आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निडर भाईजान:धमकी मिळाल्यानंतरही टेंशन फ्री होऊन करतोय शूटिंग सलमान, वडील म्हणाले- अशा धमक्यांची सवय आहे

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेटवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने सध्या चर्चेत आहे. लॉरेन्स गँगने अलीकडेच सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवले. लवकरच तुमचा मुसेवाला करु असा धमकीवजा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. तेव्हापासून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानवर मात्र या धमकीचा कोणताही परिणाम झालेला नाही.

सेटवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे
या धमकीला न जुमानता सलमान सध्या हैदराबादमध्ये 'भाईजान' या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान अतिशय शांतपणे आणि तणावाशिवाय काम करत आहे. या धमकीचा कोणताही परिणाम त्याच्यावर झालेला नाही. अलीकडे तो शूटिंगदरम्यान हॉटेलमध्ये बुफेचा आनंद घेतानाही दिसला. चित्रपटाच्या सेटवर सलमानच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र अजिबात सेटवर तणावाचे वातावरण नाही. पण पोलिसांनी सलमानला त्याच्या गोष्टी सिक्रेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

आम्हाला धमक्यांची सवय आहे : सलीम खान
सलीम खान यांनी धमकीच्या पत्राबाबत दिव्य मराठीचे रिपोर्टर अमित कर्ण यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, "तुम्ही जे ऐकत आहात, ते मीही ऐकत आहे. धमकीची पत्र आणि त्यानंतर मी टीव्हीवरूनच सुरक्षेशी संबंधित सर्व माहिती घेत आहे. अर्थातच पोलिसांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे. आम्हाला असे इशारे आणि धमक्यांची सवय झाली आहे. जीवनात या गोष्टी सहन कराव्या लागतात. बाकी कोणती काळजी आम्ही करत नाही."

लॉरेन्सनेच पाठवले होते पत्र
धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. गुन्हे शाखेने लॉरेन्सचा निकटवर्तीय सौरभ महाकाळची चौकशी केली आहे. त्याने सांगितल्यानुसार, तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्सनेच सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र लिहिले. लॉरेन्सच्या टोळीतील तीन जण राजस्थानातील जालोर येथून मुंबईत पत्र टाकण्यासाठी आले होते. धमकीचे पत्र दिल्यानंतर या तिघांनी आरोपी सौरभ महाकाळचीही भेट घेतली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभने हे पत्र गोल्डी ब्रारच्या माध्यमातून सलीम खान यांना पोहोचवल्याचेही सांगितले. मुंबई पोलिसांनी पुढे सांगितले की, गुन्हे शाखेने पत्र पाठवणाऱ्यांची ओळख पटवली आहे. त्यांच्याशी संबंधित काही सुगावाही सापडला आहे. लवकरच ते पकडले जातील. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांची 6 पथके देशाच्या विविध भागात रवाना झाली आहेत.

असे मिळाले धमकीचे पत्र
गेल्या रविवारी सकाळी जेव्हा सलमानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉकला गेले होते, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आले. फिरल्यानंतर सलीम खान यांना एक अनोळखी पत्र मिळाले होते, ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलीम खान, सलमान खान तुमचा मूसेवाला करु असा मजकूर त्या पत्रात लिहिला होता. यानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आणि याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अलीकडेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव याप्रकरणी पुढे आले होते. काळवीट प्रकरणानंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काळवीट प्रकरणी सलमानला धमकी देण्यात आली होती
लॉरेन्स बिश्नोई याने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानतो, त्यामुळे त्याची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानला मारण्याची धमकी लॉरेन्सने दिली होती.

जोधपूरमध्ये सलमानला मारण्याचा होता कट
2008 मध्ये कोर्टाबाहेर लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला मारणार असल्याचे सांगितले होते. तो असेही म्हणाला होता की, 'मी अजून काही केले नाही, पण जेव्हा मी सलमान खानला मारेन तेव्हा मग कळेल. सध्या मला अनावश्यक गोष्टींमध्ये ओढले जात आहे.

सलमानचे आगामी प्रोजेकेट्स
सलमान खान नुकताच अबुधाबीच्या यास बेटावर आयफा अवॉर्ड्सचा होस्ट म्हणून गेला होता. याशिवाय तो आता 'भाईजान' (पुर्वीचे शीर्षक 'कभी ईद कभी दिवाली')च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हैदराबाद येथे त्याचे 25 दिवसांचे शेड्यूल असेल. त्याच्या सुरक्षेसाठी सेटवर पोलिसांची एक टीमसुद्धा तिथे तैनात आहे. याशिवाय 'टायगर' मालिकेतील तिसरा चित्रपट 'टायगर 3'मध्येही तो काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफही दिसणार आहे. यासोबतच तो आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' आणि शाहरुख खानच्या 'पठाण'मध्येही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...