आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटातील ‘रावण’ या भूमिकेबद्दल बातचीत केली. यादरम्यान त्याने रावणाबद्दल एक वक्तव्य केले ज्यामुळे तो वादात सापडला. प्रकरण चिघळत असल्याचे पाहून आता सैफने माफी मागितली आहे.
सैफ अली खानने आपल्या एका निवेदनात म्हटले, 'माझ्या एका मुलाखतीदरम्यान मी जे बोललो त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे मला कळले आहे. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता. मी माझे विधान मागे घेत आहे आणि दिलगिरी व्यक्त करतो. श्रीराम माझ्यासाठी नेहमीच नायक राहिले आहेत. आदिपुरुष म्हणजे वाईटावर विजय मिळवण्याचा उत्सव. आमची संपूर्ण टीम ही उत्कृष्ट कथा पडद्यावर आणण्याच्या कामात व्यग्र आहे', असे सैफ म्हणाला.
मुलाखतीत काय म्हणाला होता सैफ?
सैफ अली खानने आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, 'अशा राक्षसी राजाची भूमिका साकारणे मनोरंजक आहे. परंतु आम्ही त्याला दयाळू दाखवू. सीतेचे अपहरण आणि रामासोबत झालेले युद्ध हे सूड घेण्याच्या ईष्येने झाले असल्याचे आम्ही दाखवणार आहोत. लक्ष्मणाने रावणाची बहीण सुर्पनकाचे नाक कापले होते. त्याचाच सूड उगवण्यासाठी सीतेचे अपहरण करण्यात आले आणि रामासोबत युद्ध झाले, असे आम्ही दाखवणार आहोत', असे वक्तव्य सैफ अली खानने केले होते.
सैफ अली खानच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते राम कदम म्हणाले की, सध्या हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या कथा आणि सीन चित्रपटांमध्ये दाखवणे हा सिनेसृष्टीचा ट्रेण्ड झाला आहे. राम कदम यांनी स्पष्ट केले की यापुढे ते हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाहीत.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहे. ओम राऊत यांनी याआधी ‘तानाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘आदिपुरुष’मध्ये 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर कृती सेनन सीता देवीची भूमिका निभावणार आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान असणार आहे. या चित्रपटाचे बजेट 400 कोटींपेक्षा जास्त आहे. 2021 च्या जानेवारी महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचा टीम विचार करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.