आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलनशी दुसऱ्या लग्नाबद्दल सलीम खान यांनी सोडले मौन:म्हणाले - 'माझा हेतू कधीच चुकीचा नव्हता', अरबाज खानच्या शोमध्ये झाले व्यक्त

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानचा नवीन शो ‘द इनव्हिसिबल विथ अरबाज खान’ सध्या चर्चेत आहे. या शोच्या पहिल्या भागात पाहुणे म्हणून त्याचे वडील सलीम खान हजेरी लावणार आहेत. नुकताच या भागाचा टिझर रिलीज झाला आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते सलीम खान यांनी त्याच्या करिअरबरोबरच खासगी जीवनातील अनेक किस्से या शोमध्ये शेअर केले आहेत.

सलीम खान यांनी दुसऱ्या लग्नाचे सांगितले कारण
सलीम खान यांनी या शोमध्ये मुलगा अरबाज खानसमोर त्यांच्या दोन लग्नांवर भाष्य केले. सलीम खान यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांचे पहिलं लग्न सुशील चरक म्हणजे सलमान खानची आई सलमा यांच्याशी झाले होते. 18 नोव्हेंबर 1964 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. मात्र विवाहित असूनही सलीम खान यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी 1981 मध्ये दुसरे लग्न केले. आता विवाहित असूनही सलीम खान यांनी दुसरे लग्न का केले होते, याचा खुलासा त्यांनी या शोमध्ये केला आहे.

हेलन यांच्याशी लग्नाबद्दल काय म्हणाले सलीम खान?
हेलन यांच्याबरोबरच्या नातेसंबंधांबद्दल जेव्हा अरबाजने सलीम खान यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, "ती तरुण होती. मी तरुण होतो आणि माझा हेतू कधीच चुकीचा नव्हता. मी तिची मदत करण्यासाठी हात पुढे केला होता. तो एक भावनिक अपघात होता आणि हे कोणाबरोबरही घडू शकते." वडील सलीम यांची ही गोष्ट ऐकून अरबाजनेदेखील त्याचा अनुभव शेअर केला. तो म्हणाला, या त्या गोष्टी आहेत, ज्यावरुन मी माझ्या वडिलांवर नाराज होऊ शकतो. पण आता अशाच गोष्टी माझ्या आयुष्यातही घडत आहे. गोष्टी समजून घेण्यासाठी काळ हा मोठा फॅक्टर असतो, असे अरबाज म्हणाला.

दरम्यान 1980 च्या काळात हेलन आणि सलीम खान यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. सलीम खान यांनी या शोमध्ये हेही सांगितले की, त्यांचे हेलनशी असलेले नातं सर्वांनीच स्वीकारले नव्हते. हेलन आणि सलीम खान यांना स्वतःचे मूल नाही त्यांनी अर्पिता खानला दत्तक घेतले आहे. तर पहिली पत्नी सलमापासून सलीम खान यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अल्वीरा खान अशी चार मुले आहेत.

सलमा यांच्याशी लपूनछपून भेटायचे सलीम खान
शोमध्ये सलीम खान यांची त्यांच्या आणि सलमा यांच्या पहिल्या भेटीचा किस्सादेखील शेअर केला. त्यांनी सांगितले की, आम्ही लपूनछपून भेटायचो. मी तिला म्हणालो की, मला तुझ्या आईवडिलांना भेटायचे आहे. घरी गेल्यावर सगळे मला बघण्यासाठी गोळा झाले. एखाद्या प्राणीसंग्रहालयात जसे प्राणी बघण्यासाठी लोक जमा होतात, तसे तिथे सगळे जमले होते, अशी आठवण सलीम खान यांनी अरबाजच्या शोमध्ये सांगितली.

अरबाजच्या शोचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. सलीम खान यांच्यानंतर अरबाज खानच्या शोमध्ये जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा, वहिदा रहमान आणि हेलन हे कलाकारदेखील सहभागी होणार आहेत. अरबाजचा हा शो दर शुक्रवारी प्रसारित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...