आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुझे मेरी कसम' TV वर का येत नाही:निर्माते रामोजी रावांच्या हुशारीमुळे अद्याप TV, OTT वर नाही रितेश-जिनिलियाचा पहिला चित्रपट

मयुरी वाशिंबे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठमोळ्या रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखची ऑन स्क्रिन जोडी तसेच ऑफ स्क्रिन जोडी कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. या दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदा 'तुझे मेरी कसम' या सिनेमात पाहायला मिळाली होती. 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज 20 वर्षं पुर्ण झाली आहेत.

रितेश आणि जिनिलयाच्या पहिल्या-वहिल्या या चित्रपटाने अख्ख्या देशाला 'वेड' लावले होते. 3 जानेवारी 2003 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दोघांचे आयुष्य बदलणारा हा चित्रपट ठरला. त्यांचे प्रेमही या चित्रपटाच्या सेटवरच फुलले होते. त्यानंतर त्यांनी लग्न गाठ बांधली. आज ही ते बॉलिवूड मधील सर्वात हॉट कपल आहे.

'तुझे मेरी कसम'ची खास गोष्ट म्हणजे, या कॉलेज लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच शिवाय या चित्रपटातील गाणेही हिट ठरली. ऑडिओ कॅसेटच्या त्या जमान्यात या चित्रपटाच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. पण चित्रपटगृहांमध्ये हिट ठरलेला हा चित्रपट थिएटरशिवाय इतर ठिकाणी उपलब्ध नाही.

सध्या ओटीटीचा बोलबाला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफार्मवर पाहायला मिळतो. तसेच चित्रपटाच्या डिव्हिडीही उपलब्ध होतात. पण, तुझे मेरी कसम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 20 वर्ष उलटल्यानंतरही हा चित्रपट टेलिव्हिजन किंवा इतर कोणत्याही माध्यमावर आपण पाहू शकत नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाची अजूनही बाजारात पायरेटेड कॉपी मिळत नाही. तर असे का आहे, हे आपण जाणून घेऊया...

हा चित्रपट रितेश आणि जिनिलया देशमुख यांचा पहिला-वहिला चित्रपट होता. या चित्रपटातून दोघांनी पदार्पण केले. या सिनेमाची निर्मिती रामोजी राव यांनी केली. या सिनेमाचे संपूर्ण शूटिंग रामोजी फिल्मसिटीमध्ये झाले होते. असे म्हटले जाते की, रामोजी राव हे एक हुशार उद्योगपती आहेत. त्यांनी त्याचे डिजिटल अधिकार विकले नाहीत. जेणेकरून लोकांना हा चित्रपट आवडला असेल तर प्रेक्षक चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतील. मूव्ही चॅनल फक्त तेच चित्रपट दाखवू शकते, जे त्यांनी प्रोडक्शन हाऊसकडून घेतले/खरेदी केले आहेत. त्यामुळे तुझे मेरी कसम चित्रपट टेलिव्हिजन किंवा इतर कोणत्याही माध्यमावर आपण पाहू शकत नाही.

चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर म्हणाले की, काही चित्रपट हे सरळ ओटीटीवर रिलिज होतात. तसेच काही चित्रपट हे थिएटरशिवाय इतर कुठेही रिलिज केले जात नाहीत. कोणत्याही सिनेमाचे हक्क विकल्यानंतर तो डीव्हीडी किंवा इतर ओटीटी माध्यमांवर पाहायला मिळतो. जेव्हा तुझे मेरी कसम हा चित्रपट 2003 साली प्रदर्शित झाला होता. तेव्हा नुकतेच चॅनलचे युग सुरू झाले होते. तेव्हा तुझे मेरी कसम हा चित्रपट चॅनलवर दाखवण्यात आला नव्हता.

'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या वेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांचा मुलगा चित्रपटसृष्टीत प्रवेश करेल आणि स्टार होईल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. रितेशने मुंबईच्या कमला रहेजा महाविद्यालयातून आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली. काही दिवस त्याने परदेशात एका कंपनीमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम देखील केले. पण, अभिनयाचे वेड त्याला मुंबईत घेऊन आले आणि ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

राजकारण आणि आरोप
चित्रपटाबाबत असेही म्हटले जाते की, 2003 केबल ऑपरेटर्सचा काळ होता. प्रत्येक घरात केबल कनेक्शननेच चालत असत. हे केबल ऑपरेटरही आपापल्या स्तरावर सीडी-डीव्हीडीद्वारे चित्रपट दाखवायचे. मग सीडी आणि डीव्हीडी कॅसेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायरसी झाली. रितेश देशमुखने वडिलांचा प्रभाव वापरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह केबल ऑपरेटर्सना धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पायरसीच्या माध्यमातून 'तुझे मेरी कसम' केबलवर प्रसारित झाल्यास ऑपरेटर्सचे परवाने जप्त केले जातील, असे सांगितले. मात्र, नंतर ही बाब केवळ आरोप आणि अफवा ठरली.

विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी
विलासराव देशमुख काँग्रेस पक्षाचे नेते होते. 1999 ते 2003 आणि पुन्हा 2004 ते 2008 पर्यंत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यानंतर ते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री देखील होते. 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' रिलीज होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी विलासराव देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रितेश देशमुख हे वडिलांचा प्रभाव वापरून चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचे सांगण्यात आले. एवढेच नाही तर महाराष्ट्रातही हा चित्रपट जाणीवपूर्वक अधिकाधिक स्क्रीनवर प्रदर्शित केला जात असल्याचा आरोपही झाला होता. राज्यातील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. मात्र, विलासराव देशमुख आणि रितेश देशमुख या दोघांनीही हे आरोप फेटाळून लावले होते.

प्रथम मल्याळम, नंतर तेलुगु आणि नंतर हिंदीत
'तुझे मेरी कसम' हा तेलगू ब्लॉकबस्टर चित्रपट 'नुव्‍वे कवाली'चा रिमेक होता. जो मल्याळम चित्रपट 'निरम'चा रिमेक होता. चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यामध्ये जिनिलियाचे पात्र रितेश देशमुखला सहा वेळा थप्पड मारते. गंमत म्हणजे या सीनला दिग्दर्शकाने होकार दिला होता. मात्र असे असतानाही रितेशने हा सीन पुन्हा शूट करण्याचा निर्धार केला होता. त्याचा परिणाम असा झाला की त्याचे गाल लाल झाले होते.

कॉलेजवयीन मुला-मुलीची प्रेमकथा सांगणारा हा चित्रपट फार लोकप्रिय झाला होता. तुझे मेरी कसम या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. महाराष्ट्रातल्या लातूर, परभणी, कोल्हापूर, नांदेड यांसारख्या शहरात आजही या चित्रपटाचे शोज चालवले जातात आणि प्रेक्षकांचे आजही तितकेच प्रेम या चित्रपटाला लाभते. अनेक नवीन रिलीज झालेल्या चित्रपटांसोबतच हा चित्रपट रिलीज केला जातो आणि तो हाऊसफुल्ल् होतो हेही विशेष.

बातम्या आणखी आहेत...