आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा धमकी:सलमान खान जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी अवघ्या 16 वर्षांचा, पोलिस राजस्थानहून मुंबईत आणणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या धमकीनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. आता सोमवारी रात्री पुन्हा एकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी हा धमकीचा फोन मुंबई पोलिस कक्षाला आला आहे. 30 एप्रिल रोजी सलमानला जीवे मारणार असल्याचे या धमकीत सांगण्यात आले आहे. हा धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. रॉकी भाई असे धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव असून तो अवघ्या 16 वर्षांचा असल्याची माहिती आहे. पोलिस त्याला चौकशीसाठी राजस्थानहून मुंबईत आणणार आहेत.

शहापूरमधून आरोपी ताब्यात

सोमवारी (10 एप्रिल) मुंबई पोलिसांना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जोधपूरहून धमकीचा फोन आला होता. या फोनद्वारे "30 एप्रिलला सलमान खानची हत्या करू", अशी धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या फोननंतर मुंबई क्राइम ब्रांचने तातडीने कारवाई करत काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने स्वतःचे नाव रॉकी भाई असल्याचे सांगितले आहे. हा तरुण 16 वर्षांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजस्थानच्या शहापूर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. रॉकी भाईचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध आहे का, याचा तपास मुंबई क्राइम ब्राँच करत आहे.

या आधी आले आहेत सलमानला जीवे मारण्याचे ई-मेल
सध्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत हा दावा केला होता की, "सलमान खानला ठार करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे." त्यानंतर रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या ई-मेलमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या या मुलाखतीचा संदर्भ आहे.

सलमान खानला आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये काय म्हटले?
सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. मेल पाठवणाऱ्या तरुणाचे नाव रोहित गर्ग असल्याची माहिती समोर आली. सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सलमान खानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित गर्गने ई-मेलमध्ये लिहिले की, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचे आहे.

'गोल्डी ब्रारला तुमच्या बॉसशी (सलमान खान) बोलायचे आहे. त्याने गँगस्टर बिष्णोईची मुलाखत नक्कीच पाहिली असेल. जर सलमानने ती मुलाखत पाहिली नसेल तर त्याला ती पाहायला सांगा. जर हे प्रकरण कायमचे बंद करायचे असेल तर सलमान खानला गोल्डी ब्रारशी बोलू द्या. त्यांना समोरासमोर बोलायचे असेल तर तसे कळवा. यावेळी आम्ही तुम्हाला वेळेवर कळवले आहे. पुढच्या वेळी थेट धक्का देऊ' असा मजकूर पत्रात लिहिला आहे.

पोलिसांनी वाढवली सलमानची सुरक्षा
मुंबईतल्या वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी कलम 506 (2), 120 (ब) आणि 34 या अन्वये प्रकरण दाखल केले. तसंच धमकीचा हा मेल सलमान खानच्या सहकाऱ्याला आल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवली. मुंबई पोलिसांनी सलमान खानला Y+ सुरक्षा प्रदान केली आहे.

सलमानने सुरक्षेसाठी परदेशातून मागवली बुलेटप्रुफ कार
सतत मिळणाऱ्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमानने अलीकडेच त्याच्या सुरक्षेसाठी एक महागडी बुलेटप्रूफ कार खरेदी केली. सलमानने बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही परदेशातून आयात केली आहे. ही एक हाय एंड बुलेट-प्रूफ एसयूव्ही कार आहे. ही कार अद्याप भारतात लाँच करण्यात आलेली नाही. या कारमध्ये B6 किंवा B7 लेव्हलपर्यंतची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ही कार जागतिक स्तरावरील सुरक्षित कार्सपैकी एक आहे. बी 6 लेव्हलपर्यंतची सुरक्षा प्रदान करणाऱ्या कार्स रायफलद्वारे झाडलेल्या गोळ्यांचादेखील सामना करू शकतात.