहार यांच्याही जामीन अर्जावर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. सकाळी 11 ते सायंकाळी 6.50 पर्यंत युक्तिवाद सुरू होता.

सर्व आरोपींना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील प्रयत्न करत आहेत. तर या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी एनसीबीच्या वकिलांनी ही तयारी केली आहे. या सर्वांच्या जामीन याचिका यापूर्वी दोनदा लोअर कोर्टाने फेटाळल्या होत्या. एनसीबीच्या अधिका-यांनी कारागृहात शोविकची पुन्हा चौकशी केली.

रियाचे वकील सतीश मानशिंदे न्यायालयात म्हणाले: -

 • रिया सुशांतच्या आयुष्यात येण्यापूर्वीच त्याला ड्रग्जचे व्यसन होते. रिया किंवा शोविक यांच्यापैकी कुणालाही हे व्यसन नाही. सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी करण्यासाठी रियाने त्याच्या डेबिट कार्डच्या माध्यमातून दहा हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप एनसीबीने केला आहे. पण त्यांच्याकडे रियाने ड्रग्ज खरेदी केली की नाही याचा पुरावा नाही?
 • सुशांत सिंह राजपूतला ड्रग्सचे व्यसन होते, याची तीन अभिनेत्रींनी पुष्टी केली आहे. रियाप्रमाणेच श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनीही कबूल केले आहे की, सुशांत 2019 पूर्वी ड्रग्ज घेत असे.
 • जर सुशांत आज हयात असता तर त्याला ड्रग्ज बाळगल्याबद्दल कलम 27 नुसार शिक्षा होऊ शकली असती आणि त्यामध्ये सहा महिने ते एक वर्षाची शिक्षा असू शकते. जर मुख्य ग्राहक म्हणून सुशांतला इतकीच शिक्षा मिळू शकते तर रिया आणि शोविक यांच्यावर कलम 27 ए कसा लावला जाऊ शकतो. यात 10-20 वर्षांची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
 • एनसीबीने आपल्या आरोपात म्हटले आहे की, रियाने सुशांतसाठी केवळ 25 ग्रॅम ड्रग्ज खरेदी केली होती. हे सिद्ध करते की त्यांचा (रिया आणि शोविक) इतक्या कमी प्रमाणात ड्रग्ज खरेदी करण्याचा हेतू कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाशी संबंधित नाही. एनसीबीने रियावर कलम 27 ए लादला आहे जो न्याय्य नाही.
 • या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीकडे कोणताही अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करायला हवे होते. सुशांतच्या मृत्यूशी संबंधित सर्व प्रकरणांची सीबीआयने चौकशी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.
 • रियाच्या जामिनाविरूद्ध एनसीबीचा युक्तिवाद

रिया आणि शोविक हे ड्रग्ज सिंडिकेटचे सक्रिय सदस्य आहेत आणि हाय सोसायटीतील अनेक लोक आणि ड्रग्ज सप्लायर्ससोबत त्यांचा संबंध आहे, असे तपास यंत्रणेने सोमवारी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करुन म्हटले आहे. त्यांच्यावर कलम 27 ए लागू करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये. 24 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल यांच्या खंडपीठाने रियाच्या जामीन अर्जावर एनसीबीकडे जाब विचारला होता. प्रतिज्ञापत्रात एनसीबीने सांगितले की, रियाने ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली आहे. सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत आणि शोविक चक्रवर्ती यांनाही तिने ड्रग्ज खरेदी करण्यास सांगितले होते, हे देखील रियाने कबुल केले आहे.

आज या प्रकरणात, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो आपले निष्कर्ष कोर्टासमोर मांडू शकते. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांच्या जबाबांचा समावेश आहे. सुशांत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 21 लोकांना एनसीबीने अटक केली आहे.

 • एम्सने प्रारंभिक अहवाल सीबीआयकडे सोपवला

सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी एम्सच्या वतीने डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमचा अभ्यास पूर्ण झाला असून त्यांनी सीबीआयकडे आपला अहवाल सोपवला असल्याचे वृत्त आहे. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, एम्स डॉक्टरांच्या समितीने अभ्यासात समोर आलेले तथ्य आणि माहिती सीबीआयकडे सोपवली आहेत. सोमवारी यासंबंधी सविस्तर बैठक पार पडली. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि गेल्या 40 दिवसांत सीबीआय तपासात आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचे मत म्हणून ग्राह्य धरले जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभे केले जाऊ शकते.

 • क्षितीज आणि सॅम्युअल मिरांडा यांच्यात कनेक्शन आढळले

ड्रग्ज प्रकरणी धर्ममेटिक एंटरन्मेंटचा माजी निर्माता / दिग्दर्शक क्षितीज प्रसादला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान शनिवारी सॅम्युअल मिरांडाशी त्याची लिंक असल्याचे समोर आले आहे. रिया चक्रवर्तीला एनसीबीने ज्या सिंडिकेटचा भाग असल्याचे म्हटले आहे, त्यात सॅम्युअल मिरांडाचे देखील नाव आहे. रविवारी क्षितीजने एनसीबीने सांगितले की, या प्रकरणात अटकेत असलेल्या करमजीत सिंग आनंद कडून तो ड्रग्ज खरेदी करायचा. सॅम्युअल मिरांडा देखील करमजितकडूनच ड्रग्ज खरेदी करायचा.

 • सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी चौकशीवर उपस्थित केले प्रश्न

सुशांतचे कुटुंब सीबीआयच्या चौकशीवर समाधानी नाहीत. सुशांतचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनी एका ट्विटमध्ये लिहिले म्हटले की, "सुशांतच्या तपासात सीबीआयकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नाराज आहे. एम्समध्ये काम केलेल्या डॉक्टरांनी मला सांगितले होते की, फोटो पाहून तर हा 200 टक्के खूनच आहे आत्महत्या नाही.' याशिवाय त्यांनी एम्सच्या डॉक्टरांकडून अहवालातील निष्कर्षही आपल्याला समजल्याचा दावा केला होता.

मात्र एम्सच्या फॉरेन्सिक टीमचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी हा दावा फेटाळला होता. ते म्हणाले की, सीबीआयने अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. फक्त फोटो पाहून काही ठरवता येणार नाही. निर्णय हा स्पष्ट आणि पुराव्यांचे आधारे असायला हवा.