आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनसीन व्हिडिओ:22 वर्षीय सलमानचा 'मैंने प्यार किया'चा ऑडिशन व्हिडिओ लीक, स्क्रीन टेस्टमध्ये झाला होता रिजेक्ट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानला खरी प्रसिद्धी 'मैंने प्यार किया' या चित्रपटाने मिळवून दिली. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याच्यासाठी इंडस्ट्रीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. 1989 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात सलमानची एन्ट्री कशी झाली, हे आता एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे. या चित्रपटासाठी सलमान ऑडिशन देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ऑडिशन टेपमध्ये 22 वर्षीय सलमान गिटार आणि गुलाब घेऊन प्रपोजल सीन करताना दिसत आहे.

सलमानचा हा अवतार पाहून चाहते थक्क
या ऑडिशनमध्ये सलमान खूपच बरीक दिसतोय. आता हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर चाहते त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी सलमानच्या अनसीन लूकवर कमेंट केल्या आहेत. काही युजर्सनी सलमानच्या या लूकला निरागस म्हटले तर काहींनी सलमानच्या आवाजात आजसारखी ताकद नव्हती, असे म्हटले आहे.

सूरज बडजात्या यांना आवडला नव्हता सलमानचा फर्स्ट लूक
पिंकविलाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, 'मैंने प्यार किया' या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सांगितले की, त्यांना सलमानचा फर्स्ट लूक आवडला नव्हता. सूरज यांनी सांगितल्यानुसार, सलीम खान यांचा मुलगा आमच्यासोबत का काम करु इच्छितो असा पहिला प्रश्न त्यांना पडला होता.

सूरज पुढे म्हणाले, "मी त्याला (सलमान) मेसेज केला आणि तो मला भेटायला आला. तो खूप लहान दिसत होता. माझ्या मनात विचार येत होते की हा हिरो दिसेल का... पण जेव्हा त्याने मला त्याचे फोटो दाखवले तेव्हा मी थक्क झालो. नंतर मी त्याला स्टोरी ऐकवली,' असे त्यांनी सांगितले.

स्क्रीन टेस्टमध्ये रिजेक्ट झाला, 6 महिन्यांनंतर चित्रपटात सहभागी झाला
'मैंने प्यार किया या चित्रपटाच्या स्क्रीन टेस्टमध्ये सलमान खान सुरुवातीला रिजेक्ट झाला होता. हा खुलासा स्वतः सूरज बडजात्या यांनी केला होता. मात्र सहा महिन्यांतच त्याला पुन्हा चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले. त्यामागील कारण म्हणजे राजश्री प्रोडक्शन त्यावेळी तोट्यात चालले होते. कोणत्याही मोठ्या अभिनेत्याला राजश्रीसोबत काम करायचे नव्हते. अखेर सूरज यांनी सलमानशी संपर्क साधला. त्यानंतर जे घडले तो इतिहास आहे.

मित्राकडून कपडे उधार घेऊन ऑडिशन दिली होती
या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी सलमानने त्याच्या मित्राकडून कपडे उधार घेतले होते. 'हॅलो ब्रदर' आणि 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटांचा निर्माता बंटी वालिया हा सलमानचा मित्र आहे. एका मुलाखतीत बंटी वालियाने सांगितले होते की, ऑडिशनच्या दिवशी सलमान सकाळी 6 वाजता त्याच्या घरी आला आणि त्याने त्याचा संपूर्ण वॉर्डरोब रिकामा करत सर्व कपडे स्वतःच्या कारमध्ये ठेवले. बंटीच्या म्हणण्यानुसार, सलमान त्या दिवशी खूप नर्व्हस होता.

ठरला बॉलिवूडचा आयकॉनिक चित्रपट
'मैंने प्यार किया' हा बॉलिवूडमधील आयकॉनिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. रोमान्स आणि उत्तम संगीताची जोड असलेला हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्री मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात 28 कोटींची कमाई केली आणि तो ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरला.