आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यंदा ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 21 एप्रिल रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. या चित्रपटासोबतच सलमान आणखी एका कारणाने चर्चेत आहे. सलमानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. दरम्यान धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानने एक मोठे पाऊल उचलले आहे. त्याने आपल्या सुरक्षिततेसाठी एक आलिशान बुलेटफ्रूफ कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे त्याने ही कार परदेशातून मागवली आहे.
सलमानने खरेदी केली बुलेटप्रुफ निसान पेट्रोल SUV
सलमान खानच्या ताफ्यात आता Nissan Patrol SUV चा समावेश करण्यात आला आहे. सध्या ही गाडी भारतात लाँच करण्यात आलेली नाही. निसान पेट्रोल ही निसानने बनवलेली आतापर्यंतची सर्वात महागडी एसयूव्ही कार आहे. दक्षिण आशियाच्या बाजारपेठेत ही कार खूप लोकप्रिय आहे. ही कार भारतात मिळत नसल्याने सलमानने ती आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात केली आहे.
सलमानने खरेदी केलेल्या पांढऱ्या रंगाच्या या निसान पेट्रोलमध्ये 5.6 लिटर व्ही 8 पेट्रोल इंजिन आहे. एसयूव्हीचे इंजिन 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारची बाजारातील किंमत 80 लाख आहे. पण सलमान खानने आयात केलेली कार बुलेटप्रूफ आणि चिलखती आहे, त्यामुळे तिची किंमत करोडोंमध्ये आहे. नुकताच सलमान एका कार्यक्रमात या बुलेटप्रूफ कारमधून पोहोचला होता.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आले सलमान
गेल्या काही दिवसांपासून सलमान गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या निशाण्यावर आहे. महिन्याभरापूर्वी लॉरेन्सने तुरुंगातून एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, 'जर सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागितली नाही तर त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल.' मुलाखतीत लॉरेन्स पुढे म्हणाला होता की, "माझा सलमान खानवर लहानपासून राग आहे. कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे. सलमान खानने बिश्नोई समाजातील लोकांना पैशांचे आमिष दाखवले होते. त्याला आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर बदला घेण्यासाठी मारणार आहोत," असे बिश्नोईने म्हटले.
धमकीचा आला होता सलमानला ईमेल
रोहित गर्ग नावाच्या एका तरुणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई-मेल पाठवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित गर्गने ई-मेलमध्ये लिहिले आहे की, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचे आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचाही संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय असल्याचे म्हटले होते. यानंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.