आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरण:9 मे रोजी होणार सुनावणी; हजर राहणे टाळण्यासाठी सलमानची हायकोर्टात धाव, याचिकाकर्त्याची सलमानकडून माफीची अपेक्षा

किरण जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

2019 मध्ये पत्रकार अशोक पांडे यांनी सलमान खानवर गैरवर्तनाचा आरोप करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी 5 एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमानला समन्स बजावले होते. आता या प्रकरणी 9 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 24 एप्रिल 2019 चे आहे, ज्यामध्ये तक्रारदाराने सलमान खानवर मारहाण आणि फोन हिसकावल्याचा आरोप केला होता. याचिकाकर्ते अशोक पांडे यांच्या म्हणण्यानुसार, कोर्टात हजर राहता येऊ नये म्हणून सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे
दिव्य मराठीशी संवाद साधताना अशोक पांडे म्हणाले, "याआधीही झालेल्या सुनावणीदरम्यान सलमान खानने कोणते ना कोणते कारण पुढे करत कोर्टात हजर राहणे टाळले आहे. तो आज (5 एप्रिल) देखील अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर झाला नाही तरी मला आश्चर्य वाटणार नाही. माझा कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. या घटनेला तीन वर्षे झाली असली तरी मला खात्री आहे की मला न्याय नक्की मिळेल."

सलमानच्या टीमकडून फोन आला होता
ते पुढे म्हणाले, "ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनी मला सलमानचा टीम मेंबर शोएबचा फोन आला. त्याने मला केस मागे घेण्यास सांगितले होते आणि हे प्रकरण बंद करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळीही मी फक्त आणि फक्त एकच मागणी केली होती, ती म्हणजे सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने झालेल्या प्रकरणी माफी मागावी. मला याहून अधिक काहीही नकोय. आम्ही हे त्याच वेळी पोलिसांना सांगितले. हे प्रकरण घडले तेव्हा आमची कोणतीही चूक नव्हती. आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्या बॉडीगार्डची परवानगी घेतली होती. असे असतानाही त्याने आम्हाला मारहाण केली आणि आमचा फोन हिसकावून घेतला होता."

मी आवाज उठवत राहीन
सलमानच्या गैरवर्तनावर अशोक म्हणाले, "मी काही कलाकारांना पत्रकारांशी गैरवर्तन करताना पाहिले आहे, तरीही ते कधीच बाहेर येऊन बोलत नाहीत. मी त्यांच्यापैकी नाही. माझ्यासमोर सलमान खानसारखी मोठी पर्सनॅलिटी असली तरीदेखील माझ्यासोबत जर काही चुकीचे घडले असेल, तर मी त्याचा नक्कीच निषेध करेन."

सलमाननेची उच्च न्यायालयात धाव
पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सलमान खानने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सलमानला आज मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर व्हायचे होते. हे टाळण्यासाठी सलमानने मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक सलमान शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने कोर्टात हजर राहू शकत नाही, असे कारण त्याच्या वकिलांनी पुढे केले आहे. प्रत्यक्ष हजर राहणे टाळण्यासाठी सलमान उच्च न्यायालयात गेला आहे. या प्रकरणात सलमानच्या अंगरक्षकाचेही नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे तीन वर्षे जुने प्रकरण 2019 मधील आहे. एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खानला समन्स जारी केले असून सुनावणी 5 एप्रिल रोजी निश्चित केली. या समन्समध्ये सलमानसह त्याच्या अंगरक्षक नवाज शेखचाही समावेश आहे.

अशोक पांडे नावाच्या पत्रकाराने सलमानवर मारहाणीचा आरोप केला होता. मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना काही माध्यमांनी सलमानचे फोटो क्लिक घेण्याचा प्रयत्न केला असता सलमानने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर सलमानने त्याच्याशी वाद घालत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. पांडे यांच्या तक्रारीवरून भांदवि कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर दंडाधिकारी आर. आर. खान यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता रेकॉर्डवरील सामग्री, पोलिसांचा सकारात्मक अहवाल आणि इतर पुरावे लक्षात घेऊन, आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सलमान खानला पाठवण्यात आलेल्या समन्सची प्रत.
सलमान खानला पाठवण्यात आलेल्या समन्सची प्रत.

काळवीट प्रकरणात दिलासा
अलीकडेच काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. सलमानच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. मात्र नव्या प्रकरणामुळे अभिनेत्याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...